युद्धांच्या साठ आणि सत्तरच्या दशकांतील लोकांच्या मनातील आठवणी सांगणारी पिढी आपल्या अवतीभवती आहे. त्या काळातील, ’युद्धस्य कथा रम्या’ आपण ऐकलेल्या, चित्रपटांत बघितलेल्या असतात. दरम्यानच्या पाच दशकांच्या कालावधीत युद्धांचे स्वरुपही बदलले आणि कथानकातील रम्यताही. सरळसोट कथानकांना तंत्रज्ञानाचे फाटे फुटू लागले आणि ’कनेक्टेड’ जगाचे अंतरंग अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले. या सगळ्याचा परिणाम इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे युद्धांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रांमधील शह-काटशहांचा खेळ आता सायबरजगातही खेळला जाऊ लागला आहे. प्रत्यक्षातील मोहर्यांच्या ’डिजिटल’ चालींकडे काळजीपूर्वक बघावेच लागते. कारण, आभासी वाटत असले तरी या जगातील हालचालींचा प्रत्यक्षावर होणारे परिणाम दीर्घकालीन आणि खोलवरही असतात.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा सायबर खेळ भारत-चीन यांच्यातील ताज्या संघर्षाने पुन्हा एकदा अधोरेखित केला. दोन महिन्याच्या तणातणीनंतर चीनने लदाख सीमेवरील आपले सैन्य काहीसे मागे घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. वरवर शांतता असली तरी येत्या काळात भारताला सायबर हल्ल्यासारख्या परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते असे अंदाज याआधीच व्यक्त झाले आहेत. दरम्यान, सायबर युद्ध ही संकल्पना अजूनही अनेक सामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडील असली तरी युद्धांच्या जगात आता ती रुळलेली आणि रुजलेलीही आहे. सायबर हल्ल्यांचे प्रकार आणि परिणाम किती विविध प्रकारचे असू शकतात याचेही अनेक दाखले उपलब्ध आहेत. सामरिक सत्तेची अमर्याद महत्वाकांक्षा बाळगणार्या चीनने या सायबर युद्धाचा वापर कधीपासूनच सुरू केला आहे. अमेरिकेच्या माहितीसाठ्याचा भेद करण्यासाठी कितीतरी वर्षांपासून चीन हे करीत आला आहे. अमेरिकेची मिसाइल्स, शस्त्रास्त्र साठा, संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती यामध्ये हॅकिंगची मालिकाच चीनने राबविली होत. २०१३ मध्ये अमेरिकन सरकारने जाहीरपणे चीनचा नामोल्लेख करीत याबाबत माहिती दिली होती. पण, चीनच्या बाबतीतील ही काही एकच घटना नाही. अमेरिकेच्या एफबीआयने त्यावेळी चीनने २ लाखांच्या आसपास सायबर गुप्तहेर आणि हल्लेखोरांचे सैन्यच उभारले असून अमेरिकेच्या संरक्षण विषयाशी संबंधित माहितीवर वर्षाकाठी तब्बल ९० हजार हल्ले केले जातात असे सांगितले होते. आणि केवळ संरक्षण क्षेत्रात नव्हे तर अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या माहितीवर असे हल्ले चीनकडून होत असल्याचेही दाखले आहेत. अगदी न्यूयॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या वृत्तपत्राकडे चीनविषयी काय माहिती आहे हे काढून घेण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेवर सायबर हल्ले झाले आहेत. शिवाय, चीन हे फक्त अमेरिकेच्या बाबतीतच हे करतो आहे असे नाही. जगातील एकूण सायबर हल्ल्यांपैकी सुमारे ४१ टक्के हल्ले हे एकट्या चीनकडून होत असतात. बाजार कोणताही असॊ, तिथे चीनचा वाटा सर्वोच्च असतॊ, याचे असेही एक उदाहरण.
ताज्या संघर्षात असे हल्ले भारतावरही होऊ शकतात हे सांगणार्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक शासकीय संस्था, माध्यमे, औषध क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र अशा विविध ठिकाणी हे हल्ले होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे, जे अमेरिकेच्या बाबतीत झाले ते आपल्याही बाबतीत होईल याची शक्यता तज्ज्ञ मांडत आहेत.
ब्रिगेडियर सौरभ तिवारी यांनी चीनच्या सायबर वॉर क्षमतांबद्दल एक शोधनिबंधच प्रसिद्ध केला आहे. ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर तो मुळातून वाचता येऊ शकतो. मागील किमान दशकभरापासून चीन भारताच्या विविध संस्थांवर सायबरलक्ष ठेवून आहे. डीआरडीओ, बीएसएनएल यांच्या संकेतस्थळांचे हॅकिंग, उत्तर भारतातील पॉवर ग्रीडमधील बिघाड अशा घटनांचा संबंध चीन-पाकिस्तान युतीच्या भारतावरील सायबर हल्ल्यांशी जोडला आहे.
याच नीतीचा एक भाग हा वैचारिक गोंधळ आणि मतामतांचा गलबला उडवून देणे हा आहे. आपल्या सरकारने सत्य माहिती दिली पाहिजे अशी आपली वाजवी अपेक्षा असते. पण, सरकारकडून येणारी माहिती खरी की चीनकडून येणारी खरी, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न याच संघर्षादरम्यान झाला. दुसर्या राष्ट्रात आपली बाजूच खरी वाटेल अशा पद्धतीने मांडणारे ’ओपिनियन मेकर्स’ तयार करणे हा तर राजकीय मुत्सद्देगिरीचा भागच आहे. चीनने भारतातही असे हस्तक पेरले असल्याची माहिती संरक्षणविषयातील तज्ज्ञ देत असतात. किंबहुना, कोव्हिड-१९ नंतर जगाने चीनवर टीका करणे सुरू केल्यावर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अशी मोठी फौजच चीनने जगभरात तैनात केली आहे. ’माहितीच्या गोंधळाचे’ हे शस्त्रही एका अर्थी सायबर युद्धाचाच एक भाग आहे.
ही तुलनेने नवी युद्धपद्धती येत्या काळात अधिकाधिक प्रमाणात वापरली जाईल आणि भारताला त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहावे लागेल. मोबाइलमुळे आपल्या रोजच्या जगण्यात हे सायबर तंत्रज्ञान स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोचले आहे. कनेक्टेड विश्वात जगणार्या आपल्यासारख्या सामान्यांनाही येत्या काळात याकडे अधिक जागरुकतेने बघावे लागणार आहे. कारण, यातील प्रत्येक गोष्टीचा फटका समाजाला, अर्थव्यवस्थेला आणि देशाला बसत असतो. युद्धखोर मानसिकता नसावी, पण युद्धसदृष्य परिस्थितीला तोंड देण्याची समाजाची मानसिक तयारी मात्र जरूर असावी. थेट युद्ध न करता समोरच्या राष्ट्राचे आणि तेथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करणे हे तर सायबर युद्धाचे प्रमुख प्रयोजन. ते तसे न होऊ देणे आणि त्या दृष्टीने आपली मानसिकता तयार करणे सामान्यांसाठीही आता अगत्याचे आहे.
संदर्भ:
१. फ्युचर क्राइम्स: लेखक- मार्क गुडमन
२. चायनाज सायबर वॉरफेअर कॅपॅबिलिटीज: ब्रि. सौरभ तिवारी, संकेतस्थळ: ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’
..............................................