डिसेंबर महिन्याची संध्याकाळ…
किंवा रात्र म्हणा.. मेळघाटातील गारेगार वातावरणात आम्ही तीन मित्र निघालोय गाडीतून.
आजूबाजूच्या जंगलात मिट्ट् काळोख भरलेला आणि रस्ता सुनसान. सहज म्हणून एका ठिकाणी गाडी
थांबविली आणि तिघेही बाहेर आलो. वर मोकळं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि वातावरणातला
सॉलिड गारवा. अशा वेळी गझलगायक मित्र आल्हाद काशीकरच्या अंगात जगजित सिंगांचं वारं
घुसलं नसतं तरच नवल. तो ‘जिंदगी धूप तुम घना साया’ गुणगुणू लागला आणि गंधर्वाच्या घरचं
जेवण जेवलेल्या विकास केमदेवांनी सुमोच्या बॉनेटवर ताल धरला. पुढचा अर्धा तास जगजितसिंहांनी
आम्हाला भारून टाकलं होतं. आल्हादचा सूर थांबला तसा केमदेवांच्या ठेक्याने विराम घेतला
आणि जाणवलं, आता अंतर्बाह्य व्यापून टाकण्याची
जबाबदारी मेळघाटी शांततेने घेतली आहे. पुढची
काही मिनिटं ते मौन अंगात पाझरत होतं, अचानक आपलं सगळं अस्तित्व मौनात विरघळत चाललंय
अशी जाणीव दाटून राहिली आणि अंधारभारलं मौन नखशिखांत व्यापून उरलं.
मौन कायमच भावत आलंय
मला. पाऊस जसा प्यारा, तितकंच आकर्षण मौनाचंही.
आणि त्याच्या भिन्न भिन्न आविष्कारांचंही. अहिंसेच्या प्रॉडक्टला गांधीजींनी
ब्रँड बनवला तसा मौनाला विनोबांनी ग्लॅमर मिळवून दिलं. पण, कुठलंच मूल्य एका व्यक्तीचा
कॉपीराइट कसा असेल? मूल्य तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे अनुभवायचं असतं. मूल्याची अंतर्भूत
ताकदच जगणं व्यापून टाकण्याची असते आणि मौनाची तर निश्चितच असते. मौनाची अशी कवेत घेणारी रुपं आपल्यापैकी सगळ्यांनाच तर येऊन भिडत असतात
जागोजागी, क्षणोक्षणी!
कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या
इतिहास विभागात बसलो होतो. सोबतीला विज्ञान आणि पावसाचे कॉपीराइट ओनर मयुरेश प्रभुणे
होतेच. विद्यापीठात शिरतानाच कमालीचा उकाडा जाणवत होता आणि अवघ्या अर्ध्या तासात काळोख
दाटून आला. विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस काळोख दाटून आला.
विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस सरसरा कोसळू लागला. तिथल्याच
एका पॅसेजमध्ये उभा राहून पाऊस बघत होतो आणि समोरच्या बसक्या इमारतीवर मोर येऊन बसला.
गपगुमान पिसारा गुंडाळून पाऊसधारांमध्ये भिजत उभा होता. पाच मिनिटे, दहा मिनिटे करीत
तब्बल अर्धा तास पावसाचा नाद निनादत होता, तो मोर भिजत होता आणि मी अवाक्षरही न बोलता
तो पूर्ण वेळ हा अनुपम सोहळा बघत शांत होत होतो.
कुरुक्षेत्रात असंख्य
धार्मिक स्थळं आहेत. लोक दर्शनाला येत राहतात, आपण लोकांचं दर्शन घेत राहावं, असा काहीसा
खेळ चालला होता. समोर काही अंतरावर उंचापुरा, एकच एक भगवी कफनी घातलेला माणूस उभा होता.
का कुणास ठाऊक पण त्याच्यावर नजर खिळली होती. आणि एकाएकी त्या माणसाने उभ्या उभ्याच
भर गर्दीत आपला शरीरधर्म पार पाडला. उगाच आडपडद्याने का बोला, त्याने तेथेच विष्ठा
केली. अंगावर सरसरून काटा आला. जिताजागता माणूस समोर आहे, पण त्याचं अस्तित्व आहे काय
अन् नाही काय? असून काही उपयोग नाही.. नसून कुणाला दु:ख नाही. जिताजागता माणूस. मानवी
अस्तित्व अर्थहीन असल्याची भावना एकाएकी भीतीसारखी अंगभर पसरली. अर्थहीनतेचा हा अनुभव
यायलाही महाभारताच्या कुरुक्षेत्रातच यावे लागले, हा योगायोगच समजावा का? त्या एका
अनुभवाने सुन्नच झालो. सुन्नपणा हे ही मौनाचेच रुप म्हणावे का? की सुन्नपणाची परिणीती
मौन?
जंगलातून जाताना, पर्वताच्या
कड्यावरून दूरवर नजर फेकताना, कच्छच्या कच्छच्या लांबच लांब रस्त्यावर बसकण मारली असताना,
मौन भेटत राहिलं, मौन व्यापत राहिलं. मौन भारत राहिलं. पानिपतापासून काही अंतरावर
‘काला आम’ नावाची जागा आहे. पानिपतच्या तीनही युद्धांची आठवण म्हणून तेथे स्मारक उभे
राहिले आहे. स्थानिकांसाठी तो जॉगर्स पार्क आहे. आपल्या मराठी मनासाठी तो तसा कसा असू
शकेल? मयुरेश आणि मी ते सगळं बघून झाल्यावर एकही अक्षर न बोलता केवळ मावळतीचा सूर्य
अंगावर घेत बसून राहिलो. लाख मराठ्यांचा गहिवर आला होता का दाटून, माहीत नाही. कुरुक्षेत्र
आणि पानिपत ही नरसंहाराची दोन प्रतिकं आजूबाजूला असणे हा योगायोग अंगावर येत होता का,
माहीत नाही. आमच्या अवतीभवती कोण होतं, माहीत नाही. त्या सायंकाळी मौन तेवढा मनात रेंगाळत
बसलं होत, इतकंच काय ते आठवतं.
इतक्या ठिकाणी, इतक्या
जागी फिरलो. दर वेळेला या मौनाचं आकर्षण वाढत गेलंय. अनेकविध रुपात ते भेटत आलंय, मौनाचं
गारुड कायम राहिलंय. मध्यंतरी काही ओळी वाचल्या होत्या....
क्षितिज उभे डोळ्यात
सांजते,
चंद्र उन्हाची नसांत
शिंपण
गोकुळात वाळूत चालते
रात्ररात्र शब्दांची
गुंफण!
राधा-कृष्णाच्या प्रेमाचे
वर्णन करणारे हे शब्द सुंदरच आहेत. पण, मनात
विचार आला. राधा-कृष्णाला शब्दांची गरजच भासली नसेल. एकरूप होते म्हणतात ना ते! रात्र
रात्र भर, वाळून बसून, त्यांची शब्दांची नव्हे, तर मौनाचीच गुंफण चालत असावी. त्यांचे
मौनच इतके बोलके असावे की शब्दांचा अनावश्यक भार नकोसाच वाटत असणार. कुणास ठाऊक? रेंगाळत
असेल का तेथेही आजही असे मौन. जाऊन बघावे का एकदा कालिंदीच्या काठावर? मौनाचं ते दिव्य
रूप बघायला…. आणि मग मौनात विरून जायला….!