Wednesday, 14 March 2018

दिल मे फकीर जिंदा रख!



मनातल्या विचारांना
अंत नसतो...
तसा तो सतत जन्म घेणाऱ्या
आकांक्षांनाही नसतो...
एक झाली की दुसरी,
फुटत जातात आकांक्षा...
कधी त्याला नाव समृद्धीचे,
कधी प्रगतीचे, तर कधी
कुठल्या तरी उदात्ततेचे..!

वडाच्या पारंब्या जशा
एकातून दुसरी जन्म घेतात ..
तसा एकीतून उगम दुसरीचा...
आणि आपण बसतो
वाढत्या झाडाला खतपाणी घालत...
एकदा मोठं झालं की मोकळं होऊ
अशी अपेक्षा करीत...

पण,
मोकळं काहीच होत नाही.

पुन्हा नवे धुमारे …
बरे-वाईट,
पुन्हा नव्या आकांक्षा …
आणि
पुन्हा त्यांना कुरवाळणं…
सतत तेच ते…
संपता संपत नाही…
कशाला अंत नाही…!

आणि अंत तर
संकटांनाही नाही…
पहिल्याला धीर करून
निपटून काढावं,
तर दुसरं हजर…
कंबरेवर हात धरून
आणि विटेवर पाय ठेवून…
सतत काय तर
लढत राहायचं…
प्रश्नांना नेहमी
भिडत राहायचं…

शांती हवी आहे प्रत्येकाला आयुष्यात.…
डोक्यातील सगळे विचार
आणि
प्रत्येकाने आपल्या मनात दाबून धरलेला
किच्च काळा कार्बनवाला कचरा,
प्रत्येकाला डिस्पोझ करावयाचा आहे.…

पण होत नाहीच तसं…

"पीस" शोधायला निघालेल्या
प्रत्येकाचीच निघतात पिसं…!
एकदा नाही, रोजच निघतात…
गळून पडणाऱ्या पिसांचा
रंग तेवढा वेगळा…
बाकी सगळे मोर उघडे-बोडखेच…

यातून वर येणारी स्थितप्रज्ञता…
तशी आपल्याकडे नसतेच…
‘आता मला त्रास होत नाही’
अशी वाक्ये हतबलतेतून येतात…
न थकता.न हारता
लढण्याची ताकद येते,
पण तीही अपरिहार्यतेतून…
ते काही ठरवून झाले नसते. जाणीवेतून आलेली स्थितप्रज्ञता
आपल्याला काही जमत नाही…
इतकी मौल्यवान शांतता
आपल्याला काही मिळत नाही…

त्यामुळे त्या अर्थाने आपण
फकीरच…
फकीर बाय फोर्स,
नॉट बाय चॉइस…
सगळा शेवट फकिरीतच म्हणजे..
मग हात आणि झोळी, फिरवायलाच हवी…
पडेल ते दान घेण्यासाठी…
आणि मिळालेलं दान
स्वीकारण्यासाठी…

तो फकीर जिंदा रख भाई...
दिल मे फकीर जिंदा रख! 

No comments:

Post a Comment

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...