Thursday, 8 March 2018

कशासाठी.. पोशाखातील सहजतेसाठी!
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे असो की शारीरिक कवायती, योगासने करणे असो. साडी अशा वेळेस अडचणीची ठरते. त्यामुळे, पंजाबी ड्रेस घालून शाळेत येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अॅ‌क्टिव्ह टीचर्स फोरमचा भाग असलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षिकांनी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षिकांनी राज्य सरकारकडे या मागणीसाठी अर्ज, निवेदने दिली आहेत. या विषयाचा आणि शिक्षिकांमधील मत-मतांतराचा घेतलेला हा वेध.
...............
महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये हा ‌आपल्याकडे काश्मीरइतकाच पेटू शकणारा ताकदीचा विषय आहे. नुसता ब्र जरी उच्चारला तरी टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे पारंपरिक पोशाखाचे समर्थक त्याचा संबंध थेट संस्कृती आणि महिलांच्या मानमर्यादांशी जोडतात. दुसरीकडे, त्याला तथाकथित व्यक्त‌िस्वातंत्र्याशी आततायीपणे जोडले जाते आणि अमर्याद व्यक्तिस्वातंत्र्य हे अराजकतेकडे नेणारे असते, हे भानही टांगून ठेवले जाते. पण, आता मध्येच हा स्फोटक विषय कशासाठी, असा प्रश्न पडला असेल तर त्यालाही उत्तर आहेत. नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षिकांनी शाळांमध्ये साडी नेसण्याचे बंधन घातले जाऊ नये यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. केवळ एकदा मागणी करून या शिक्षिका थांबलेल्या नाहीत. सातत्याने आठ महिन्यांपासून त्या पाठपुरावा करीत आहेत. अर्थात, शासनाच्या हत्तीला या विषयावर कड पालटण्यास वेळ मिळालेला नाही. पण ‌शिक्षिकांचा लढा सुरू आहे. आणि त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करायला लावणारे निश्चितच आहेत.
साडी हा पारंपारिक भारतीय पोशाख आहे आणि तो चांगलाच आहे, हे या शिक्षिकांना मान्य आहे. मात्र, शाळेत तो पोशाख घालून दैनंदिन काम करणे अडचणीचे ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शिक्षिका ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. शाळांमध्ये, विद्यार्थ्यांबरोबर मैदानात खो-खो, कबड्डी असे खेळ, सामुदायिक कवायती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगा साडीमध्ये कसा करायचा, असा प्रश्न त्या विचारीत आहेत. राज्य सरकारने प्रत्येक शाळेत योग दिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याखेरीज, सूर्यनमस्कार, प्राणायाम, सामुदायिक कवायत, धावणे, लांब उडी, उंच उडी, इतकेच काय तर खो-खो, कबड्डी असे मैदानी खेळ खेळताना अथवा विद्यार्थ्याना शिकवताना होणाऱ्या वेगवान हालचालीमध्ये अनेक शिक्षिकांना साडीपेक्षा ड्रेस सोयीचा वाटतो. त्यामुळेच, साडीचा अनाठायी आग्रह सोडून ड्रेस घालण्याबाबत शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक काढावे अशी मागणी या शिक्षिकांनी केली आहे.
शिक्ष‌िकांनी कोणता पोशाख घालावा, याबाबत जिल्हा परिषदेचे काही नियम नाहीत. त्यामुळे साडीची सक्ती सरकारी अथवा खासगी शाळांमधील शिक्षिकांना करता येत नाही. साडीबरोबरच त्या ड्रेसदेखील वापरू शकतात. मात्र, असा आग्रह धरला जाण्यामागे सामाजिक स्पॉन्सरशिपचा मुद्दा आहे आण‌ि तो ग्रामीण भागात अधिकच तीव्र आहे. बहुतांश वेळा पुरूषी मानसिकतेतून घेतलेले निर्णय कसे असतात, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दुसरे म्हणजे साडीच्या आग्रहाला आपल्या समाजाची गेल्या अनेक वर्षांमध्ये तयार झालेली मानसिकता चिकटलेली आहे. म्हणजे आधी नऊवार आणि नंतरच्या काळात सहावार साडी नेसली की स्त्रीला सभ्यतेचे प्रमाणपत्र देणारी आपली पारंपारिक मानमर्यादा आहे. साडी घातली की ‘डिग्न‌िटी’ येते, असा एक मतप्रवाह आपल्या येथे विद्यमान आहे. दररोज शाळांमध्ये इमानेइतबारे अध्यापनाचे काम करणाऱ्या अनेक शिक्षिकांचेही असे मत आहेच. म्हणजे, साडी घातली की लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे मानणाऱ्याही अनेक शिक्षिक आहेत. अर्थात, यामागे वर्षानुवर्षे विशिष्ट प्रकारे ‘कंडिशनिंग’ झालेला आपला मेंदू आणि मन आहे. त्याला पूरक असे पुरावे काही नाहीत. म्हणजे, साडीबाबत आपल्या समाजाचे असे हे एक मिथक आहे. कोणताही समाज विविध मिथकांवर चालत असतो आणि ही मिथके म्हणजेच काय ते सत्य, असे समाजातील बहुतेकांना वाटत असते. साडीभोवतीही असे एक ‘डिग्निटी’ नामक मिथक गुंडाळले गेले आहे.
आणि तरीही, अनेक श‌िक्षिकांना शिकविताना साडीच योग्य वाटते. त्यामुळे, त्यांच्या मताचाही आदर केला जायलाच हवा. आपल्या वेशभूषेवर विद्यार्थ्यांकडून मिळणारा आदर अवलंबून असतो. पंजाबी ड्रेसमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर नको इतके कमी होते. शिक्षकी पेशात असे अंतर असणे आवश्यक असते. हे अंतर राखण्यासाठी शिक्षिकांचा वेश खूप मोठी भूम‌िका पार पाडतो. शि‌‌‌क्षिकेच्या व्यवसायाला साडीच योग्य वाटते, मुलांना घडवायचे असते म्हणून तसे राहणे योग्य वाटते, अशा स्वरुपाचीही काही प्रातिनिधिक मते व्यक्त होताना दिसतात. साडीला सभ्यतेचा आणि ‌शिक्षण व्यवसायाला ‘उत्तम, उदात्त आणि उन्नत’चा टॅग चिकटलेला आहे. त्यामुळे, साडी अधिक योग्य वाटते, अशी विविध स्वरुपाची मते शिक्षिकांकडून व्यक्त होताना दिसतात. मुख्य म्हणजे असे वाटणाऱ्या शिक्षिकांचे प्रमाण जास्त आहे.
पण, म्हणून याचा विरोधी विचार अस्तित्वात नाही असे नाही. पंजाबी ड्रेस हा ‌अधिक ‘कम्फर्टेबल’ आहे, हा मतप्रवाहही मोठा आहे. विशेषतः वरच्या वर्गांना किंवा कॉलेजेसमध्ये शिकविणाऱ्या शिक्षिकांमधून हे अधिक जोरकसपणे मांडले जाते. मुलांच्या शरीरात बदल होत जातात तसे त्यांच्या नजरेतील भावही बदलत असतात. ही बदलणारी नजर लक्षात येते. शिक्षिका ‌शिकवत असताना, असे विद्यार्थी कुठे बघत असतात, हे शिक्षिकांच्या लक्षात येत असते. साडी या अवघडलेपणात भर घालते, असे स्पष्ट सांगणाऱ्या शिक्षिकाही आहेत. त्यामुळे, प्राथमिक शाळेपर्यंत साडी ठीक आहे मात्र त्या नंतर ‘हाय नेक’ ड्रेस असायला हवा. गणवेश म्हणून साडी ठीक आहे, पण पंजाबी ड्रेसमध्ये अधिक सुटसुटीत आणि सहज वाटते, ही भावनाही शिक्षिका बोलून दाखवितात.
तर, महिलांच्या पोशाखाला असे अनेक पदर आहेत आणि नगर जिल्ह्यातील शिक्ष‌िकांच्या मागणीने ते पुन्हा एकदा पुढे आणले आहेत. सुदैवाने, या मुद्द्याला त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा महिलांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचे ठिगळ जोडलेले नाही. त्यामुळे, सातत्याने आंदोलनाच्या मूडमध्ये असणाऱ्या चळवळ्यांना फारसे काही हाती लागणार नाही. पण, या शिक्ष‌िकांचा मुद्दा दुर्लक्षित करता येणारा नाही. त्यांनी कोणताही भावनिक मुद्दा न उचलता दैनंदिन कामातील सहजतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. कदाचित, आज त्या संख्येने फार मोठ्या नसतीलही पण वेगळी वाट चोखाळणारे नेहमीच कमी संख्येत असतात. बदलाची सुरुवात नेहमी लहानच असते हे एक सत्य आहे आणि बदल थांबविता येत नाहीत, हे इतिहासाने सिद्ध केलेले दुसरे सत्य आहे. आपण सगळे जाणतोच!
.........
शाळेत ड्रेस वापरता यावा यासाठी शासनाने सुस्पष्ट असे परिपत्रक काढावे, असा आग्रह शिक्षिकांनी धरला आहे. शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढायला हवे व अनुमती द्यावी, अशी श‌िक्षिकांची मागणी आहे. अन्यथा महिलांना बंडखोरी करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, बारामती, अकोले, उस्मानाबाद, नाशिक, कोपरगाव, संगमनेर, हवेली, पाथर्डी अश्या अनेक जिल्ह्यातील महिलांनी हे निवेदन शिक्षण संचालक आणि उपसंचालक यांच्याकडे सादर केले आहे. शिक्षण विभागकडून प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने काही शिक्षिकांनी बंडखोरी करत ड्रेस वापरायला सुरुवातही केली आहे. शाळेत पोशाख घालून येताना आजवर शिक्षक अथवा शिक्षिकांनी रूढ सामाजिक संकेतांचे कधीच उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या वैयक्तिक समंजसपणावर विश्वास ठेवून पोशाख निवडीचे स्वातंत्र्य देऊन तातडीने उचित कार्यवाही करण्यात यावी असेही सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिक्षिकांना साडीऐवजी ड्रेस वापरणे सोयीचे वाटते. साडीबरोबरच अनेक तरुण शिक्षिका शाळेत ड्रेस वापरू लागल्या आहेत. पर्यवेक्षकीय यंत्रणेतील पुरुषसत्ताक मनोवृत्तीचे अधिकारी मात्र ड्रेसला हरकत घेत असल्याच्या तक्रारी आहेत. गरज आणि सोय लक्षात घेता पर्यवेक्षकीय यंत्रणा आणि समाजातील संबंधित घटकांनी शिक्षिकांच्या ड्रेसला आक्षेप घेणे किंवा मॉरल पोलिसिंग करणे योग्य नाही.
--भाऊसाहेब चासकर,
संयोजक, अॅक्टिव्ह टिचर्स फोरम, महाराष्ट्र
....................................

No comments:

Post a Comment

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...