दूरदर्शनच्या जमान्यातील काही मालिका आणि काही व्यक्तिरेखा आपल्या मनात कायमचे घर करून बसल्या आहेत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ मधील ‘माझ्या तुमच्या जुळता तारा’ सारख्या! नाही तर मग कार्यक्रम किंवा मॅच सुरू होण्यापूर्वी दिसणाऱ्या इस्टमनकलर आडव्या पट्ट्यांसारख्या. लहानपणीच्या आठवणींच्या कप्प्यात रुजलेली अशीच एक मालिका होती, मालगुडी डेज. त्यातही त्यातला तो ‘स्वामी’वाला मुलगा. त्याचा चेहरा, भाव, डोळे यांपासून ते त्या मालिकेतील दाक्षिणात्य वातावरणापर्यंत सगळं सगळं डोक्यात फिट्टं आहे. शिवाय मालगुडी डेजची शीर्षक सुरावटही. नंतरच्या की-पॅडवाल्या नोकिया मोबाइल्सच्या जमान्यात आपल्यापैकी कित्येकांनी ती रिंगटोन म्हणूनही मिरवली. आजही मध्येच कुठेतरी ‘तानाना तानानाना ना ’ ऐकू येतं आणि टाइममशीन आपल्याला मालगुडीच्या काळात घेऊन जातं.
नंतर... बरंच नंतर, कधी तरी कळले की मालगुडी डेज कुणीतरी आर.के.नारायण या माणसाने लिहिलंय अन् इंग्रजी साहित्यात ते मोठं वगैरे नाव आहे. तोपर्यंत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा काही प्रश्नच उद्भवला नव्हता आणि स्वाभाविकपणे सगळे पोषण मराठीच्या जीवावर चालले होते. तर, असाच कधीतरी आर.के.नारायण नाव ऐकलं आणि हा माणूस मोठा आहे, असेही कळले. पण, मालगुडीच्या आधी त्यांचे नाव पोहोचले होते, ते गाइड चित्रपटामुळे. दूरदर्शनवरच पहिल्यांदा बघितलेला हा चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता, हे कळले. त्यानंतर मालगुडीचा संदर्भ लागला.
तेव्हापासून आर.के.नारायण हे भारतीय साहित्यातील मोठे नाव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांकडून कानावर पडायला लागले. चांगले आणि नियमित इंग्रजी वाचणारे किंवा शिकवणारे लोक ‘नारायण’ वाचायला सांगायचे. त्यामुळेही आकर्षण निर्माण झाले होते. पण, तेव्हापासून आजतागायत आर.के.नारायण यांचं साहित्य मुळातून वगैरे वाचणे जमलेच नाही. म्हणजे गाइड किंवा मालगुडीचा थोडा अपवाद, कुठे तरी आलेले अनुवाद, मध्येच एखाद्या दिवाळी अंकात वाचलेला एखादा लेख, इंटरनेटवर केलेलं वाचन असाच काय तो संबंध आला. जुन्या पुस्तकांबद्दल आणि साहित्यिकांबद्दल हे असंच होतं. गिरीश कार्नाड वारले की आता त्यांचे सगळे लिखाण वाचूनच काढू असा न पूर्ण होणारा निर्धार केला जातो. जे कर्नाडांचे तेच नारायण यांच्या बाबतीतही. नवं काही तरी पुढे येतं, ते ताज्या संदर्भांवर आधारलेलं असतं आणि मग आधी तेच वाचले जाते. जुन्या चांगल्या साहित्याबाबतचा संकल्प पुन्हा तसाच राहतो. पण, असं सगळं असूनही ही मोठी माणसं मनात वसलेली असतातच. आणि म्हणूनच म्हैसूरला जायचं ठरलं तेव्हा आर.के.नारायण यांचे तेथील निवासस्थान बघायचेच हे ठरवून टाकले होते.
म्हैसूरचा स्थळदर्शनाच्या यादीत ‘नारायण-निवास’ वगैरे नव्हतेच. सामान्यत: म्हैसूर फिरायला जाणारे फार कुणी या ठिकाणाचा आग्रह धरत नसावेत. हा ‘नारायण’ म्हैसूर मुक्कामी राहायचा हे कदाचित माहीत नसावे अथवा अप्रूप नसावे. असलेच पाहिजे असाही काही नियम नाही. पण, माझे पक्के होते, की हे ‘आर.के.’ निवास बघायचेच. म्हैसूरची इतर सगळी ठिकाणे बघितल्यावर तिसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सांगितले. आर.के.नारायण यांचे घर बघायचे आहे. ‘कोई म्युझियम है क्या?’ माझा कन्नड ड्रायव्हर नंदीश त्यांच्या कन्नड हिंदीत उद्गारला. ‘हाँ, म्युझियमच है’ मी माझ्या मराठी हिंदीत उत्तर दिले. मग, नंदीशने प्रयत्न सुरू केला ते घर कुठे आहे ते शोधण्याचा. पण, त्याच्या ओळखीच्या कुणालाच अशी काही ‘टूरिस्ट प्लेस’ आहे, याचा थांगपत्ता नव्हता. अखेर, गुगलबाबांच्या मदतीने माग काढत पोहोचलो आणि विवेकानंद रोडवरील त्या साहित्यमहर्षीच्या घरासमोर जाऊन उभे ठाकलो. दारावरच पाटी होती, ‘आर.के.नारायण हाऊस’. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे नाव धारण करणाऱ्या सिद्धहस्त लेखकाचे घर.
भारतीय माणसाला गोष्टी आवडतात. आपलं जुनं सगळं साहित्य आपल्यापर्यंत गोष्टींच्याच तर रुपात पोहोचलेलं असतं. कशामुळे ठाऊक नाही, पण आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्टीवेल्हाळपणा ‘इन-बिल्ट’ आहे असं आपलं मला एक उगाच वाटत राहतं. ‘कसं आहे ना...’ ने सुरू करीत आपण हा गोष्टीवेल्हाळपणा रोजच खुलवीत असतो. आर.के. नारायण किंवा रस्किन बाँड यांचं साहित्य अशा ‘गोष्टी-स्वरुपा’मुळे आवडत असावं! अशाच आवडणाऱ्या, जगण्याच्या गोष्टी आयुष्यभर सांगत आलेला हा माणूस. पण, नारायण यांच्या घरात आपण प्रवेश करतो आणि त्यांची वेगवेगळी छायाचित्रे बघायला लागतो तेव्हा ही व्यक्ती बराचशी अबोल असावी, असं उगाचंच वाटत राहतं. एकदम गंभीर, दाक्षिणात्य विद्वतपुरुष वगैरे. काहीसा करारी. तरीही हजारो-लाखो वाचकांना भावेल अशी साहित्यनिर्मिती करणारा हा माणूस खुणावत राहतो.
म्हैसूरमधील जुन्या जमान्यातील भक्कम बांधकामाच्या दुमजली बंगल्याला उत्तम प्रकारे जपत त्याचे रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. सकाळी दहाच्या ठोक्याला उघडणाऱ्या या संग्रहालयात प्रवेश केला आणि भारतीय साहित्यात अजरामर ठरलेल्या या विद्वानाचे अनेक पैलू उलगडत गेले.
नारायण यांचा हा बंगला उत्तम प्रकारे जपला गेला आहे. मूळ घराचे स्वरुप तसेच राहील याची पुरेपूर काळजी घेत नवे काम करण्यात आले आहे. त्यांचे टेबल-खुर्ची, त्यांचे पोशाख, महत्वाच्या प्रसंगी, परिवाराबरोबर किंवा मोठ्या व्यक्तींबरेाबर काढलेली छायाचित्रे, भिंतीतील जुन्या पद्धतीच्या कपाटांमध्ये नीटसपणे रचून ठेवलेली ग्रंथसंपदा, त्यांच्या संग्रहातील इतर लेखकांची पुस्तके असा सगळा ऐवज आपल्याला त्यांच्या काळात घेऊन जातो. दुमजली बंगल्यात लहान-मोठ्या खोल्यांमधून नारायण यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल माहिती देणारे मोठाले फलक लावले आहेत. त्यांनी स्वत: केलेले लिखाण, त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेले लेख, पद्मविभूषणपासून ते इतर पुरस्कार, पुस्तकांची भली मोठी यादी या फलकांमधून मांडण्यात आले आहे. या घराचे संग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा एक स्वतंत्र फलक लावला आहे.
आणि, या शिवाय लक्ष वेधून घेतात ती भिंतींवर रंगविलेली नारायण यांचीच स्वत:ची वाक्ये. एकाहून एक. 'Do You realize how few ever really understand how fortunate they are in their circumstances?' अशी वेगवेगळी वाक्ये वाचून आपण चमकतो आणि एक क्षण विचारातही पडतो. नारायणाची शब्दशक्ती, अजून काय? बंगल्याचा खालचा मजला आणि चॉकलेटी रंगात रंगविलेला वळणदार जिना चढून गेल्यावर दिसणारा वरचा मजला... नारायण सर्वत्र व्यापला आहे.
खुशवंत सिंह यांच्यासारख्या समकालीन लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेले लेखही येथे वाचायला मिळतात. या सगळ्यात संदर्भातून जुजबी का होईना, भारतीय इंग्रजी साहित्यातील हा माणूस आपल्याला माहिती होत जातो. संयुक्त राष्ट्र संघात काम केलेले माजी सनदी अधिकारी सी.व्ही.नरसिंहन यांनी नारायण यांचा एक किस्सा सांगितला आहे. २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरसिंहन यांनी त्यांना अभिनंदनासाठी फोन केला तर त्यावर नारायण यांनी काय प्रतिक्रिया द्यावी, ‘आता मी पद्म विदूषक झालो’. दाक्षिणात्य नारळी तैलबुद्धी, आणखी काय? साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी देखील नारायणांचे नाव अनेकदा पुढे आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळू शकला नाही. असे एक ना अनेक पैलू या संग्रहालयाने कायमचे जतन करून ठेवले आहेत.
प्रचंड ग्रंथसंपदा असलेला हा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लिहिता होता. द हिंदूचे संपादक एन.राम त्यांना मृत्यूच्या काही तास अगोदर भेटले होते. व्हेंटिलेंटरवर असलेल्या नारायण यांनी त्यांना डायरी मागितली, कारण त्यांना आणखीही बरेच लिहायचे होते, सुचत होते. स्वत: राम यांनी लिहिलेला किस्साही येथे आपल्याला वाचायला मिळतो. शेवटपर्यंत सर्जकता टिकवून ठेवलेला तरीही ‘नव्वदीत गेल्यापासून मी लिहिण्याच्या बाबतीत अंमळ आळशीच झालो आहे’, असे मिश्किलपणे सांगणारा हा सिद्धहस्त लेखक आपल्याला त्या दुमजली घरात भेटत राहतो. आपल्याला दुरूनच माहिती असलेले आर.के.नारायण येथे किंचित जवळ येतात.
या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात म्हैसूर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नागपुरात ग्रेस, सुरेश भट यांच्यासारखी मोठी माणसे होऊन गेलीत. पण, नागपूर महापालिकेला त्यांचे स्मारक वगैरे उभे करावे, असे काही वाटले नाही, असा एक निरर्थक विचार माझ्यासारख्या नागपूरकराच्या मनात डोकावून गेला. पण, ते एक असो.
१९९० सुमारास नारायण यांनी हे घर सोडले आणि ते चेन्नईला राहायला गेले. १९४२ मध्ये लघुकथांचा संग्रह असलेले ‘मालगुडी डेज’ प्रसिद्ध झाले होते. जवळ जवळ सहा दशके हा माणूस लिहिता होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अरे हो, या लिहित्या घराला अद्यापही दररोज शंभरच्या वर लोक भेटी देतात, हा एक सुखद धक्का तेथील ‘व्हिजिटर्स रजिस्टर’मुळे बसतो.
नशीब नावाची गोष्ट मोठी मजेदार असते. आर. के. नारायण नावाचा प्रचंड प्रतिभाशाली माणूस एका घरात जन्माला घातला. पण, त्या कुटुंबाचे सद्भाग्याचे पारडे बरेच मोठे असावे. त्याच घरात अजून एक प्रतिभावंत दिला पाठवून. नाव मिळाले, आर.के.लक्ष्मण! तेच, कॉमन मॅनवाले प्रसिद्ध व्यंगचित्रकार. नारायण यांच्या लेखनाला पूरक रेखाचित्रे लक्ष्मण यांनीच काढली होती. दोन भावंडांनी मिळून भारताला भरभरून आनंद दिला. दोन्ही भावांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. नारायण-लक्ष्मणाची जोडी रामायणानंतर भारतात पुन्हा अवतरली होती. आपल्यासारखे आपणच भाग्यवान.
‘मालगुडी डेज’ या मालिकेचे काही भाग कर्नाटकातील अगुंबे या गावात आणि तेथील एका वाड्यात चित्रित झाले होते. त्या आगुंबेला भेट देण्याची, अगदी त्याच वाड्यात राहण्याची संधी २०१३ मध्ये मिळाली होती. त्या ‘मालगुडी’च्या जनकाचे स्मरण जागविणारी वास्तू सहा वर्षांनी बघायला मिळायली. एक वर्तुळ पूर्ण झाले. आता, आर.के.नारायण वाचले पाहिजेत, मुळातून.....!