ऐसपैस पसरलेला वातावरणातील निवांतपणा, काहीसा
गूढ पण तरीही हवाहवासा वाटणारा सावली-प्रकाशाचा खेळ आणि जोडीला खिडक्या-छपरांवरून उतरू
पाहणाऱ्या वेली! प्रकाशाचा एक तिरपा कटाक्ष झेपावतो आणि त्याच कौला-वेलींवरून ओघळत
जातो शब्दांचा मेळ! प्रकाशाचा वाटेने शब्द उलगडत जातात. आपला भवताल गच्च धरून उभ्या
असलेल्या घराचे अवकाश कवेत येत जातं. किमया घडत जाते अन् घरं उमगत जातं!
माधव आचवलांनी १९६१ मध्ये लिहिलेलं ‘किमया’ हे
घरांबद्दल बोलणारं पुस्तक रंगकर्मी अतुल पेठे उलगडून दाखवत होते, तेव्हा आसपास असंच
काहीसं होत होतं. घर नावाचं अफाट प्रकरण आपल्या आयुष्यात तळ ठोकून बसलं असतं. उसवलेल्या
दिवसाला संध्याकाळचं अस्तर लावण्याच्या धडपडीत
या घराकडे बघणं राहूनच जातं. लाखा-लाखांची आपली घरं आपल्यासाठी ‘प्रवाशांसाठी निवारा’
झाल्यासारखी झाली आहे. बाहेरच्या जगाने घरातलं जगणं बॅकफूटवर ढकललंय. पाय पसरून, डोळे
मिटून अन् श्वास भरून घर स्वत:त सामावून घेण्याचे क्षणही तर मोजकेच झालेय.
कुणा त्या भन्नाट माणसाच्या डोक्यात आले असेल
ना, ‘चलो, अभी सेटल होना है’! आणि माणसाने भटकंती सोडून घरं बांधायला सुरूवात केली.
घरं काय अन् वास्तू काय! रंग, गंध, स्पर्श, सूर, नाद, इतिहास, भाषा, कला असे जगण्याचे
हजारो कंगोरे आपल्यात सामावून घेऊन उभ्या असतात. अन् एवढ्याने काय होतंय? माणसाच्या
जाणतेपणाचे आणि मूढत्वाच्या प्रवासाचे पुरावे
घेऊन वास्तू उभ्या आहेत जागोजागी! आपण, त्यांच्या समोर जाऊन उभं राहावं तर बोलायला
लागतात!
म्हणे, माणसांचा इतिहास हा स्थलांतरांचा इतिहास
आहे. आणि असं असेल तर घर काय असतं, हे स्थलांतरितांइतकं चांगलं कोण सांगू शकेल! येथे
पुन्हा आपण कधीही राहणार नाही, हे लक्षात आलं असतं. उंबरा ओलांडून आणि पाठ फिरवून जाण्याच्या
अगोदर घराच्या भिंती-दारांवरून हात फिरवून बघतात. काय साठवून घ्यायचं असतं त्या स्पर्शात!
जणू काही आयुष्यभर तो स्पर्श टिकणार आहे, अशा असोशीने चाललं असतं. पण, त्याचं महत्व
स्थलांतरितांना ठाऊक असतं, नाही तर मग मायबापाचं घर सोडून सासरी जाणाऱ्या लेकीला!
घरं बोलत राहतात, वास्तू सांगत राहतात. चित्र
बोलतात ना तसंच! आपल्या आपल्या मनस्थितीनुसार पट विणत राहतात. हो, मनस्थितीनुसार पालटतं
ना घरांचं जाणवणं! म्हणजे जी.ए.कुलकर्णी वाचून बाहेर पडलं तर एखादं घर केशवपन केलेल्या
लाल वस्त्रातल्या विधवेसारखं जाणवायला लागतं. पु,लं. वाचून फिरायला निघावं तर तेच घर
सुस्नात होऊन कोवळ्या उन्हात केस वाळवत बसलं असतं, नवथर तरुणीसारखं! घरं जाणवतात, निश्चितच!
घराशी बांधून राहणं हे भौतिकतेत गुंतत राहणं की
त्याच घरात देवासमोर बसून त्यांच्याशी खुल्ला संवाद साधणं हे मोह-मायेच्या पलीकडलं.
पहिलं जमलं तर राजस भाव रुजतो, दुसरं साधलं तर सात्विकतेचा सुगंध पसरतो. घरं, सगळंच
साधतात. घरं मंदिरं होऊन जातात. कोणार्क आणि खजुराहोसारखी. प्रतिकं होऊन जातात समृद्धी,
तादात्म्य, सौंदर्य, ऋजुता आणि एकरूपतेची! अध्यात्म तरी काय वेगळं असतं ना!
मंदार मोरोणे, नागपूर