परवा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. इटलीमधील लेखिकेच्या पत्राच्या अनुवादाचे त्यांनी वाचन केले होते. पण, या सिद्धहस्त अभिनेत्रीचा हा व्हिडियो बघितल्यावर एक प्रचंड भीतीची, निराशेची भावना निर्माण होते. या उलट, अमिताभ बच्चन यांच्यासह देशभरातील इतर अनेक कलाकारांना घेऊन दुसरा एक व्हिडियो तयार करण्यात आला होता. तो मात्र अत्यंत सकारात्मक होता आणि धीर देणाराही. बर्वे यांनी काय सादर करावे ही निवड अर्थात त्यांची आहेच. पण मुद्दा येथे सकारात्मकतेचा आहे. सध्या संकटकाळात आपल्या विचारांमधून, कृतीतून काय पेरायचंय, हा या मागचा विचार आहे.
आणि येथेच सामान्य माणसाच्या मदतीला भारतीय विचार, पद्धती आणि अगदी कर्मकांडेही मदतीला धावून येतात. घरी बसून काही न करता करोनाच्या बातम्या वाचणे आणि त्या संबंधित आकडेवारीचा रोज मागोवा घेत राहणे काहींसाठी रंजक असेलही पण बहुतेकांसाठी नाही. आणि त्यातून भीती आणि नकारात्मकता रुजतच नाही असे कुणी छातीठॊकपणे सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला व्यग्र ठेवणे, ते ही सकारात्मक गोष्टींमध्ये, हे अत्यंत आवश्यक आहे. या करिता भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक पर्याय सहज उपलब्ध करून दिले आहे. आपले धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक साहित्य अशी सकारात्मकता आपल्यात पेरत जाते. आता प्राचीन साहित्य म्हणजे चमत्कारांच्या कथा नव्हे. अर्थात त्यातूनही अनेकांना समाधान मिळते आणि ते मिळूही दिले पाहिजे. तॊ दैववाद आहे हे मान्य करुनही!
पण, भारतीय साहित्य या पलीकडे बरेच काही आहे. आधुनिकीकरणाकडे जाताना आपण जगभराचे साहित्य आत्मसात करत गेलॊ पण काहीसे आपल्याच आध्यात्मिक साहित्याकडे दुर्लक्ष झाले. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा या सर्वज्ञात साहित्यापासून इतर अक्षरश: हजारो गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. आवड, पिंड, कल, पातळी या प्रत्येक गॊष्टीनिहाय हे साहित्य उपलब्ध आहे. आणि त्याच्या वाचनातून आपल्यात काय पेरले जाते तर ती सकारात्मता! संकटकाळातही निभावून जाईल हा विश्वास. नकारात्मकतेचा स्पर्शही आपल्याला हॊऊ शकत नाही इतकी शक्ती या प्राचीन भारतीय पारंपारिक साहित्यात आहे. आणि हे मी शुद्ध वैचारिक ठेव्याबद्दल बोलतॊ आहे. चमत्काराच्या कथांबद्दल नाही.
ही सकारात्मकता आपल्या जीवनशैलीने आणि या विचारांच्या नकळत आपल्यावर झालेल्या संस्कारांनीही भारतीयांच्या आयुष्यात पेरली आहे. माझा एक मित्र म्हणतॊ,’ आपण भारतीय फार चिवट आहोत’. हे जे चिवटपण आहे ते या पोषणातून आले असावे असे वाटत राहते. भारतीय परंपरांना दैववादी म्हणून नाकारता येऊ शकते. पण, त्यातून भारतीयांमध्ये दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी, संयम पेरला आहे हे ही नाकारता येत नाही. तो भक्तीमार्गातून, देवाच्या आराधनेतून रुजला असला तरी त्या मागचे तत्त्व हे शुद्ध आध्यात्मिक आहे. आणि कदाचित कुणाला पटणार नाही पण त्यातून सकारात्मकता आपोआप तुमच्यात रुजत जाते.
बुद्धीवादाचे समर्थक यास दैववादाचा अनाठायी अट्टाहास म्हणून नाकारू शकतात. पण खरे तर असे नाही. केवळ बुद्धीच प्रमाण मानली तर त्या निकषावरही भारतीय साहित्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते.
'सदा सर्वदा देव सन्निध आहे
कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'
हे सांगणारा समर्थांचा श्लोक दैववाद सांगत नाही. तो संकटकाळातही स्थिरबुद्धीने वाटचाल करीत राहण्याचे, संयमाचे आणि अर्थात सकारात्मकतेचे महत्व सांगत असतो. आपण, या विचारांकडे डोळसपणे बघत नाही हा आपला दोष, त्या साहित्याचा नव्हे. आणि हा तर केवळ एक श्लोक आहे. अशा अगणित गोष्टी सांगता येतील.
’बाहेर जाणे बंद असताना आत डोकावण्याची उत्तम संधी आहे’ या अर्थाचा एक मेसेज खूप प्रसृत झाला आहे. भारतीय आध्यात्मिक साहित्य हे अशा आत डोकावण्याचे साठीचे उत्तम साधन आहे.
........................................