Monday, 30 April 2018

शेजारच्या छत्तीसगडात!!!


‘‘दादू... झाडू लगा लो... दादू कुलर मे पानी भर दो... दादू कुर्सिया नही लगायी अभी तक.. अरे, दादू कहा हों... मेहमान आ गये.. सामान तो लो’’’... घरात मंगलकार्याची लगबग सुरू आहे. प्रत्येक जण ‘काम मे हाथ बँटा रहा है’ आणि तरीही घराच्या कानाकोपऱ्यातून ‘दादू...दादू’.. आवाज येतो आहे. आणि टी-शर्ट पँटमधला दादू इकडून-तिकडे धावतोय.. अर्धवट टक्कल, बारीक मिशी, कंबरेला पांढरे उपरणे गुंडाळलेला दादू प्रत्येक ऑर्डर झेलण्यासाठी लगबग करतोय आहे. कामे करायला घरात अनेक तरुण आहेत. पण, तरीही सर्वाधिक आवाज दिला जातोय साठीला पोहोचलेल्या किंवा कदाचित ओलांडलेल्या दादूला! आणि तोही कोणतीच हाक व्यर्थ जाऊ देत नाही.. सकाळी  सहाला सुरू झालेली त्याची धावपळ रात्रीच्या जेवणापर्यंत सुरूच राहते. मग तो अंतर्धान पावतो आणि थेट दुसऱ्या दिवशीच दिसतो. आपण उठायच्या आधीच त्याच्या हाती झाडू किंवा टोपले आले असते... टी-शर्टची जागा शर्टने घेतली असते.. बाकी सगळं कालसारखंच असतं दादूचं... दादू बोलणारा रोबोट तर नाही.?.. पण तो फारसा बोलतंही नाही.. एखादा शब्द, फारतर दोन सलग वाक्य. उर्वरित वेळेत फक्त काम.

 मध्येच कुणीतरी अकाली मोठेपण भिनलेलं दादूवर डाफरतं.. सांगितलेलं काम केलं नाही म्हणून... उर्मट शब्दात पाणउतारा करतं.. आणि क्षणार्धात घरच्या सगळ्यात थोरल्या बाईचा चढा स्वर त्या उर्मट स्वराला झापतो.. दादूसाठी. कारण, दादू केवळ ठेवलेला नोकर नसतो, वेठबिगार गुलाम नसतो. दादू, वर्षानुवर्षे घरचाच होऊन गेलेला, नात्यागोत्यात, जातीत नसलेला आप्त असतो. आणि तो त्या एका घराचा नसतो तर अख्ख्या वस्तीचा असतो.   

हा प्रसंग अगदी खराखुरा, डोळ्यादेखत घडलेला! आणि अगदीच परवा-परवा. छत्तीसगडमध्ये दुर्गला भाच्याच्या मुंजीला गेलो होता, तिथला. घरभर राबणारा दादू तीन दिवस सतत डोळ्यापुढे होता. आपल्याही घरी अशी घरचीच होऊन गेलेली गडी-माणसे होती. आता-आता काही वर्षांपूर्वीपर्यंत. कुठे-कुठे ती अजूनही आहेत. शहरात फारच कमी. पण, छत्तीसगडमध्ये ती आहेत.  खूप पूर्वीही होती.

माझ्या आत्याच्या लग्नातला एक फोटो अजून आहे आमच्याकडे.. तीन छत्तीसगडी माणसे क्रॉस मांडी घालून पाय पोटाशी धरून बसलेली फोटोत.  आमची आजी छत्तीसगडची. लेकीच्या लेकीचे लग्न म्हणून खास तिच्या माहेरच्यांनी मदतीला तीन गडी पाठविले होते, अमरावतीला. छत्तीसगडी! फोटोतील ती तीन माणसे माझ्यासाठी एक गूढच होते. ही माणसे नोकर होती शेतावरली. वाट्टेल ते काम करावयाची. फारच अप्रूप होते मला.. का कुणास ठाऊक.. तेव्हापासून छत्तीसगडबद्दल जे काही आकर्षण माझ्या मनात निर्माण झालेय, ते आजतागायत कायम आहे.

आणि मग पाच वर्षांपूर्वी आजीच्या माहेरी गेलो. त्यांची भली विस्तीर्ण शेती आहे. त्या शेतावर गेलो तर शेत राखायला ठेवलेल्या कुटुंबातील बाया-माणसं पुढं आली. अगदी वृद्धत्वाकडे झुकलेली माणसंही आमच्या काकांच्या पाया पडली. मी नको...नको म्हणत असताना माझ्या आणि बायको-बहिणीच्या पाया पडली. आम्ही पाय मागे घेतले. काका म्हणाले,‘ करू दे नमस्कार. तू म्हणशील तर तुझ्या दीड वर्षांच्या मुलीच्याही पाया पडेल’.  क्षणभर स्वत:ची लाज वाटली.  आपल्यावर संस्कार महाराष्ट्रातील सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या वातावरणाचे. वर्ग-वर्ण आधारित ही वागणूक आपल्या ओळखीची नसलेली. किंबहुना, संकोचलेपण आणणारी.. पण, छत्तीसगड असाच आहे..पण मग, मी बघितलेला हरयाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानही तसाच आहे. कशाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही अद्याप असे प्रकार आहेत.
पण, छत्तीसगड बदलला आहे. रायपूरचे रस्ते, नागपूरने मिशीवर ताव सोडा, मिशी ठेवूच नये, इतपत सुधारलेत. छत्तीसगडच्या नव्या-जुन्या समृद्धीचे आणि विकास नामक अप्पलपोटेपणाचेही अनेक किस्से आहेत. म्हणजे, बस्तरमध्ये भांडी विसळायला गेलेला माणूस दारू व्यावसायिक कसा झाला आणि नोटबंदीच्या दिवशीच रायपूरमध्ये किती हजार किलो सोने खरेदी झाली, रायपूरमध्ये जमिनीचा भाव किती चौरस फूट आहे, वगैरे वगैरे. त्यात आत्ताच खोलवर नको जायला. सध्याचे निमित्त फक्त डोळ्यांनी अनुभवलेल्या आपल्या शेजारी राज्याचे.. लहानपणापासून कुतूहल असलेल्या छत्तीसगडच्या दर्शनाचे!
...............................................................................................

5 comments:

  1. गावातील गडी माणसू आपुलकी जिव्हाळा जपत असतो. आजही ग्रामिण भागातील माणुसकी अबादीत आहे. सर जी तूम्हचा लेखणीतून गडी माणूस अ‌प्रतिम लेखाटला गेला आहे.

    ReplyDelete
  2. गडी माणसं आजही आहेत. पण पुर्विचा जिव्हाळ्याचा हा गडी माणूस राहिला नाही. पुर्वी अन्ड्राॅईड नव्हते. त्यामुळे हा गडी माणूस सर्वांना कामी पडायचा. आज मात्र अन्ड्राॅईड च्या युगात गडी माणूस हरवला

    ReplyDelete
  3. गडी माणसं आजही आहेत. पण पुर्विचा जिव्हाळ्याचा हा गडी माणूस राहिला नाही. पुर्वी अन्ड्राॅईड नव्हते. त्यामुळे हा गडी माणूस सर्वांना कामी पडायचा. आज मात्र अन्ड्राॅईड च्या युगात गडी माणूस हरवला

    ReplyDelete
  4. Harrah's Cherokee Casino Resort - MapyRO
    Harrah's Cherokee Casino Resort. 1280 안동 출장마사지 Highway 315, Cherokee, 태백 출장마사지 NC 28719. Directions · 의왕 출장마사지 (580) 490-3247. Call Now · More Info. Hours, Accepts Credit Cards, Parking, 성남 출장안마 Wi-Fi. 의왕 출장마사지

    ReplyDelete

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...