Saturday, 29 August 2020

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*


चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’ असे अभियानच सुरू केले आहे. आपण लहान मुलांना सांगतो -पानात काही टाकू नका- अगदी तसाच सल्ला जिनपिंग यांनी दिला आहे. चीनमध्ये कोणतेही सरकारी अभियान हे महाप्रचंड लाटेसारखे असते तसेच हे ’स्वच्छ ताटांचे’ अभियानही मोठ्या प्रमाणावर राबविले जाते आहे, जाईल. कम्युनिस्ट सरकारची यंत्रणा, संपूर्ण शासकीय़ नियंत्रणातील प्रसार माध्यमे आणि अगदी खाद्यपेय-हॉटेल्स संघटनाही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. चीनमधील एकपक्षीय हुकुमशाही यंत्रणेत ते जोरकसपणे राबविले जाईल, यात काहीच शंका नाही.


वस्तुत: अशाच प्रकारच्या अभियानाची घोषणा जिनपिंग यांनी २०१३ मध्येही केली होती. पण, या वेळेसच्या घोषणेला पार्श्वभूमी कोव्हिडची, चीनमध्ये आलेल्या पुरांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून निर्माण झालेल्या अन्नटंचाईची आहे. त्यातून, अन्नधान्याच्या आणि चीनी जेवणात महत्वाचा घटक असलेल्या मांसाहारी अन्नाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेवणादरम्यान अन्न वाया जाऊ नये यासाठी चीनी अध्यक्षांनाच लक्ष घालावे लागले आहे.


चीनी सरकार शक्यतो नागरिकांच्या खाद्यसंस्कृती आणि खाण्याच्या सवयी यांमध्ये हस्तक्षेप करीत नाही. माओंच्या काळात लोकांना मिळणार्‍या अन्नधान्यावर बंधने आली होती आणि लोकांमध्ये त्याची प्रतिक्रियाही उमटली होती. त्यानंतर, मात्र सहसा असे कधी करण्यात आलेले नाही. कारण, चीनी समाजात जेवण, टेबल मॅनर्स, खाण्यापिण्याचे विधिनिषेध आणि संकेत या बाबी संवेदनशील आहेत. त्यांचे पालन करण्यावर चीनी माणसाचा कटाक्ष असतो. आणि यातच भरपूर अन्न वाया जाण्याचे इंगित आहे.


आपल्याकडे महाराष्ट्रात ताट कसे वाढावे याचे नियम आहेत. डावीकडे मीठ-लिंबू वाढण्यापासून या नियमांची सुरुवात होते. काळाच्या ओघात आणि या संस्कृतीची माहितीच नसणे या कारणांमुळे त्याचे सरसकट पालन होत नाही. मात्र, चीनमधील घरांमध्ये या खाद्यसंस्कृतीला आणि खाद्यशिष्टाचाराला प्रचंड महत्व आहे. जेवताना ताटातील आणि टेबलवरील सगळे अन्न संपणे हे यजमानासाठी कमीपणाचे ठरते. त्यामुळे, आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न तयार करणे, टेबलवर मांडणे, ऑर्डर करणे हे प्रकार होतात. जेवणाच्या अखेरीस आपल्या ताटात काहीच न उरणे हे यजमानाचे मन दुखावणारे असल्याने पाहुण्यालाही त्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे, अगदी तुडुंब पोट भरले, आता खाऊ शकणार नाही इतका दिलेर पाहुणचार तुम्ही केलाय हे संकेतातून मांडण्यासाठीही पानात काही पदार्थ तसेच ठेवले जातात. शिवाय, मोठाल्या मेजवान्या देणे हे चीनी शिष्टाचाराचे प्रतिक आहे. सत्तेच्या आणि उद्योगक्षेत्राच्या ’एलिट’ वर्तुळात अशा मोठ्या मेजवान्या हा नित्याचा भाग आहे. तिथेही हे शिष्टाचार पाळले जातात. ताटात अन्न उरणे हे श्रीमंतीचे आणि सुबत्तेचेही लक्षण मानले जाते. इतिहासातील अनेक वर्षे उपासमार आणि दुष्काळासारखी संकटे अनुभवल्याने नंतरच्या काळात असे नियम तयार होत गेले असावे असाही अंदाज काही ठिकाणी मांडण्यात आला आहे. अशा सगळ्या प्रकारांमुळे चीनी अन्न वाया जाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. एका संदर्भानुसार दरवर्षी चीनमध्ये वाया जाणार्‍या अन्नातून सुमारे २० लाख लोकांना जेवायला देता येऊ शकते. चीनचा ७० टक्क्यांपेक्षा अधिक कचरा हा टाकलेल्या अन्नामुळे निर्माण होतो. जिनपिंग यांनी राबविलेल्या याच मोहिमेचा रोख अशा अनेक गोष्टी नियंत्रणात आणण्याकडे आहे, असे सांगितले जाते.


या व्यतिरिक्तही अनेक चीनी खाद्य शिष्टाचार आहेत आणि त्यांची माहितीही रंजक आहे. तुम्हाला जेवण नुसते आवडून चालत नाही किंवा ढेकर देण्याने भागत नाही. आम्ही भरपूर खाल्ले, जेवण प्रचंड आवडले आणि आता जेवणाच्या स्टिक्सच्या अग्रभागावर मावेल इतकेदेखील आम्ही खाऊ शकत नाही हे तुम्हाला यजमानाच्या नजरेस आणून द्यावे लागते. जेवणाच्या पसंतीबद्दल तुमच्या भावना व्यक्त करणे महत्वाचे असते.


भात हे प्रमुख अन्न आणि त्याबरोबर इतर पदार्थ असे चीनी जेवणाचे स्वरूप असते. जेवताना सर्वाधिक ज्येष्ठ, प्रमुख व्यक्ती किंवा शिक्षक यांनी कुठे बसावे याचे नियम आहेत. खाण्याच्या स्टिक्स वेगळ्या आणि वाढण्याच्या वेगळ्या. दरम्यान, एखाद्याबद्दल अत्याधिक आपलेपणा दाखवायचा असल्यास आपल्या स्टिकसनी त्याला पदार्थ वाढण्याचीही एक पद्धत आहे. कोव्हिडच्या काळात अशाच काही पद्धती चीनी नागरिकांनी सोडून द्यावा असेही एक आवाहन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. आपल्या स्टिक्स अन्नात उभ्या रोवून ठेवू नये असाही एक संकेत आहे. त्याचा संबंध चीनी पूजापद्धतीशी असल्याने जेवताना तसे करणे निषिद्ध ठरवले आहे. दरम्यान, हातात चॉपस्टिक्स आहेत आणि वेळही आहे म्हणून प्लेटसवर अलगद ताल धरला असे काही चालणार नाही. हा पंगतीत बसलेल्या ज्येष्ठांचा अपमान समजला जाईल.


हे आणि असे अनेक नियम चीनी जेवणपद्धतीत आहेत. आपल्या या प्राचीन शेजार्‍याचा इतिहासही समृद्ध आहे आणि मुख्य म्हणजे तो लिखित स्वरुपात आहे. याच प्राचीन इतिहासात चीनची खाद्यसंस्कृती विकसित होत गेली आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या पिढीनुसार त्यात बदलही होत गेले आहेत. एखादा देश मोठा होतो तेव्हा तो केवळ सामरिकदृष्ट्या वर्चस्व गाजवित नाही. आपल्या संस्कृतीतील गोष्टी जगाने स्वीकाराव्या यासाठीही तो ’सॉफ्ट पॉवर’ वापरत असतो. साहेबांचे क्रिकेट, अमेरिकनांचे संगीत आणि चित्रपट तशी ही चीनची खाद्य संस्कृती. आपला ’योगा’ ही त्याच गटातला. व्यापक राजकारणाचाच तो एक भाग असतो. आणि आपल्या राजकारणासाठी चीन तर अतिमहत्वाचा. ’सॉफ्ट पॉवर’ चीनी खाद्य आपण स्वीकारले आहे पण एकंदर चीनी समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल आपल्याला फारसे माहिती नसते. आपली मान वळली की पश्चिमेकडे जाते पण येणारा काळ हा या उत्तर-पूर्वेकडील शेजार्‍याकडे नजर लावून बसण्याचा आहे हे सांगायला आता तज्ज्ञांची गरज उरलेली नाही.


7775095986


mandarmoroney81@gmail.com

Sunday, 12 July 2020

सायबर गोंधळाची चीनी युद्धनीती





युद्धांच्या साठ आणि सत्तरच्या दशकांतील लोकांच्या मनातील आठवणी सांगणारी पिढी आपल्या अवतीभवती आहे. त्या काळातील, ’युद्धस्य कथा रम्या’ आपण ऐकलेल्या, चित्रपटांत बघितलेल्या असतात. दरम्यानच्या पाच दशकांच्या कालावधीत युद्धांचे स्वरुपही बदलले आणि कथानकातील रम्यताही. सरळसोट कथानकांना तंत्रज्ञानाचे फाटे फुटू लागले आणि ’कनेक्टेड’ जगाचे अंतरंग अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले. या सगळ्याचा परिणाम इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे युद्धांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रांमधील शह-काटशहांचा खेळ आता सायबरजगातही खेळला जाऊ लागला आहे. प्रत्यक्षातील मोहर्‍यांच्या ’डिजिटल’ चालींकडे काळजीपूर्वक बघावेच लागते. कारण, आभासी वाटत असले तरी या जगातील हालचालींचा प्रत्यक्षावर होणारे परिणाम दीर्घकालीन आणि खोलवरही असतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा सायबर खेळ भारत-चीन यांच्यातील ताज्या संघर्षाने पुन्हा एकदा अधोरेखित केला. दोन महिन्याच्या तणातणीनंतर चीनने लदाख सीमेवरील आपले सैन्य काहीसे मागे घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. वरवर शांतता असली तरी येत्या काळात भारताला सायबर हल्ल्यासारख्या परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते असे अंदाज याआधीच व्यक्त झाले आहेत. दरम्यान, सायबर युद्ध ही संकल्पना अजूनही अनेक सामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडील असली तरी युद्धांच्या जगात आता ती रुळलेली आणि रुजलेलीही आहे. सायबर हल्ल्यांचे प्रकार आणि परिणाम किती विविध प्रकारचे असू शकतात याचेही अनेक दाखले उपलब्ध आहेत. सामरिक सत्तेची अमर्याद महत्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनने या सायबर युद्धाचा वापर कधीपासूनच सुरू केला आहे. अमेरिकेच्या माहितीसाठ्याचा भेद करण्यासाठी कितीतरी वर्षांपासून चीन हे करीत आला आहे. अमेरिकेची मिसाइल्स, शस्त्रास्त्र साठा, संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती यामध्ये हॅकिंगची मालिकाच चीनने राबविली होत. २०१३ मध्ये अमेरिकन सरकारने जाहीरपणे चीनचा नामोल्लेख करीत याबाबत माहिती दिली होती. पण, चीनच्या बाबतीतील ही काही एकच घटना नाही. अमेरिकेच्या एफबीआयने त्यावेळी चीनने २ लाखांच्या आसपास सायबर गुप्तहेर आणि हल्लेखोरांचे सैन्यच उभारले असून अमेरिकेच्या संरक्षण विषयाशी संबंधित माहितीवर वर्षाकाठी तब्बल ९० हजार हल्ले केले जातात असे सांगितले होते. आणि केवळ संरक्षण क्षेत्रात नव्हे तर अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या माहितीवर असे हल्ले चीनकडून होत असल्याचेही दाखले आहेत. अगदी न्यूयॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या वृत्तपत्राकडे चीनविषयी काय माहिती आहे हे काढून घेण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेवर सायबर हल्ले झाले आहेत. शिवाय, चीन हे फक्त अमेरिकेच्या बाबतीतच हे करतो आहे असे नाही. जगातील एकूण सायबर हल्ल्यांपैकी सुमारे ४१ टक्के हल्ले हे एकट्या चीनकडून होत असतात. बाजार कोणताही असॊ, तिथे चीनचा वाटा सर्वोच्च असतॊ, याचे असेही एक उदाहरण.

ताज्या संघर्षात असे हल्ले भारतावरही होऊ शकतात हे सांगणार्‍या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक शासकीय संस्था, माध्यमे, औषध क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र अशा विविध ठिकाणी हे हल्ले होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे, जे अमेरिकेच्या बाबतीत झाले ते आपल्याही बाबतीत होईल याची शक्यता तज्ज्ञ मांडत आहेत.

ब्रिगेडियर सौरभ तिवारी यांनी चीनच्या सायबर वॉर क्षमतांबद्दल एक शोधनिबंधच प्रसिद्ध केला आहे. ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर तो मुळातून वाचता येऊ शकतो. मागील किमान दशकभरापासून चीन भारताच्या विविध संस्थांवर सायबरलक्ष ठेवून आहे. डीआरडीओ, बीएसएनएल यांच्या संकेतस्थळांचे हॅकिंग, उत्तर भारतातील पॉवर ग्रीडमधील बिघाड अशा घटनांचा संबंध चीन-पाकिस्तान युतीच्या भारतावरील सायबर हल्ल्यांशी जोडला आहे.

याच नीतीचा एक भाग हा वैचारिक गोंधळ आणि मतामतांचा गलबला उडवून देणे हा आहे. आपल्या सरकारने सत्य माहिती दिली पाहिजे अशी आपली वाजवी अपेक्षा असते. पण, सरकारकडून येणारी माहिती खरी की चीनकडून येणारी खरी, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न याच संघर्षादरम्यान झाला. दुसर्‍या राष्ट्रात आपली बाजूच खरी वाटेल अशा पद्धतीने मांडणारे ’ओपिनियन मेकर्स’ तयार करणे हा तर राजकीय मुत्सद्देगिरीचा भागच आहे. चीनने भारतातही असे हस्तक पेरले असल्याची माहिती संरक्षणविषयातील तज्ज्ञ देत असतात. किंबहुना, कोव्हिड-१९ नंतर जगाने चीनवर टीका करणे सुरू केल्यावर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अशी मोठी फौजच चीनने जगभरात तैनात केली आहे. ’माहितीच्या गोंधळाचे’ हे शस्त्रही एका अर्थी सायबर युद्धाचाच एक भाग आहे.

ही तुलनेने नवी युद्धपद्धती येत्या काळात अधिकाधिक प्रमाणात वापरली जाईल आणि भारताला त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहावे लागेल. मोबाइलमुळे आपल्या रोजच्या जगण्यात हे सायबर तंत्रज्ञान स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोचले आहे. कनेक्टेड विश्वात जगणार्‍या आपल्यासारख्या सामान्यांनाही येत्या काळात याकडे अधिक जागरुकतेने बघावे लागणार आहे. कारण, यातील प्रत्येक गोष्टीचा फटका समाजाला, अर्थव्यवस्थेला आणि देशाला बसत असतो. युद्धखोर मानसिकता नसावी, पण युद्धसदृष्य परिस्थितीला तोंड देण्याची समाजाची मानसिक तयारी मात्र जरूर असावी. थेट युद्ध न करता समोरच्या राष्ट्राचे आणि तेथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करणे हे तर सायबर युद्धाचे प्रमुख प्रयोजन. ते तसे न होऊ देणे आणि त्या दृष्टीने आपली मानसिकता तयार करणे सामान्यांसाठीही आता अगत्याचे आहे.

संदर्भ:

१.    फ्युचर क्राइम्स: लेखक- मार्क गुडमन

२.    चायनाज सायबर वॉरफेअर कॅपॅबिलिटीज: ब्रि. सौरभ तिवारी, संकेतस्थळ: ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’


..............................................

Tuesday, 2 June 2020

त्यानेनमेन चौकाला 'बायपास' नाही!



काही वर्षांपूर्वीचे अण्णा हजारेंचे आंदोलन आठवतेय का? तत्कालीन केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि केवळ दिल्ली-मुंबईत नव्हे तर देशाच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन एकत्र येत होते, मोर्चे काढत होते आणि देशातील भ्रष्टाचाराचा शांततापूर्ण निषेध करीत होते. पण, आज हे आठवण्याचे कारण काय? कारण हे की आज ४ जून आहे आणि जगाच्या इतिहासात आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या नरसंहाराचा म्हणून ओळखला जातॊ. चीनमधील त्यानेनमेन नरसंहाराचा.

आंतरराष्ट्रीय राजकारणात क्रौर्याचे दाखले नवीन नाहीत आणि चीनसाठी तर नक्कीच नाही. त्यानेनमेनमधील विद्यार्थीसंहार हे एक ठळक आणि तुलनेने अलीकडचे उदाहरण. पण त्याआधीही, माओंच्या सांस्कृतिक महाक्रांती किंवा लांब उडीसारख्या प्रयोगातील हजारॊ मृत्यू आणि चॅंग कै शेकच्या राजवटीत झालेले अत्याचार हा देखील ताजाच इतिहास. अगदी गेल्याच शतकातील. त्यामुळे, नरसंहार, क्रौर्य आणि चीन हे कायमच एकमेकांत गुंफलेले समीकरण आहे. तुलनेने प्रचंड शांततेत जगणार्‍या बहुसंख्य भारतीय़ांच्या कक्षेपलीकडील.

त्यानेनमेन चौकातील नरसंहार ही एका रात्रीतून घडलेली घटना नव्हती.  ४ जून १९८९ रोजी हा हिंसाचार घडला असला तरी त्याची पाळेमुळे किमान १० वर्षांपासून चीनमध्ये रुजत होती. १९७९ पासूनच चीनमध्ये लोकशाहीची मागणी आणि ती करणार्‍यांना शिक्षा सुरू झाल्या होत्या. माओत्तर आणि डेंग झाओपिंग यांचा हा काळ. खुली अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणा यांनी लोकशाहीचेही वारे चीनमध्ये आणले होते आणि त्याचा परिणाम तरुणांवर होत होता. भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांना घेऊन चीनमध्ये १९८९ साली विद्यार्थ्यांनी आंदोलनांना सुरूवात केली होती. दशकभर साचत आलेल्या या भावनांचे विशाल स्वरुप १९८९ मध्ये त्यानेनमेन चौकात प्रत्ययास येत होते. मे महिन्यापासूनच अनेक विद्यार्थी, नागरिक आणि कामगार या चौकात एकत्र येत होते. किती मोठा जमाव असावा हा? तेव्हाचे रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह हे नेमके त्याच वेळेस चीनच्या दौर्‍यावर आले होते. १५ मे १९८९ रोजी ते बीजिंगला पोहोचले तेव्हा त्यानेनमेन चौकात तब्बल १० लाख तरुण जमले होते अशा नोंदी आहेत. रशियन राष्ट्रप्रमुखासमोर ही सगळी निदर्शने सुरू होती आणि चीनचे तत्कालिन सरकार हतबलपणे बघण्याशिवाय इतर काहीही करू शकत नव्हते. राजकीयदृष्ट्या अत्यंत नाट्यमय असलेल्या या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील पाश्चात्य माध्यमांचे प्रतिनिधी बीजिंगमध्ये हजर होते आणि लगोलग बातम्या पोहोचवीत होते. गोर्बाचेव्ह रशियाला परतल्यानंतरही ही निदर्शने सुरूच होती आणि त्यांची तीव्रता सातत्याने वाढत होती. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन सचिव झाओ झियांग यांच्यासारख्या काही नेत्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा, आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला, मध्यस्थीही केली. पण, हे निर्नायकी आंदोलन काही संपले नाही. अखेर, चीनचे तत्कालिन प्रमुख नेते डेंग यांनी २० मे रोजी मार्शल लॉ लावण्याचे आदेश दिले. इतके करुनही त्यानेनमेन चौक रिकामा होत नव्हता. हजारॊंच्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक तेथे जमा होत होते. ३ जूनच्या रात्री पंतप्रधान ली फंग यांनी लष्कराला हा चौक पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिलेत. रणगाडे आणि चिलखती गाड्यांसह चीनी लष्कर चौकाकडे जाऊ लागले पण त्यांना मार्गात तरुण आणि नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत होता. जुन्या गाड्या, फर्निचर आणि इतर गोष्टी रस्त्यात आणून टाकल्या जात होत्या आणि लष्कराच्या मार्गात अडथळे आणले जात होते. नागरिकांचे हे अडथळे दूर करण्यासाठी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. अगदी आपापल्या घरांच्या खिडक्यांमध्ये, गॅलर्‍यांमध्ये उभे असलेल्यांचेही या गोळीबारात मृत्यू झाले. रस्त्यावर मारले गेले ते वेगळेच. चीनची लोकमुक्तीसेना ही तेथील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगितले जात असे. त्या दिवशी मात्र, बेरोजगार तरुण, कामगार, सरकारी कर्मचारी, गृहिणी, वयस्क अशा सगळ्यांचा विरोध सैन्याला झेलावा लागला आणि चिरडावाही.

सैन्याचे जवान त्यानेनमेन चौकात पोहोचले तेव्हा पहाट उजाडायला सुरुवात झाली होती. यावेळी तेथे सुमारे लाख-दीड लाख लोक उपस्थित होते, बव्हंशी तरुण. आणि सकाळ पूर्ण उजाडली तेव्हा अख्खा चौक निर्मनुष्य झाला होता. कारण, मधल्या काही तासांमध्ये शेकडॊ लोक गोळीबारात बळी पडले, हजारॊ जखमी झाले, कित्येकांनी मार खाल्ला, काही अर्धवट जखमींनाही मारले गेले. यात तरुण मुले, मुली आणि आपल्या बाळांना घेऊन आलेल्या महिलाही होत्या असे सांगितले जाते. चीनच्या सरकारने, लष्कराने आपल्याच लोकांचा नरसंहार घडवला. नेमके किती लोक मेले आणि किती जखमी झाली याची निश्चित आकडेवारी जगापुढे कधीही आली नाही. ४०० पासून ते १० हजारांपर्यंत मृतांचा आकडा सांगितला गेला आहे. पाश्चात्य माध्यमे, जपानी माध्यमे यांच्यात हा आकडा जास्त येत होता तर चीनी सरकारच्या कठॊर नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांमध्ये तो अत्यंत कमी सांगितला जात होता. शिवाय नागरिकांनी केलेल्या हिंसाचारात सैनिकही ठार झाले आणि मारले गेले.

 इंटरनेटवर आपल्याला गोळीबाराचे, निदर्शनांचे काही व्हिडियोज, एक माणूस रणगाड्यांची वाट अडवत असल्याचा व्हिडियो बघायला मिळतॊ. सहजपणे वाचायला मिळते तेही सगळे इतर देशांच्या माध्यमांमधील. चीनच्या माध्यमांमधील जवळजवळ नाहीच. तिथे हे दडवले जातेच. जगभरात चीनच्या या क्रौर्याचा निषेध करण्यात आला होता. पण, रंजक बाब अशी की अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय़ सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर तसेच काही उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या कृतीचे समर्थन केले होते. कारण, त्यावेळेची अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि व्यापाराची गरज वेगळी होती. जगासाठी हे तरुण लोकशाहीची मागणी करणारे आंदोलक होते, तर चीनी कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावर ’प्रतिक्रांतिकारक’ असा शिक्का मारला होता. असा शिक्का मारण्याचे काय संदर्भ असतात हे कम्युनिस्ट जगताचा अभ्यास असणारे लोक चांगल्या प्रकारे समजू शकतात.

आज या हत्याकांडाला बरोबर ३१ वर्षे झाली आहेत. नृशंस हत्यांकांडाचा हा इतिहास चीनने मागे टाकला आहे. हत्याकांड घडविणारे डेंग झाओपिंग यांच्याच धोरणांमुळे गरिबीतून चीन श्रीमंत राष्ट्र म्हणून दरम्यानच्या काळात पुढे आला. आता ही आर्थिक समृद्धी अनुभवलेली नवी तरूण पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीला या इतिहासाशी काही घेणेदेणे नसल्याचे सांगितले जाते. चार दशकांचा रक्तरंजित चीन अनुभवलेल्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठांना पुन्हा त्या भीषण कालखंडाकडे जाणे नकोसे वाटते. त्यानेनमेन चौकाला बायपास करून आताचा चीन वेगळ्या वाटेने निघाला आहे, असे अभ्यासक सांगतात.

पण, चीन या स्मृती विसरू बघत असला तरी जग तसे होऊ देत नाही. राष्ट्र आणि शासन म्हणून चीन कोणत्या थराला जाऊ शकतो हे अधोरेखित करण्यासाठी त्येनानमेनचा संदर्भ वारंवार पुढे येत राहतॊ. त्येनानमेनच्या स्मृती जागविणारे प्रदर्शन आयोजित करण्यावर मकाऊ प्रांताने बंदी घातल्याच्या बातम्या सध्या पुढे येत आहेत. हॉंगकॉंग आणि चीन हा संघर्ष सध्या पेटलेला आहे. मागील वर्षी ४ जूनला हॉंगकॉंगचे हजारॊ नागरिक एकत्र आले आणि मेणबत्त्या पेटवून त्यांनी त्येनानमेनच्या स्मृतींना उजाळा दिला. या वर्षी देखील तेथे मोठी निदर्शने होणार आहेत. हॉंगकॉंग हा पुढचा त्यानेनमेन चौक ठरू नये अशीही प्रार्थना आणि भीती विविध ठिकाणी व्यक्त होते आहे.

 लाखो लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस सोडण्याचे क्रूर काम चीन करू शकतो का, असा भाबडा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात विचारला जातो आहे. हा विषाणू चीननेच पसरविला आहे का हे माहिती नाही, पुरावेही नाहीत पण चीन क्रूर होऊ शकतॊ हे मात्र निश्चित. या राष्ट्राचा कम्युनिस्ट आणि बिगरकम्युनिस्ट इतिहास त्याची साक्ष देत उभा आहे. त्यानेनमेन त्याचे ठसठशीत प्रतिक आहे.

७७७५०९५९८६

http:/mandarmoroney.blogspot.com

संदर्भ:

१.     ड्रॅगन जागा झाल्यावर: अरुण साधू

२.     इंटरनेटवरील नियतकालिके, वार्तापत्रे, अहवाल.

..........................................

Thursday, 21 May 2020

पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग





हे असे म्हणे दर ६० वर्षांनी होते आणि निश्चितपणे होतेच. किमान चीनी मान्यतेनुसार तर घडून येतेच. म्हणजे असे की, दर ६० वर्षांनी या लाल तार्‍याच्या देशावर मोठे संकट येते. अगदी त्या देशात लाल तारा उगवला नव्हता तेव्हापासून. १८४० मध्ये ब्रिटनशी झालेले अफूचे युद्ध आणि त्यातील चीनचा पराभव, १९०० मध्ये बॉक्सर बंडाळी आणि पाश्चात्य, ख्रिश्चन फौजांनी केलेली मानहानी, १९६० मधील प्रचंड मोठा दुष्काळ, त्यापाठॊपाठ माओंची प्रसिद्ध ’लांब उडी’ आणि त्यातून ३ ते ४ कोटी लोकांचे भुकेने झालेले मृत्य़ू. एक ना अनेक आपत्ती आणि त्या ही बरोबर दर ६० वर्षांनी. आणि आता २०२० मध्ये पुन्हा एकदा करोनाने चिन्यांच्या मनातील हा अपशकुन खरा ठरविला आहे. आणि या वेळेस केवळ चीनच नव्हे तर संपूर्ण जगावर अपशकुनाचे वादळ घोंघावते आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा योगायोग, जे घडले आहे आणि घडते आहे ते जगासमोर आहे. ६० वर्षांनंतर चीन पुन्हा एकदा जागतिक मानहानीला तोंड देतो आहे.

करोना विषाणूने अवघ्या जगाला ग्रासल्यानंतर या संकटाकरिता चीनला दोषी धरणे सुरू झाले. अगदी अलीकडे पर्यंत अनेकांनी नावही न ऐकलेला चीनचा वुहान प्रांत तर सर्वतोमुखी झाला. तेथील प्रयोगशाळेतच हा विषाणू तयार झाला असावा असा दाट संशय जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर त्याचा अनेकदा जाहीर उल्लेख केला आहे, किंबहुना तशी मोहीमच उघडली आहे. इतर युरोपीय राष्ट्रे देखील उच्चरवाने चीनविरोधी सूर काढीत आहेत. आणि त्यामुळे या सगळया प्रकाराला पाश्चात्य राष्ट्रे विरुद्ध चीन अशा संघर्षाचे स्वरूप आले आहे. आपल्यावर असे संघटित आक्रमण होते आहे हे बघितल्यावर चीन तरी कसा शांत बसेल? आक्रमकता, स्वत:बद्दलचा प्रचंड अभिमान, बाहेरील टीका ऐकून न घेणे आणि इतर जगाकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती ही चीनची ऐतिहासिक गुणवैशिष्ट्ये आहे. पाश्चात्यांच्या आक्रमक प्रचाराला चीननेही आपल्या प्रचारयंत्रणेमार्फत तितकेच प्रबळ उत्तर देणे सुरू केले आहे. विविध राष्ट्रांमधील चीनचे राजदूत, प्रचारयंत्रणेतील अधिकारी, चीनी सत्ताधारी पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणात असलेली वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे यांनी आरोपांना केवळ प्रत्युत्तरच दिले नाही तर उलट टीकाही सुरू केली आहे. त्यामुळे, चीन आणि पाश्चात्य राष्ट्रे यांच्यातील या वाग्युद्धाचा मोठाच धडाका सध्या उडाला आहे.  अनेक देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबतच्या बातम्या आणि लेख रोजच येत आहेत. चीनी राजदूतांनी आक्षेपार्ह वक्तव्ये दिली म्हणून फ्रान्स, कझाकस्तान, नायजेरिया आणि इतर काही राष्ट्रांनी त्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

या सगळ्यातून एकीकडे पाश्चात्य राष्ट्रे आणि दुसरीकडे एकटा चीन असे दृश्य उभे राहिले आहे. चीनमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. पाश्चात्य राष्ट्रे एकत्र येऊन, ठरवून चीनला एकटे पाडत आहेत, हे चीनी सरकारने मनावर घेतले आहे. याला चीनी भावविश्वात ऐतहासिक संदर्भ आहे आणि चीनच्या दृष्टीने तो अपमानास्पद व दुखराही आहे. चीनविरोधात उघडलेली ही आघाडी ही या नव्या महासत्तेला ’बॉक्सर बंडाची’ आठवण करून देणारी आहे आणि म्हणूनच अधिक डिवचणारी देखील.

शतकाची सुरुवात बॉक्सर बंडाळी

विसावे शतक हे चीनच्या इतिहासात ’बॉक्सर बंडाळी’ घेऊन आले. चीनच्या सगळ्या भागांमध्ये युरोपीय व्यापार्‍यांनी हातपाय पसरले होते आणि आपले वर्चस्वही निर्माण केले होते. युरोपियांनी अवघा चीन आपसातील सामंजस्याने आपल्या व्यापारासाठी वाटून घेतला असता. या राष्ट्रांनी ठरविले असते तर त्याचवेळी चीनचे तुकडे झाले असते. एकीकडे युरोपीय व्यापारी भरमसाठ नफा कमवीत असताना चीनच्या जनतेला याचा काहीही लाभ होत नव्हता. युरोपियनांच्या वर्चस्ववादाला स्थानिकांचा विरोध होता. आणि याच असंतोषाचा स्फोट झाला १९०० मध्ये, हेच ते चीनच्या आधुनिक इतिहासातील प्रसिद्ध असे बॉक्सरचे बंड.

बंडखोरांनी युरोपीय व्यापारी आणि मिशनर्‍यांवर हल्ले सुरू केले. त्याला तत्कालिन चीनी राजघराण्याची देखील साथ होती. सुरुवातीला बंडखोरांनी युरोपीयांना मोठा तडाखा दिला आणि अनेक चीनी ख्रिश्चन तसेच युरोपीय त्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यानंतर, मात्र सर्व युरोपीय एकत्र आले, त्यांच्या राष्ट्रांच्या फौजानी त्यांना साथ दिली आणि जोरदार उत्तर दिले. इंग्रज, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, इटली आणि अमेरिका अशा पाश्चात्य जगातील सर्वांचाच यामध्ये समावेश होता. पाश्चात्य फौजांच्या ताकदीपुढे चीनी बंडखोर टिकाव धरू शकले नाहीत. दोन्ही बाजूंनी मोठा रक्तपात झाला आणि युरोपीयांचा विजय झाला. चीनवर अनेक अपमानास्पद अटी लादण्यात आल्या. युरोपियांनी स्वत:करिता आणखी सवलती पदरात पाडून घेतल्या. या युद्धातील चीनी लढवय्ये हे बहुतांश शेतकरी होती आणि मार्शल आर्ट्स किंवा चाइनिझ बॉक्सिंग जाणणारे होते. त्यामुळे या युद्धाला ’बॉक्सर’ चे बिरुद चिकटले आहे.

चीनचा असाच अपमानास्पद पराभव १८४० च्या सुमारास झालेल्या अफूच्या युद्धांमध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षांनी झालेल्या बॉक्सर बंडाळीतही नामुष्की आली. या दोन्ही युद्धांना चीनच्या इतिहासात मोठे मह्त्व आहे आणि खरे तर त्या ठसठसणार्‍या जखमा पण आहेत. एकीकडे बॉक्सरच्या बंडाळीकडे आस्थेने बघणारा वर्ग आणि दुसरीकडे या बंडाला काही प्रमाणात कमी लेखणारा वर्ग आजही चीनमध्ये आहेच. थोडेफार आपल्याकडील १८५७ च्या उठावासारखेच. आज करोनाच्या काळात चीन विरुद्ध इतर पाश्चात्य राष्ट्रे असा उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षालाही ’बॉक्सर बंडाळी’ सारखा संदर्भ जोडण्यात येतॊ आहे. मात्र, गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला तसा अपमान यावेळी होऊ द्यायचा नाही ही खबरदारी चीनने घेणे सुरू केले आहे. आणि म्हणूनच त्याने पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीस तॊड प्रचार चालविला आहे. बॉक्सरचा हा संदर्भ देणारी अनेक विश्लेषणे सध्या जगातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातून चीनच्या या पैलूकडे अभ्यासक अंगुलीनिर्देश करीत आहेत.

पण, या वेळी चीनची इतिहासात झाली तशी मानहानी होईल का, या बाबत सगळ्यांना शंका आहेत. करोनामुळे आजघडीला जरी चीनबाबत संपूर्ण जगभर नाराजीची भावना असली तरीही या नव्या संभाव्य महासत्तेला थेट आणि दीर्घकाल दुखावण्याची हिंमत फारशी राष्ट्रे करणार नाहीत. भारताने देखील चीनला धारेवर धरलेले नाही. कारण, सगळ्याचे मूळ हे चीनची आर्थिक आणि सामरिक सत्ता आहे. शिवाय, करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय साहित्याची मदतही अनेक राष्ट्रांना चीनकडून मिळते आहे. एकोणविसाव्या किंवा विसाव्या शतकात होता तसा विखुरलेला, ढेपाळलेला चीन आता राहिलेला नाही. तेव्हा अपमान सहन करावा लागला, मात्र आता तॊ करणार नाही. आणि मनातील सल तर कधीही जाऊ देणार नाही. तॊ चीनी स्वभावच नाही. एकीकडे वैद्यकीय साहित्याची मदत आणि दुसर्‍या बाजूला आक्रमक प्रचार या आयुधांनी चीनने स्वत:चा ’नॅरेटिव्ह’ उभा करणे सुरू केले आहे. अमेरिका आणि युरोपची सध्याची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे भविष्यातील उगवता सूर्य पूर्वेकडेच आहे, हे ही सगळे जाणून आहेत. त्यामुळे, अगदीच दंडवत घातले नाहीत तरीही ’दुरून नमस्कार देवाला’ अशी सोयीस्कर भूमिका बहुतांश देश घेतील. चीनची बॉक्सिंग कितीही आवडत नसली तरीही!

........................................

Friday, 10 April 2020

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे



परवा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. इटलीमधील लेखिकेच्या पत्राच्या अनुवादाचे त्यांनी वाचन केले होते. पण, या सिद्धहस्त अभिनेत्रीचा हा व्हिडियो बघितल्यावर एक प्रचंड भीतीची, निराशेची भावना निर्माण होते. या उलट, अमिताभ बच्चन यांच्यासह देशभरातील इतर अनेक कलाकारांना घेऊन दुसरा एक व्हिडियो तयार करण्यात आला होता. तो मात्र अत्यंत सकारात्मक होता आणि धीर देणाराही. बर्वे यांनी काय सादर करावे ही निवड अर्थात त्यांची आहेच. पण मुद्दा येथे सकारात्मकतेचा आहे. सध्या संकटकाळात आपल्या विचारांमधून, कृतीतून काय पेरायचंय, हा या मागचा विचार आहे.

आणि येथेच सामान्य माणसाच्या मदतीला भारतीय विचार, पद्धती आणि अगदी कर्मकांडेही मदतीला धावून येतात. घरी बसून काही न करता करोनाच्या बातम्या वाचणे आणि त्या संबंधित आकडेवारीचा रोज मागोवा घेत राहणे काहींसाठी रंजक असेलही पण बहुतेकांसाठी नाही. आणि त्यातून भीती आणि नकारात्मकता रुजतच नाही असे कुणी छातीठॊकपणे सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला व्यग्र ठेवणे, ते ही सकारात्मक गोष्टींमध्ये, हे अत्यंत आवश्यक आहे. या करिता भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक पर्याय सहज उपलब्ध करून दिले आहे. आपले धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक साहित्य अशी सकारात्मकता आपल्यात पेरत जाते. आता प्राचीन साहित्य म्हणजे चमत्कारांच्या कथा नव्हे. अर्थात त्यातूनही अनेकांना समाधान मिळते आणि ते मिळूही दिले पाहिजे. तॊ दैववाद आहे हे मान्य करुनही!

पण, भारतीय साहित्य या पलीकडे बरेच काही आहे. आधुनिकीकरणाकडे जाताना आपण जगभराचे साहित्य आत्मसात करत गेलॊ पण काहीसे आपल्याच आध्यात्मिक साहित्याकडे दुर्लक्ष झाले. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा या सर्वज्ञात साहित्यापासून इतर अक्षरश: हजारो गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. आवड, पिंड, कल, पातळी या प्रत्येक गॊष्टीनिहाय हे साहित्य उपलब्ध आहे. आणि त्याच्या वाचनातून आपल्यात काय पेरले जाते तर ती सकारात्मता! संकटकाळातही निभावून जाईल हा विश्वास. नकारात्मकतेचा स्पर्शही आपल्याला हॊऊ शकत नाही इतकी शक्ती या प्राचीन भारतीय पारंपारिक साहित्यात आहे. आणि हे मी शुद्ध वैचारिक ठेव्याबद्दल बोलतॊ आहे. चमत्काराच्या कथांबद्दल नाही.

ही सकारात्मकता आपल्या जीवनशैलीने आणि या विचारांच्या नकळत आपल्यावर झालेल्या संस्कारांनीही भारतीयांच्या आयुष्यात पेरली आहे. माझा एक मित्र म्हणतॊ,’ आपण भारतीय फार चिवट आहोत’. हे जे चिवटपण आहे ते या पोषणातून आले असावे असे वाटत राहते. भारतीय परंपरांना दैववादी म्हणून नाकारता येऊ शकते. पण, त्यातून भारतीयांमध्ये दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी, संयम पेरला आहे हे ही नाकारता येत नाही. तो भक्तीमार्गातून, देवाच्या आराधनेतून रुजला असला तरी त्या मागचे तत्त्व हे शुद्ध आध्यात्मिक आहे. आणि कदाचित कुणाला पटणार नाही पण त्यातून सकारात्मकता आपोआप तुमच्यात रुजत जाते.

बुद्धीवादाचे समर्थक यास दैववादाचा अनाठायी अट्टाहास म्हणून नाकारू शकतात. पण खरे तर असे नाही. केवळ बुद्धीच प्रमाण मानली तर त्या निकषावरही भारतीय साहित्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते.

'सदा सर्वदा देव सन्निध आहे

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'

हे सांगणारा समर्थांचा श्लोक दैववाद सांगत नाही. तो  संकटकाळातही स्थिरबुद्धीने वाटचाल करीत राहण्याचे, संयमाचे आणि अर्थात सकारात्मकतेचे महत्व सांगत असतो. आपण, या विचारांकडे डोळसपणे बघत नाही हा आपला दोष, त्या साहित्याचा नव्हे. आणि हा तर केवळ एक श्लोक आहे. अशा अगणित गोष्टी सांगता येतील.

’बाहेर जाणे बंद असताना आत डोकावण्याची उत्तम संधी आहे’ या अर्थाचा एक मेसेज खूप प्रसृत झाला आहे. भारतीय आध्यात्मिक साहित्य हे अशा आत डोकावण्याचे साठीचे उत्तम साधन आहे.

........................................

Sunday, 5 April 2020

सिंफनी- ओळख पाश्चात्य संगीताची



भारतीय संगीत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्यापर्यंत स्वाभाविकपणे पोहोचत असते. कधी ते शास्त्रीय संगीत म्हणून तर कधी लोकगीत म्हणून. पाश्चात्य संगीताची मात्र आपली फारशी सलगी नसते, माझ्यासारख्या अनेकांची तर तोंडओळखही नसते. आपल्या भोवतालच्या वातावरणातून ते स्वाभाविकपणे आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यातील बहुतांश लोक पाश्चात्य संगीताच्या त्या वैभवाला मुकले असतात. आरडाओरडा आणि ठणठणाट म्हणजे केवळ पाश्चात्य संगीत नव्हे हे आपल्यापर्यंत पोहोचलेच नसते. ते ऐकून त्यातील सौंदर्य कसे अनुभवावे ही जाण माझ्यासारख्या अनेकांची विकसित झालेली नसते. पण, पाश्चात्य संगीत समजून घेऊन त्यातला आनंद घेणारेही दर्दी असतात आणि त्यांना त्यातले चांगले-वाईटही कळत असते. जागतिकीकरण आणि त्यातही स्मार्ट्फोनच्या काळात जगभरातील संगीत प्रचंड गतीने आणि मोठ्या प्रमाणात पोहोचले. पण, हे सगळे नव्हते तेव्हाही आपल्याकडे पाश्चात्य संगीताचा कान विकसित झालेले लोक कमी संख्येने- मुख्यत्वे मोठ्या शहरांतील- का असेना पण होतेच. पण माझ्यासह अनेकांना पाश्चात्य संगीत हे काहीसे अगम्यच असते. अशांना पाश्च्यात्य संगीताची तोंडऒळख सोप्या शब्दांत करून देण्याचे काम अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित ’सिंफनी’ हे पुस्तक करून देते.

पाश्च्यात्य संगीताची सुरुवात आणि विकास चर्चच्या सानिध्यात झाला. युरोपात गाजलेले अनेक संगीतकार, वादक आणि गायक हे चर्चच्या छत्राखाली आणि सान्निध्यात आपल्या संगीताची आराधना आणि काम करीत होते. किंबहुना, पाश्चात्य संगीताचा सुरुवातीचा मोठा कालखंड हा चर्चच्या आधाराने विकसित झाला आहे. सिंफनी हे पुस्तक या संपूर्ण कालखंडाविषयी विस्ताराने माहिती देते. मध्ययुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत असा पाश्चात्य संगीताचा वेध हे पुस्तक घेते. बाख, बीथोवन, मोझार्ट यांच्यापासून ते एल्विस प्रिस्ले, बीटल्स आणि मायकेल जॅक्सनपर्यंत अनेक दिग्गजांची कारकीर्द, त्यांचे काम, आयुष्यातील चढ-उतार आणि यशापयश असा सगळा पट पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जातो. पाश्चात्य संगीतातील अनेकविध संज्ञाही पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात पाश्चात्य संगीताविषयी रस निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत भरगच्च माहिती असते, त्याचा  प्रत्यय येथे देखील येतो.

वर उल्लेख केलेल्या महान संगीतकारांची चरित्रेही विस्ताराने आणि चांगल्या पद्धतीने दिली आहेत. किंबहुना, तो या पुस्तकातील सर्वात रंजक भाग असावा. संगीतकारांची कारकीर्द आणि त्यांचे जीवन यांच्या वर्णनाच्या ओघात युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीचे ओझरते दर्शन आपल्याला घडत जाते.

विविध कालखंडात विभागणी करून पाश्चात्य संगीताची माहिती पुस्तकात देण्यात आलेली आहे. ती वाचताना आपण त्या जगाकडे निश्चितच खेचलॊ जातो. मात्र, सुरुवातीच्या काळातील संगीतावरील लेखन कदाचित पुरेशा ताकदीने संपादित झालेले नाही आणि काहीशा तुटकपणे मांडले गेले आहे असे वाटत राहते.

पाश्च्यात्य संगीताचा कालखंड हा मध्ययुगापासून या पुस्तकात गृहित धरण्यात आला आहे. इ.स. पूर्व ५०० च्या आधी ’ अंधार युग’ होते असेही मानले जाते. जवळजवळ नवव्या शतकापर्यंत युरोपियन चर्च संगीत आणि या वादन कला प्रकाराला ’सैतानाची कला’ म्हणून संबोधत होते. भारतीय़ संस्कृतीत संगीताचा माग काढला तर आपण अगदी वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. भारतीय संगीताला किमान चार हजार वर्षांचा इतिहास आहे यासारखे उल्लेखही सुखावणारे आहेत. राजे आणि श्रीमंताच्या आश्रयाने संगीताचा विकास झाल्याचे दाखले आपल्याकडे दिसतात. असाच प्रकार पाश्चात्य जगातही होता.

कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य बघावे की बघू नये हा नेहमीच वादाचा विषय असतो. गाजलेल्या पाश्चात्य संगीतकारांचे आयुष्य भारतीय मानकांनुसार कसे विस्कळित आणि अस्थिर होते हे ही पुस्तकातून जाणवत राहते. किंबहुना, ते वाचताना जागोजागी अलीकडेच येऊन गेलेल्या ’उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आठवण येत राहते.

सिंफनी हे पुस्तक पाश्चात्य संगीताकडे आकर्षित करणारे निश्चितपणे आहे. ज्यांनी ते अद्याप ऐकले नाही त्यांनी तशी सुरुवात करण्याची मनोभूमिका हे पुस्तक तयार करून देते. याच पुस्तकातील काही वाक्ये उद्धृत करून शेवट करतो.

’संगीत आपले आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करते. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेते. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणते. आपल्या अंतर्मनाला बाह्य स्वरुपात व्यक्त होण्यास मदत करते. आनंद, राग आणि  दु:ख या तिन्हीमध्ये संगीत साथ देतं. आत्मिक समाधानाची अनुभूती म्हणजे संगीत!’

अशी अनुभूती ज्याला ज्या संगीतातून मिळेल त्याने ती तिथून घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते भारतीय असो, पाश्चात्य किंवा मग दोन्हीही!

Saturday, 13 July 2019

नमन नारायणा

दूरदर्शनच्या जमान्यातील काही मालिका आणि काही व्यक्तिरेखा आपल्या मनात कायमचे घर करून बसल्या आहेत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ मधील ‘माझ्या तुमच्या जुळता तारा’ सारख्या! नाही तर मग कार्यक्रम किंवा मॅच सुरू होण्यापूर्वी दिसणाऱ्या इस्टमनकलर आडव्या पट्ट्यांसारख्या. लहानपणीच्या आठवणींच्या कप्प्यात रुजलेली अशीच एक मालिका होती, मालगुडी डेज. त्यातही त्यातला तो ‘स्वामी’वाला मुलगा. त्याचा चेहरा, भाव, डोळे यांपासून ते त्या मालिकेतील दाक्षिणात्य वातावरणापर्यंत सगळं सगळं डोक्यात फिट्टं आहे. शिवाय मालगुडी डेजची शीर्षक सुरावटही. नंतरच्या की-पॅडवाल्या नोकिया मोबाइल्सच्या जमान्यात आपल्यापैकी कित्येकांनी ती रिंगटोन म्हणूनही मिरवली. आजही मध्येच कुठेतरी ‘तानाना तानानाना ना ’ ऐकू येतं आणि टाइममशीन आपल्याला मालगुडीच्या काळात घेऊन जातं.
नंतर... बरंच नंतर, कधी तरी कळले की मालगुडी डेज कुणीतरी आर.के.नारायण या माणसाने लिहिलंय अन् इंग्रजी साहित्यात ते मोठं वगैरे नाव आहे. तोपर्यंत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा काही प्रश्नच उद्भवला नव्हता आणि स्वाभाविकपणे सगळे पोषण मराठीच्या जीवावर चालले होते. तर, असाच कधीतरी आर.के.नारायण नाव ऐकलं आणि हा माणूस मोठा आहे, असेही कळले. पण, मालगुडीच्या आधी त्यांचे नाव पोहोचले होते, ते गाइड चित्रपटामुळे. दूरदर्शनवरच पहिल्यांदा बघितलेला हा चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता, हे कळले. त्यानंतर मालगुडीचा संदर्भ लागला.
तेव्हापासून आर.के.नारायण हे भारतीय साहित्यातील मोठे नाव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांकडून कानावर पडायला लागले. चांगले आणि नियमित इंग्रजी वाचणारे किंवा शिकवणारे लोक ‘नारायण’ वाचायला सांगायचे. त्यामुळेही आकर्षण निर्माण झाले होते. पण, तेव्हापासून आजतागायत आर.के.नारायण यांचं साहित्य मुळातून वगैरे वाचणे जमलेच नाही. म्हणजे गाइड किंवा मालगुडीचा थोडा अपवाद, कुठे तरी आलेले अनुवाद, मध्येच एखाद्या दिवाळी अंकात वाचलेला एखादा लेख, इंटरनेटवर केलेलं वाचन असाच काय तो संबंध आला. जुन्या पुस्तकांबद्दल आणि साहित्यिकांबद्दल हे असंच होतं. गिरीश कार्नाड वारले की आता त्यांचे सगळे लिखाण वाचूनच काढू असा न पूर्ण होणारा निर्धार केला जातो. जे कर्नाडांचे तेच नारायण यांच्या बाबतीतही. नवं काही तरी पुढे येतं, ते ताज्या संदर्भांवर आधारलेलं असतं आणि मग आधी तेच वाचले जाते. जुन्या चांगल्या साहित्याबाबतचा संकल्प पुन्हा तसाच राहतो. पण, असं सगळं असूनही ही मोठी माणसं मनात वसलेली असतातच. आणि म्हणूनच म्हैसूरला जायचं ठरलं तेव्हा आर.के.नारायण यांचे तेथील निवासस्थान बघायचेच हे ठरवून टाकले होते.
म्हैसूरचा स्थळदर्शनाच्या यादीत ‘नारायण-निवास’ वगैरे नव्हतेच. सामान्यत: म्हैसूर फिरायला जाणारे फार कुणी या ठिकाणाचा आग्रह धरत नसावेत. हा ‘नारायण’ म्हैसूर मुक्कामी राहायचा हे कदाचित माहीत नसावे अथवा अप्रूप नसावे. असलेच पाहिजे असाही काही नियम नाही. पण, माझे पक्के होते, की हे ‘आर.के.’ निवास बघायचेच. म्हैसूरची इतर सगळी ठिकाणे बघितल्यावर तिसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सांगितले. आर.के.नारायण यांचे घर बघायचे आहे. ‘कोई म्युझियम है क्या?’ माझा कन्नड ड्रायव्हर नंदीश त्यांच्या कन्नड हिंदीत उद्गारला. ‘हाँ, म्युझियमच है’ मी माझ्या मराठी हिंदीत उत्तर दिले. मग, नंदीशने प्रयत्न सुरू केला ते घर कुठे आहे ते शोधण्याचा. पण, त्याच्या ओळखीच्या कुणालाच अशी काही ‘टूरिस्ट प्लेस’ आहे, याचा थांगपत्ता नव्हता. अखेर, गुगलबाबांच्या मदतीने माग काढत पोहोचलो आणि विवेकानंद रोडवरील त्या साहित्यमहर्षीच्या घरासमोर जाऊन उभे ठाकलो. दारावरच पाटी होती, ‘आर.के.नारायण हाऊस’. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे नाव धारण करणाऱ्या सिद्धहस्त लेखकाचे घर.
भारतीय माणसाला गोष्टी आवडतात. आपलं जुनं सगळं साहित्य आपल्यापर्यंत गोष्टींच्याच तर रुपात पोहोचलेलं असतं. कशामुळे ठाऊक नाही, पण आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्टीवेल्हाळपणा ‘इन-बिल्ट’ आहे असं आपलं मला एक उगाच वाटत राहतं. ‘कसं आहे ना...’ ने सुरू करीत आपण हा गोष्टीवेल्हाळपणा रोजच खुलवीत असतो. आर.के. नारायण किंवा रस्किन बाँड यांचं साहित्य अशा ‘गोष्टी-स्वरुपा’मुळे आवडत असावं! अशाच आवडणाऱ्या, जगण्याच्या गोष्टी आयुष्यभर सांगत आलेला हा माणूस. पण, नारायण यांच्या घरात आपण प्रवेश करतो आणि त्यांची वेगवेगळी छायाचित्रे बघायला लागतो तेव्हा ही व्यक्ती बराचशी अबोल असावी, असं उगाचंच वाटत राहतं. एकदम गंभीर, दाक्षिणात्य विद्वतपुरुष वगैरे. काहीसा करारी. तरीही हजारो-लाखो वाचकांना भावेल अशी साहित्यनिर्मिती करणारा हा माणूस खुणावत राहतो.
म्हैसूरमधील जुन्या जमान्यातील भक्कम बांधकामाच्या दुमजली बंगल्याला उत्तम प्रकारे जपत त्याचे रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. सकाळी दहाच्या ठोक्याला उघडणाऱ्या या संग्रहालयात प्रवेश केला आणि भारतीय साहित्यात अजरामर ठरलेल्या या विद्वानाचे अनेक पैलू उलगडत गेले.
नारायण यांचा हा बंगला उत्तम प्रकारे जपला गेला आहे. मूळ घराचे स्वरुप तसेच राहील याची पुरेपूर काळजी घेत नवे काम करण्यात आले आहे. त्यांचे टेबल-खुर्ची, त्यांचे पोशाख, महत्वाच्या प्रसंगी, परिवाराबरोबर किंवा मोठ्या व्यक्तींबरेाबर काढलेली छायाचित्रे, भिंतीतील जुन्या पद्धतीच्या कपाटांमध्ये नीटसपणे रचून ठेवलेली ग्रंथसंपदा, त्यांच्या संग्रहातील इतर लेखकांची पुस्तके असा सगळा ऐवज आपल्याला त्यांच्या काळात घेऊन जातो. दुमजली बंगल्यात लहान-मोठ्या खोल्यांमधून नारायण यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल माहिती देणारे मोठाले फलक लावले आहेत. त्यांनी स्वत: केलेले लिखाण, त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेले लेख, पद्मविभूषणपासून ते इतर पुरस्कार, पुस्तकांची भली मोठी यादी या फलकांमधून मांडण्यात आले आहे. या घराचे संग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा एक स्वतंत्र फलक लावला आहे.
आणि, या शिवाय लक्ष वेधून घेतात ती भिंतींवर रंगविलेली नारायण यांचीच स्वत:ची वाक्ये. एकाहून एक. 'Do You realize how few ever really understand how fortunate they are in their circumstances?' अशी वेगवेगळी वाक्ये वाचून आपण चमकतो आणि एक क्षण विचारातही पडतो. नारायणाची शब्दशक्ती, अजून काय? बंगल्याचा खालचा मजला आणि चॉकलेटी रंगात रंगविलेला वळणदार जिना चढून गेल्यावर दिसणारा वरचा मजला... नारायण सर्वत्र व्यापला आहे.
खुशवंत सिंह यांच्यासारख्या समकालीन लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेले लेखही येथे वाचायला मिळतात. या सगळ्यात संदर्भातून जुजबी का होईना, भारतीय इंग्रजी साहित्यातील हा माणूस आपल्याला माहिती होत जातो. संयुक्त राष्ट्र संघात काम केलेले माजी सनदी अधिकारी सी.व्ही.नरसिंहन यांनी नारायण यांचा एक किस्सा सांगितला आहे. २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरसिंहन यांनी त्यांना अभिनंदनासाठी फोन केला तर त्यावर नारायण यांनी काय प्रतिक्रिया द्यावी, ‘आता मी पद्म विदूषक झालो’. दाक्षिणात्य नारळी तैलबुद्धी, आणखी काय? साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी देखील नारायणांचे नाव अनेकदा पुढे आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळू शकला नाही. असे एक ना अनेक पैलू या संग्रहालयाने कायमचे जतन करून ठेवले आहेत.
प्रचंड ग्रंथसंपदा असलेला हा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लिहिता होता. द हिंदूचे संपादक एन.राम त्यांना मृत्यूच्या काही तास अगोदर भेटले होते. व्हेंटिलेंटरवर असलेल्या नारायण यांनी त्यांना डायरी मागितली, कारण त्यांना आणखीही बरेच लिहायचे होते, सुचत होते. स्वत: राम यांनी लिहिलेला किस्साही येथे आपल्याला वाचायला मिळतो. शेवटपर्यंत सर्जकता टिकवून ठेवलेला तरीही ‘नव्वदीत गेल्यापासून मी लिहिण्याच्या बाबतीत अंमळ आळशीच झालो आहे’, असे मिश्किलपणे सांगणारा हा सिद्धहस्त लेखक आपल्याला त्या दुमजली घरात भेटत राहतो. आपल्याला दुरूनच माहिती असलेले आर.के.नारायण येथे किंचित जवळ येतात.
या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात म्हैसूर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नागपुरात ग्रेस, सुरेश भट यांच्यासारखी मोठी माणसे होऊन गेलीत. पण, नागपूर महापालिकेला त्यांचे स्मारक वगैरे उभे करावे, असे काही वाटले नाही, असा एक निरर्थक विचार माझ्यासारख्या नागपूरकराच्या मनात डोकावून गेला. पण, ते एक असो.
१९९० सुमारास नारायण यांनी हे घर सोडले आणि ते चेन्नईला राहायला गेले. १९४२ मध्ये लघुकथांचा संग्रह असलेले ‘मालगुडी डेज’ प्रसिद्ध झाले होते. जवळ जवळ सहा दशके हा माणूस लिहिता होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अरे हो, या लिहित्या घराला अद्यापही दररोज शंभरच्या वर लोक भेटी देतात, हा एक सुखद धक्का तेथील ‘व्हिजिटर्स रजिस्टर’मुळे बसतो.
नशीब नावाची गोष्ट मोठी मजेदार असते. आर. के. नारायण नावाचा प्रचंड प्रतिभाशाली माणूस एका घरात जन्माला घातला. पण, त्या कुटुंबाचे सद्भाग्याचे पारडे बरेच मोठे असावे. त्याच घरात अजून एक प्रतिभावंत दिला पाठवून. नाव मिळाले, आर.के.लक्ष्मण! तेच, कॉमन मॅनवाले प्रसिद्ध व्यंगचित्रकार. नारायण यांच्या लेखनाला पूरक रेखाचित्रे लक्ष्मण यांनीच काढली होती. दोन भावंडांनी मिळून भारताला भरभरून आनंद दिला. दोन्ही भावांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. नारायण-लक्ष्मणाची जोडी रामायणानंतर भारतात पुन्हा अवतरली होती. आपल्यासारखे आपणच भाग्यवान.
‘मालगुडी डेज’ या मालिकेचे काही भाग कर्नाटकातील अगुंबे या गावात आणि तेथील एका वाड्यात चित्रित झाले होते. त्या आगुंबेला भेट देण्याची, अगदी त्याच वाड्यात राहण्याची संधी २०१३ मध्ये मिळाली होती. त्या ‘मालगुडी’च्या जनकाचे स्मरण जागविणारी वास्तू सहा वर्षांनी बघायला मिळायली. एक वर्तुळ पूर्ण झाले. आता, आर.के.नारायण वाचले पाहिजेत, मुळातून.....!

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...