‘स्वदेस’ बघितला असेल ना! शाहरुखवाला.. चेक्सचे मस्त शर्टस घातलेला
मोहन.. आणि ती गायत्री जोशी. म्हणजे कांदे-पोहे वाला कार्यक्रम करायचाच असेल तर
हिच्यासाठी करावा, अशी वाटणारी गायत्री! ते वाईचे काठ, नासा बॅकग्राऊंड, ‘यूँ ही
चला चल’ म्हणणारा मकरंद देशपांडे… बहोत कुछ था! या सगळ्या गर्दीतली ती ‘कावेरी
अम्मा’ आठवते का? शाहरुखला सांभाळणारी… दाक्षिणात्य टोन घेऊन बोलणारी. तर
सांगायचंय हे की माझ्यापुरती ही कावेरी अम्मा फक्त पडद्यावर मर्यादित
राहिली नाही. अशीच एका कावेरी अम्मा मला प्रत्यक्षातही सापडली होती. तशीच क्रीम
किंवा कुठल्या तरी हलक्या रंगाची दाक्षिणात्य साडी नेसणारी. तशीच मार्दवाने
बोलणारी पण कर्तेपणाचा अलंकार ल्यालेली. ती ही पार पश्चिम घाटात, कर्नाटकात. आपण
विदर्भात म्हणतो ना तसल्या छटाकभराच्या गावात.. अगुंबे नावाच्या!
भारतातील सर्वात जास्त पाऊस ज्या काही ठिकाणांवर पडतो त्यातले एक अगुंबे!
पाऊस धो..धो पडतो म्हणजे काय होतं ते अगुंबेत अनुभवावं.. पाच वर्षे झाली जाऊन
तिथे… चित्र धूसर झालंय..पण ते पावसाचं पाणी पापण्यांवर पडल्यानंतर होत तसं… डोळे
मिटून घ्यावे आणि तो पापण्यांवरचा थेंब अनुभवावा तसं अगुंबे आठवतंय. घाटातील
वळणदार रस्ते चढून या डोंगराळ गावात पोहोचलो तो जुलै महिना होता. म्हणजे तिथला
सर्वाधिक पावसाचा महिना.. सरासरी २५०० मिमी पेक्षा जास्त पावसाचा. गावाला मध्यभागी छेदणारा पायवाटेपेक्षा जरासा
मोठा रस्ता. आणि दोन्ही बाजूला कौलारू घरे… याच रस्त्याच्या सुरुवातीला अगुंबेच्या
कावेरी अम्माचे घर होते. लाकडी जुने बांधकाम, पुरुषभर उंचीची भलीमोठी दगडी ओसरी.
बसायला लाकडी बाके अन् खुर्च्या.. जाड महाग लाकडाचे नक्षीदार दार आणि वाकून आत
प्रवेश केला की भला मोठा चौक.. वर छप्पर नसलेला आणि उघडं आकाश किंवा चांदणं थेट
अंगावर घेणारा. आम्ही होतो तेव्हा या चौकात पाऊस धाडधाड कोसळायचा आणि उतरत्या
छपरांवरून धारा ताल धरत नाचायच्या. उतारावरून कोसळणारा थेंब फुटण्याचा खेळ निवांत
बघत राहावं, अशी जागा. चौकाच्या मध्यभागी आपल्या सर्वांच्या कल्पनेत रुतलेलं
हुबेहूब तुळशी वृंदावन आणि चौकाच्या सभोवताल सगळ्यांच्या राहण्याच्या खोल्या.
घरच्या मुख्त्यार असलेल्या, सावकाश पावले टाकीत, आपला भारदस्त देह सांभाळीत
घरभर फिरणाऱ्या कावेरी अम्मांचा दरारा त्या वाड्यात सर्वत्र जाणवायचा. गावची
पाटलीण असते, तशा त्या गावातील प्रमुख होत्या. भरल्या घराचा अनुभव देणारा तो वाडा.
ओसरीवर बैठे खेळ खेळणाऱ्या परकर-पोलक्यातील मुली, आरामखुर्चीवर पेपर वाचत बसलेले
काका, अखंड जपमाळ खेळविणारी वयस्क आजी आणि काम करणाऱ्या बायका. या सगळ्यांवर
कावेरी अम्मांचा धाक, वरदहस्त आणि वरचष्माही होता. पहाटे पाच वाजता उठून ही बाई त्या वाड्याचा
कारभार हाती घ्यायची तो रात्र ओसंडून निजेपर्यंत. अख्ख्या घरावर जुन्या
घरंदाजपणाची आणि हातून निसटून चाललेल्या लोभस गतकालाची छाप होती. वापरण्याच्या
भांड्यांपासून ते पाणी तापवण्याचा भल्या थोरल्या बंबापर्यंत अनेक गोष्टी
तांब्याच्या. न्हाणीघर इतकं मोठं की पाय पसरून झोपावं. वाड्याचे रुपांतर होम स्टे
मध्ये झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी काही कायमच्या सोयी. वरच्या मजल्यावर
बाहेरच्यांची राहण्याची सोय. गज असलेल्या जुन्या खिडक्या. कमीतकमी प्रकाश आणि
सकाळच्या वेळी खिडकीतून येणारी सूर्यकिरणांची तिरिप. सबंध वातावरणातील भिजलेपण
वाड्याच्या रंध्रारंध्रात भिनलंय असं सारखं वाटत राहायचं.
या वाड्यात दोन की तीन दिवस राहिलो. केळीच्या पानांवर वाढला जाणारा
गरमागरम भात, त्याचे वेगवेगळे प्रकार, नेहमीच्याच पण दाक्षिणात्य पद्धतीने केलेल्या
भाज्या, लोणची आणि पापड. या सगळ्यांच्या जोडीला कावेरी अम्मा आणि तिच्या धाकाने
इतर महिलांनी आस्थेने केलेली वास्तपुस्त. आगुंबे अनेक अंगांनी आणि रंगांनी आत
उतरलंय.
आगुंबेतील घरही मोठी वैशिष्ट्यपूर्ण, छोटेखानी, उतरत्या छपरांची
आणि अफलातून रंगांची! त्या संबंध पश्चिम किनारपट्टीवरील घरांच्या रंगांचं मला मोठं
अप्रूप आहे. कोकणापासून केरळापर्यंत फिरताना घरांची विशेष रंगसंगती माझे लक्ष
वेधून घेते. म्हणजे आपल्याकडे रंग लावताना जरा हलका, क्रीम कलर हमखास मिसळलेला अशी
घरं दिसतील. तिथे म्हणजे फिक्का रंग वगैरे प्रकारच जगात अस्तित्वात नसावे असं वाटत
राहात. भडक लाल, पिवळा, जांभळा वगैरे एकदम डेंजर लाईक कलर्स. अनिल शर्माच्या एकाच
पिच्चरमध्ये नाही का अमरिश पुरी, डॅनी, प्रेम चोप्रा असे डेंजर डेंजर लोक राहायचे.
तसे एकाच रंगात सगळे हे भडकभुडक कलर्स.. पण मला मजा येते ही घरं बघताना. आगुंबेतही
तसलंच काहीसं चित्र होतं. आम्ही गेलो तेव्हा लोक शाकारणी करीत होते. गावाच्या
मध्यभागी पडकी दगडी शाळा आणि त्याला वळसा घालून गेलं की एक मोठा रस्ता आणि काही
लहान गल्ल्या. गावं संपल्यात जमा. कुठेही उभे राहा, असंख्य पक्ष्यांचे असंख्य
अनोळखी आवाज.
मालगुडी डेज आठवते का? त्यातील काही एपिसोडसचं शुटिंग या गावात
झालं होतं. आणि घरातलं शूटिंग थेट कावेरी अम्माच्या वाड्यातच. म्हणजे आम्ही तीन
दिवस जेथे राहिलो त्याच वाड्यात. मालगुडी डेज आणि आर. के. नारायण यांचं आपल्याला
आकर्षण असतं. विशेषत: दूरदर्शनवर पालनपोषण झालेल्यांना तर नक्कीच! त्याच वाड्यात
आपण राहतोय म्हटल्यावर का कुणास ठाऊक पण लय भारी वाटत होतं.
निघण्याच्या काही तास अगोदर कावेरी अम्मांना म्हटलं, तुमच्यावर
लिहिणार आहे मी, बोलायचंय. ‘माझ्यावर काय बोलायचं अन् काय लिहायचं’. पण, तरी त्या
बोलल्या. सकाळची सगळी कामे बाजूला ठेवून. तिखटा-मिठाच्या आणि मसाल्यांच्या
भल्या-थोरल्या डब्याशी खेळत. घड्याळात सकाळचे सहा वाजले होते तेव्हा बोलणे सुरू
केले. थांबलो तेव्हा तास उलटून गेला होता.
आगुंबे गावाचा परिसर ‘रेड कॉरिडॉर’ च्या पट्ट्यातील. माओवादाने
प्रभावित. सुरक्षा दलाचं लक्ष कावेरी अम्माच्याही वाड्याकडे असतं. ‘ते लोक येतात
का?’. बाई बोलेनात. ३-४ वेळा विचारल्यावर म्हणाली,‘ तू आलास-जेवलास ना. तसं आणखी
कोण कोण येत राहातं. प्रत्येकाला कसं
विचारणार’. मी मग पुढे काही रेटलं नाही.
कर्नाटकात आयुष्य गेलेली ही बाई, अस्खलित मराठीत बोलायचं. कानडी
हेल काढत. सानुनासिक. कारण, तिचं मूळ मराठी होती. कारण ती कावेरी अम्मा नव्हती.
तिचं खरं नाव होतं. कस्तुरी अक्का शेणॉय!
२०१३ मध्ये गेलो होतो. आता बरोबर पाच वर्ष उलटली. धो-धो पडणारा
पाऊस, रस्त्यांवरून वाहणारे पाट, चिंब भिजलेली घरे आणि ओसऱ्या. आगुंबेला पुन्हा
जाणं होणारही नाही आयुष्यात कधी, पण किंचित कुरळ्या केसांची सत्तरीची कावेरी अम्मा ऊर्फ कस्तुरी अक्का, तिचा
१२० वर्षे जुना वाडा आणि ते अख्खं जग… स्टिल कॅमेऱ्यानं टिपलंय मनाच्या. वारंवार
हा अल्बम उघडून बघण्यासाठी!
…………………………….