Saturday, 29 August 2020

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*


चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’ असे अभियानच सुरू केले आहे. आपण लहान मुलांना सांगतो -पानात काही टाकू नका- अगदी तसाच सल्ला जिनपिंग यांनी दिला आहे. चीनमध्ये कोणतेही सरकारी अभियान हे महाप्रचंड लाटेसारखे असते तसेच हे ’स्वच्छ ताटांचे’ अभियानही मोठ्या प्रमाणावर राबविले जाते आहे, जाईल. कम्युनिस्ट सरकारची यंत्रणा, संपूर्ण शासकीय़ नियंत्रणातील प्रसार माध्यमे आणि अगदी खाद्यपेय-हॉटेल्स संघटनाही यामध्ये सहभागी झाल्या आहेत. चीनमधील एकपक्षीय हुकुमशाही यंत्रणेत ते जोरकसपणे राबविले जाईल, यात काहीच शंका नाही.


वस्तुत: अशाच प्रकारच्या अभियानाची घोषणा जिनपिंग यांनी २०१३ मध्येही केली होती. पण, या वेळेसच्या घोषणेला पार्श्वभूमी कोव्हिडची, चीनमध्ये आलेल्या पुरांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आणि त्यातून निर्माण झालेल्या अन्नटंचाईची आहे. त्यातून, अन्नधान्याच्या आणि चीनी जेवणात महत्वाचा घटक असलेल्या मांसाहारी अन्नाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जेवणादरम्यान अन्न वाया जाऊ नये यासाठी चीनी अध्यक्षांनाच लक्ष घालावे लागले आहे.


चीनी सरकार शक्यतो नागरिकांच्या खाद्यसंस्कृती आणि खाण्याच्या सवयी यांमध्ये हस्तक्षेप करीत नाही. माओंच्या काळात लोकांना मिळणार्‍या अन्नधान्यावर बंधने आली होती आणि लोकांमध्ये त्याची प्रतिक्रियाही उमटली होती. त्यानंतर, मात्र सहसा असे कधी करण्यात आलेले नाही. कारण, चीनी समाजात जेवण, टेबल मॅनर्स, खाण्यापिण्याचे विधिनिषेध आणि संकेत या बाबी संवेदनशील आहेत. त्यांचे पालन करण्यावर चीनी माणसाचा कटाक्ष असतो. आणि यातच भरपूर अन्न वाया जाण्याचे इंगित आहे.


आपल्याकडे महाराष्ट्रात ताट कसे वाढावे याचे नियम आहेत. डावीकडे मीठ-लिंबू वाढण्यापासून या नियमांची सुरुवात होते. काळाच्या ओघात आणि या संस्कृतीची माहितीच नसणे या कारणांमुळे त्याचे सरसकट पालन होत नाही. मात्र, चीनमधील घरांमध्ये या खाद्यसंस्कृतीला आणि खाद्यशिष्टाचाराला प्रचंड महत्व आहे. जेवताना ताटातील आणि टेबलवरील सगळे अन्न संपणे हे यजमानासाठी कमीपणाचे ठरते. त्यामुळे, आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न तयार करणे, टेबलवर मांडणे, ऑर्डर करणे हे प्रकार होतात. जेवणाच्या अखेरीस आपल्या ताटात काहीच न उरणे हे यजमानाचे मन दुखावणारे असल्याने पाहुण्यालाही त्याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे, अगदी तुडुंब पोट भरले, आता खाऊ शकणार नाही इतका दिलेर पाहुणचार तुम्ही केलाय हे संकेतातून मांडण्यासाठीही पानात काही पदार्थ तसेच ठेवले जातात. शिवाय, मोठाल्या मेजवान्या देणे हे चीनी शिष्टाचाराचे प्रतिक आहे. सत्तेच्या आणि उद्योगक्षेत्राच्या ’एलिट’ वर्तुळात अशा मोठ्या मेजवान्या हा नित्याचा भाग आहे. तिथेही हे शिष्टाचार पाळले जातात. ताटात अन्न उरणे हे श्रीमंतीचे आणि सुबत्तेचेही लक्षण मानले जाते. इतिहासातील अनेक वर्षे उपासमार आणि दुष्काळासारखी संकटे अनुभवल्याने नंतरच्या काळात असे नियम तयार होत गेले असावे असाही अंदाज काही ठिकाणी मांडण्यात आला आहे. अशा सगळ्या प्रकारांमुळे चीनी अन्न वाया जाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. एका संदर्भानुसार दरवर्षी चीनमध्ये वाया जाणार्‍या अन्नातून सुमारे २० लाख लोकांना जेवायला देता येऊ शकते. चीनचा ७० टक्क्यांपेक्षा अधिक कचरा हा टाकलेल्या अन्नामुळे निर्माण होतो. जिनपिंग यांनी राबविलेल्या याच मोहिमेचा रोख अशा अनेक गोष्टी नियंत्रणात आणण्याकडे आहे, असे सांगितले जाते.


या व्यतिरिक्तही अनेक चीनी खाद्य शिष्टाचार आहेत आणि त्यांची माहितीही रंजक आहे. तुम्हाला जेवण नुसते आवडून चालत नाही किंवा ढेकर देण्याने भागत नाही. आम्ही भरपूर खाल्ले, जेवण प्रचंड आवडले आणि आता जेवणाच्या स्टिक्सच्या अग्रभागावर मावेल इतकेदेखील आम्ही खाऊ शकत नाही हे तुम्हाला यजमानाच्या नजरेस आणून द्यावे लागते. जेवणाच्या पसंतीबद्दल तुमच्या भावना व्यक्त करणे महत्वाचे असते.


भात हे प्रमुख अन्न आणि त्याबरोबर इतर पदार्थ असे चीनी जेवणाचे स्वरूप असते. जेवताना सर्वाधिक ज्येष्ठ, प्रमुख व्यक्ती किंवा शिक्षक यांनी कुठे बसावे याचे नियम आहेत. खाण्याच्या स्टिक्स वेगळ्या आणि वाढण्याच्या वेगळ्या. दरम्यान, एखाद्याबद्दल अत्याधिक आपलेपणा दाखवायचा असल्यास आपल्या स्टिकसनी त्याला पदार्थ वाढण्याचीही एक पद्धत आहे. कोव्हिडच्या काळात अशाच काही पद्धती चीनी नागरिकांनी सोडून द्यावा असेही एक आवाहन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. आपल्या स्टिक्स अन्नात उभ्या रोवून ठेवू नये असाही एक संकेत आहे. त्याचा संबंध चीनी पूजापद्धतीशी असल्याने जेवताना तसे करणे निषिद्ध ठरवले आहे. दरम्यान, हातात चॉपस्टिक्स आहेत आणि वेळही आहे म्हणून प्लेटसवर अलगद ताल धरला असे काही चालणार नाही. हा पंगतीत बसलेल्या ज्येष्ठांचा अपमान समजला जाईल.


हे आणि असे अनेक नियम चीनी जेवणपद्धतीत आहेत. आपल्या या प्राचीन शेजार्‍याचा इतिहासही समृद्ध आहे आणि मुख्य म्हणजे तो लिखित स्वरुपात आहे. याच प्राचीन इतिहासात चीनची खाद्यसंस्कृती विकसित होत गेली आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या पिढीनुसार त्यात बदलही होत गेले आहेत. एखादा देश मोठा होतो तेव्हा तो केवळ सामरिकदृष्ट्या वर्चस्व गाजवित नाही. आपल्या संस्कृतीतील गोष्टी जगाने स्वीकाराव्या यासाठीही तो ’सॉफ्ट पॉवर’ वापरत असतो. साहेबांचे क्रिकेट, अमेरिकनांचे संगीत आणि चित्रपट तशी ही चीनची खाद्य संस्कृती. आपला ’योगा’ ही त्याच गटातला. व्यापक राजकारणाचाच तो एक भाग असतो. आणि आपल्या राजकारणासाठी चीन तर अतिमहत्वाचा. ’सॉफ्ट पॉवर’ चीनी खाद्य आपण स्वीकारले आहे पण एकंदर चीनी समाजाबद्दल, संस्कृतीबद्दल आपल्याला फारसे माहिती नसते. आपली मान वळली की पश्चिमेकडे जाते पण येणारा काळ हा या उत्तर-पूर्वेकडील शेजार्‍याकडे नजर लावून बसण्याचा आहे हे सांगायला आता तज्ज्ञांची गरज उरलेली नाही.


7775095986


mandarmoroney81@gmail.com

Sunday, 12 July 2020

सायबर गोंधळाची चीनी युद्धनीती





युद्धांच्या साठ आणि सत्तरच्या दशकांतील लोकांच्या मनातील आठवणी सांगणारी पिढी आपल्या अवतीभवती आहे. त्या काळातील, ’युद्धस्य कथा रम्या’ आपण ऐकलेल्या, चित्रपटांत बघितलेल्या असतात. दरम्यानच्या पाच दशकांच्या कालावधीत युद्धांचे स्वरुपही बदलले आणि कथानकातील रम्यताही. सरळसोट कथानकांना तंत्रज्ञानाचे फाटे फुटू लागले आणि ’कनेक्टेड’ जगाचे अंतरंग अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले. या सगळ्याचा परिणाम इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे युद्धांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही झाला आहे. त्यामुळे, राष्ट्रांमधील शह-काटशहांचा खेळ आता सायबरजगातही खेळला जाऊ लागला आहे. प्रत्यक्षातील मोहर्‍यांच्या ’डिजिटल’ चालींकडे काळजीपूर्वक बघावेच लागते. कारण, आभासी वाटत असले तरी या जगातील हालचालींचा प्रत्यक्षावर होणारे परिणाम दीर्घकालीन आणि खोलवरही असतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा सायबर खेळ भारत-चीन यांच्यातील ताज्या संघर्षाने पुन्हा एकदा अधोरेखित केला. दोन महिन्याच्या तणातणीनंतर चीनने लदाख सीमेवरील आपले सैन्य काहीसे मागे घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. वरवर शांतता असली तरी येत्या काळात भारताला सायबर हल्ल्यासारख्या परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते असे अंदाज याआधीच व्यक्त झाले आहेत. दरम्यान, सायबर युद्ध ही संकल्पना अजूनही अनेक सामान्य नागरिकांच्या आकलनापलीकडील असली तरी युद्धांच्या जगात आता ती रुळलेली आणि रुजलेलीही आहे. सायबर हल्ल्यांचे प्रकार आणि परिणाम किती विविध प्रकारचे असू शकतात याचेही अनेक दाखले उपलब्ध आहेत. सामरिक सत्तेची अमर्याद महत्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनने या सायबर युद्धाचा वापर कधीपासूनच सुरू केला आहे. अमेरिकेच्या माहितीसाठ्याचा भेद करण्यासाठी कितीतरी वर्षांपासून चीन हे करीत आला आहे. अमेरिकेची मिसाइल्स, शस्त्रास्त्र साठा, संरक्षण क्षेत्राशी संबंधित माहिती यामध्ये हॅकिंगची मालिकाच चीनने राबविली होत. २०१३ मध्ये अमेरिकन सरकारने जाहीरपणे चीनचा नामोल्लेख करीत याबाबत माहिती दिली होती. पण, चीनच्या बाबतीतील ही काही एकच घटना नाही. अमेरिकेच्या एफबीआयने त्यावेळी चीनने २ लाखांच्या आसपास सायबर गुप्तहेर आणि हल्लेखोरांचे सैन्यच उभारले असून अमेरिकेच्या संरक्षण विषयाशी संबंधित माहितीवर वर्षाकाठी तब्बल ९० हजार हल्ले केले जातात असे सांगितले होते. आणि केवळ संरक्षण क्षेत्रात नव्हे तर अमेरिकेच्या प्रत्येक महत्वाच्या माहितीवर असे हल्ले चीनकडून होत असल्याचेही दाखले आहेत. अगदी न्यूयॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या वृत्तपत्राकडे चीनविषयी काय माहिती आहे हे काढून घेण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेवर सायबर हल्ले झाले आहेत. शिवाय, चीन हे फक्त अमेरिकेच्या बाबतीतच हे करतो आहे असे नाही. जगातील एकूण सायबर हल्ल्यांपैकी सुमारे ४१ टक्के हल्ले हे एकट्या चीनकडून होत असतात. बाजार कोणताही असॊ, तिथे चीनचा वाटा सर्वोच्च असतॊ, याचे असेही एक उदाहरण.

ताज्या संघर्षात असे हल्ले भारतावरही होऊ शकतात हे सांगणार्‍या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक शासकीय संस्था, माध्यमे, औषध क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र अशा विविध ठिकाणी हे हल्ले होतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे, जे अमेरिकेच्या बाबतीत झाले ते आपल्याही बाबतीत होईल याची शक्यता तज्ज्ञ मांडत आहेत.

ब्रिगेडियर सौरभ तिवारी यांनी चीनच्या सायबर वॉर क्षमतांबद्दल एक शोधनिबंधच प्रसिद्ध केला आहे. ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’च्या संकेतस्थळावर तो मुळातून वाचता येऊ शकतो. मागील किमान दशकभरापासून चीन भारताच्या विविध संस्थांवर सायबरलक्ष ठेवून आहे. डीआरडीओ, बीएसएनएल यांच्या संकेतस्थळांचे हॅकिंग, उत्तर भारतातील पॉवर ग्रीडमधील बिघाड अशा घटनांचा संबंध चीन-पाकिस्तान युतीच्या भारतावरील सायबर हल्ल्यांशी जोडला आहे.

याच नीतीचा एक भाग हा वैचारिक गोंधळ आणि मतामतांचा गलबला उडवून देणे हा आहे. आपल्या सरकारने सत्य माहिती दिली पाहिजे अशी आपली वाजवी अपेक्षा असते. पण, सरकारकडून येणारी माहिती खरी की चीनकडून येणारी खरी, असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न याच संघर्षादरम्यान झाला. दुसर्‍या राष्ट्रात आपली बाजूच खरी वाटेल अशा पद्धतीने मांडणारे ’ओपिनियन मेकर्स’ तयार करणे हा तर राजकीय मुत्सद्देगिरीचा भागच आहे. चीनने भारतातही असे हस्तक पेरले असल्याची माहिती संरक्षणविषयातील तज्ज्ञ देत असतात. किंबहुना, कोव्हिड-१९ नंतर जगाने चीनवर टीका करणे सुरू केल्यावर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अशी मोठी फौजच चीनने जगभरात तैनात केली आहे. ’माहितीच्या गोंधळाचे’ हे शस्त्रही एका अर्थी सायबर युद्धाचाच एक भाग आहे.

ही तुलनेने नवी युद्धपद्धती येत्या काळात अधिकाधिक प्रमाणात वापरली जाईल आणि भारताला त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहावे लागेल. मोबाइलमुळे आपल्या रोजच्या जगण्यात हे सायबर तंत्रज्ञान स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोचले आहे. कनेक्टेड विश्वात जगणार्‍या आपल्यासारख्या सामान्यांनाही येत्या काळात याकडे अधिक जागरुकतेने बघावे लागणार आहे. कारण, यातील प्रत्येक गोष्टीचा फटका समाजाला, अर्थव्यवस्थेला आणि देशाला बसत असतो. युद्धखोर मानसिकता नसावी, पण युद्धसदृष्य परिस्थितीला तोंड देण्याची समाजाची मानसिक तयारी मात्र जरूर असावी. थेट युद्ध न करता समोरच्या राष्ट्राचे आणि तेथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करणे हे तर सायबर युद्धाचे प्रमुख प्रयोजन. ते तसे न होऊ देणे आणि त्या दृष्टीने आपली मानसिकता तयार करणे सामान्यांसाठीही आता अगत्याचे आहे.

संदर्भ:

१.    फ्युचर क्राइम्स: लेखक- मार्क गुडमन

२.    चायनाज सायबर वॉरफेअर कॅपॅबिलिटीज: ब्रि. सौरभ तिवारी, संकेतस्थळ: ’द युनायटेड सर्व्हिस इस्टिट्युशन ऑफ इंडिया’


..............................................

Tuesday, 2 June 2020

त्यानेनमेन चौकाला 'बायपास' नाही!



काही वर्षांपूर्वीचे अण्णा हजारेंचे आंदोलन आठवतेय का? तत्कालीन केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. आणि केवळ दिल्ली-मुंबईत नव्हे तर देशाच्या प्रत्येक शहरात, तालुक्यात विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन एकत्र येत होते, मोर्चे काढत होते आणि देशातील भ्रष्टाचाराचा शांततापूर्ण निषेध करीत होते. पण, आज हे आठवण्याचे कारण काय? कारण हे की आज ४ जून आहे आणि जगाच्या इतिहासात आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या नरसंहाराचा म्हणून ओळखला जातॊ. चीनमधील त्यानेनमेन नरसंहाराचा.

आंतरराष्ट्रीय राजकारणात क्रौर्याचे दाखले नवीन नाहीत आणि चीनसाठी तर नक्कीच नाही. त्यानेनमेनमधील विद्यार्थीसंहार हे एक ठळक आणि तुलनेने अलीकडचे उदाहरण. पण त्याआधीही, माओंच्या सांस्कृतिक महाक्रांती किंवा लांब उडीसारख्या प्रयोगातील हजारॊ मृत्यू आणि चॅंग कै शेकच्या राजवटीत झालेले अत्याचार हा देखील ताजाच इतिहास. अगदी गेल्याच शतकातील. त्यामुळे, नरसंहार, क्रौर्य आणि चीन हे कायमच एकमेकांत गुंफलेले समीकरण आहे. तुलनेने प्रचंड शांततेत जगणार्‍या बहुसंख्य भारतीय़ांच्या कक्षेपलीकडील.

त्यानेनमेन चौकातील नरसंहार ही एका रात्रीतून घडलेली घटना नव्हती.  ४ जून १९८९ रोजी हा हिंसाचार घडला असला तरी त्याची पाळेमुळे किमान १० वर्षांपासून चीनमध्ये रुजत होती. १९७९ पासूनच चीनमध्ये लोकशाहीची मागणी आणि ती करणार्‍यांना शिक्षा सुरू झाल्या होत्या. माओत्तर आणि डेंग झाओपिंग यांचा हा काळ. खुली अर्थव्यवस्था आणि आर्थिक सुधारणा यांनी लोकशाहीचेही वारे चीनमध्ये आणले होते आणि त्याचा परिणाम तरुणांवर होत होता. भ्रष्टाचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, पारदर्शकता या प्रमुख मुद्द्यांना घेऊन चीनमध्ये १९८९ साली विद्यार्थ्यांनी आंदोलनांना सुरूवात केली होती. दशकभर साचत आलेल्या या भावनांचे विशाल स्वरुप १९८९ मध्ये त्यानेनमेन चौकात प्रत्ययास येत होते. मे महिन्यापासूनच अनेक विद्यार्थी, नागरिक आणि कामगार या चौकात एकत्र येत होते. किती मोठा जमाव असावा हा? तेव्हाचे रशियाचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह हे नेमके त्याच वेळेस चीनच्या दौर्‍यावर आले होते. १५ मे १९८९ रोजी ते बीजिंगला पोहोचले तेव्हा त्यानेनमेन चौकात तब्बल १० लाख तरुण जमले होते अशा नोंदी आहेत. रशियन राष्ट्रप्रमुखासमोर ही सगळी निदर्शने सुरू होती आणि चीनचे तत्कालिन सरकार हतबलपणे बघण्याशिवाय इतर काहीही करू शकत नव्हते. राजकीयदृष्ट्या अत्यंत नाट्यमय असलेल्या या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी जगभरातील पाश्चात्य माध्यमांचे प्रतिनिधी बीजिंगमध्ये हजर होते आणि लगोलग बातम्या पोहोचवीत होते. गोर्बाचेव्ह रशियाला परतल्यानंतरही ही निदर्शने सुरूच होती आणि त्यांची तीव्रता सातत्याने वाढत होती. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालिन सचिव झाओ झियांग यांच्यासारख्या काही नेत्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा, आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला, मध्यस्थीही केली. पण, हे निर्नायकी आंदोलन काही संपले नाही. अखेर, चीनचे तत्कालिन प्रमुख नेते डेंग यांनी २० मे रोजी मार्शल लॉ लावण्याचे आदेश दिले. इतके करुनही त्यानेनमेन चौक रिकामा होत नव्हता. हजारॊंच्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक तेथे जमा होत होते. ३ जूनच्या रात्री पंतप्रधान ली फंग यांनी लष्कराला हा चौक पूर्णपणे रिकामा करण्याचे आदेश दिलेत. रणगाडे आणि चिलखती गाड्यांसह चीनी लष्कर चौकाकडे जाऊ लागले पण त्यांना मार्गात तरुण आणि नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत होता. जुन्या गाड्या, फर्निचर आणि इतर गोष्टी रस्त्यात आणून टाकल्या जात होत्या आणि लष्कराच्या मार्गात अडथळे आणले जात होते. नागरिकांचे हे अडथळे दूर करण्यासाठी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. अगदी आपापल्या घरांच्या खिडक्यांमध्ये, गॅलर्‍यांमध्ये उभे असलेल्यांचेही या गोळीबारात मृत्यू झाले. रस्त्यावर मारले गेले ते वेगळेच. चीनची लोकमुक्तीसेना ही तेथील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असल्याचे सांगितले जात असे. त्या दिवशी मात्र, बेरोजगार तरुण, कामगार, सरकारी कर्मचारी, गृहिणी, वयस्क अशा सगळ्यांचा विरोध सैन्याला झेलावा लागला आणि चिरडावाही.

सैन्याचे जवान त्यानेनमेन चौकात पोहोचले तेव्हा पहाट उजाडायला सुरुवात झाली होती. यावेळी तेथे सुमारे लाख-दीड लाख लोक उपस्थित होते, बव्हंशी तरुण. आणि सकाळ पूर्ण उजाडली तेव्हा अख्खा चौक निर्मनुष्य झाला होता. कारण, मधल्या काही तासांमध्ये शेकडॊ लोक गोळीबारात बळी पडले, हजारॊ जखमी झाले, कित्येकांनी मार खाल्ला, काही अर्धवट जखमींनाही मारले गेले. यात तरुण मुले, मुली आणि आपल्या बाळांना घेऊन आलेल्या महिलाही होत्या असे सांगितले जाते. चीनच्या सरकारने, लष्कराने आपल्याच लोकांचा नरसंहार घडवला. नेमके किती लोक मेले आणि किती जखमी झाली याची निश्चित आकडेवारी जगापुढे कधीही आली नाही. ४०० पासून ते १० हजारांपर्यंत मृतांचा आकडा सांगितला गेला आहे. पाश्चात्य माध्यमे, जपानी माध्यमे यांच्यात हा आकडा जास्त येत होता तर चीनी सरकारच्या कठॊर नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांमध्ये तो अत्यंत कमी सांगितला जात होता. शिवाय नागरिकांनी केलेल्या हिंसाचारात सैनिकही ठार झाले आणि मारले गेले.

 इंटरनेटवर आपल्याला गोळीबाराचे, निदर्शनांचे काही व्हिडियोज, एक माणूस रणगाड्यांची वाट अडवत असल्याचा व्हिडियो बघायला मिळतॊ. सहजपणे वाचायला मिळते तेही सगळे इतर देशांच्या माध्यमांमधील. चीनच्या माध्यमांमधील जवळजवळ नाहीच. तिथे हे दडवले जातेच. जगभरात चीनच्या या क्रौर्याचा निषेध करण्यात आला होता. पण, रंजक बाब अशी की अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय़ सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर तसेच काही उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या कृतीचे समर्थन केले होते. कारण, त्यावेळेची अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणाची आणि व्यापाराची गरज वेगळी होती. जगासाठी हे तरुण लोकशाहीची मागणी करणारे आंदोलक होते, तर चीनी कम्युनिस्ट सरकारने त्यांच्यावर ’प्रतिक्रांतिकारक’ असा शिक्का मारला होता. असा शिक्का मारण्याचे काय संदर्भ असतात हे कम्युनिस्ट जगताचा अभ्यास असणारे लोक चांगल्या प्रकारे समजू शकतात.

आज या हत्याकांडाला बरोबर ३१ वर्षे झाली आहेत. नृशंस हत्यांकांडाचा हा इतिहास चीनने मागे टाकला आहे. हत्याकांड घडविणारे डेंग झाओपिंग यांच्याच धोरणांमुळे गरिबीतून चीन श्रीमंत राष्ट्र म्हणून दरम्यानच्या काळात पुढे आला. आता ही आर्थिक समृद्धी अनुभवलेली नवी तरूण पिढी जन्माला आली आहे. त्या पिढीला या इतिहासाशी काही घेणेदेणे नसल्याचे सांगितले जाते. चार दशकांचा रक्तरंजित चीन अनुभवलेल्या मध्यमवयीन आणि ज्येष्ठांना पुन्हा त्या भीषण कालखंडाकडे जाणे नकोसे वाटते. त्यानेनमेन चौकाला बायपास करून आताचा चीन वेगळ्या वाटेने निघाला आहे, असे अभ्यासक सांगतात.

पण, चीन या स्मृती विसरू बघत असला तरी जग तसे होऊ देत नाही. राष्ट्र आणि शासन म्हणून चीन कोणत्या थराला जाऊ शकतो हे अधोरेखित करण्यासाठी त्येनानमेनचा संदर्भ वारंवार पुढे येत राहतॊ. त्येनानमेनच्या स्मृती जागविणारे प्रदर्शन आयोजित करण्यावर मकाऊ प्रांताने बंदी घातल्याच्या बातम्या सध्या पुढे येत आहेत. हॉंगकॉंग आणि चीन हा संघर्ष सध्या पेटलेला आहे. मागील वर्षी ४ जूनला हॉंगकॉंगचे हजारॊ नागरिक एकत्र आले आणि मेणबत्त्या पेटवून त्यांनी त्येनानमेनच्या स्मृतींना उजाळा दिला. या वर्षी देखील तेथे मोठी निदर्शने होणार आहेत. हॉंगकॉंग हा पुढचा त्यानेनमेन चौक ठरू नये अशीही प्रार्थना आणि भीती विविध ठिकाणी व्यक्त होते आहे.

 लाखो लोकांचे बळी घेणारा कोरोना व्हायरस सोडण्याचे क्रूर काम चीन करू शकतो का, असा भाबडा प्रश्न आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात विचारला जातो आहे. हा विषाणू चीननेच पसरविला आहे का हे माहिती नाही, पुरावेही नाहीत पण चीन क्रूर होऊ शकतॊ हे मात्र निश्चित. या राष्ट्राचा कम्युनिस्ट आणि बिगरकम्युनिस्ट इतिहास त्याची साक्ष देत उभा आहे. त्यानेनमेन त्याचे ठसठशीत प्रतिक आहे.

७७७५०९५९८६

http:/mandarmoroney.blogspot.com

संदर्भ:

१.     ड्रॅगन जागा झाल्यावर: अरुण साधू

२.     इंटरनेटवरील नियतकालिके, वार्तापत्रे, अहवाल.

..........................................

Thursday, 21 May 2020

पाश्चात्यांशी चीनी बॉक्सिंग





हे असे म्हणे दर ६० वर्षांनी होते आणि निश्चितपणे होतेच. किमान चीनी मान्यतेनुसार तर घडून येतेच. म्हणजे असे की, दर ६० वर्षांनी या लाल तार्‍याच्या देशावर मोठे संकट येते. अगदी त्या देशात लाल तारा उगवला नव्हता तेव्हापासून. १८४० मध्ये ब्रिटनशी झालेले अफूचे युद्ध आणि त्यातील चीनचा पराभव, १९०० मध्ये बॉक्सर बंडाळी आणि पाश्चात्य, ख्रिश्चन फौजांनी केलेली मानहानी, १९६० मधील प्रचंड मोठा दुष्काळ, त्यापाठॊपाठ माओंची प्रसिद्ध ’लांब उडी’ आणि त्यातून ३ ते ४ कोटी लोकांचे भुकेने झालेले मृत्य़ू. एक ना अनेक आपत्ती आणि त्या ही बरोबर दर ६० वर्षांनी. आणि आता २०२० मध्ये पुन्हा एकदा करोनाने चिन्यांच्या मनातील हा अपशकुन खरा ठरविला आहे. आणि या वेळेस केवळ चीनच नव्हे तर संपूर्ण जगावर अपशकुनाचे वादळ घोंघावते आहे. अंधश्रद्धा म्हणा किंवा योगायोग, जे घडले आहे आणि घडते आहे ते जगासमोर आहे. ६० वर्षांनंतर चीन पुन्हा एकदा जागतिक मानहानीला तोंड देतो आहे.

करोना विषाणूने अवघ्या जगाला ग्रासल्यानंतर या संकटाकरिता चीनला दोषी धरणे सुरू झाले. अगदी अलीकडे पर्यंत अनेकांनी नावही न ऐकलेला चीनचा वुहान प्रांत तर सर्वतोमुखी झाला. तेथील प्रयोगशाळेतच हा विषाणू तयार झाला असावा असा दाट संशय जवळपास प्रत्येकाच्या मनात आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर त्याचा अनेकदा जाहीर उल्लेख केला आहे, किंबहुना तशी मोहीमच उघडली आहे. इतर युरोपीय राष्ट्रे देखील उच्चरवाने चीनविरोधी सूर काढीत आहेत. आणि त्यामुळे या सगळया प्रकाराला पाश्चात्य राष्ट्रे विरुद्ध चीन अशा संघर्षाचे स्वरूप आले आहे. आपल्यावर असे संघटित आक्रमण होते आहे हे बघितल्यावर चीन तरी कसा शांत बसेल? आक्रमकता, स्वत:बद्दलचा प्रचंड अभिमान, बाहेरील टीका ऐकून न घेणे आणि इतर जगाकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती ही चीनची ऐतिहासिक गुणवैशिष्ट्ये आहे. पाश्चात्यांच्या आक्रमक प्रचाराला चीननेही आपल्या प्रचारयंत्रणेमार्फत तितकेच प्रबळ उत्तर देणे सुरू केले आहे. विविध राष्ट्रांमधील चीनचे राजदूत, प्रचारयंत्रणेतील अधिकारी, चीनी सत्ताधारी पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणात असलेली वृत्तपत्रे आणि इतर माध्यमे यांनी आरोपांना केवळ प्रत्युत्तरच दिले नाही तर उलट टीकाही सुरू केली आहे. त्यामुळे, चीन आणि पाश्चात्य राष्ट्रे यांच्यातील या वाग्युद्धाचा मोठाच धडाका सध्या उडाला आहे.  अनेक देशांतील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबतच्या बातम्या आणि लेख रोजच येत आहेत. चीनी राजदूतांनी आक्षेपार्ह वक्तव्ये दिली म्हणून फ्रान्स, कझाकस्तान, नायजेरिया आणि इतर काही राष्ट्रांनी त्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

या सगळ्यातून एकीकडे पाश्चात्य राष्ट्रे आणि दुसरीकडे एकटा चीन असे दृश्य उभे राहिले आहे. चीनमध्ये याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. पाश्चात्य राष्ट्रे एकत्र येऊन, ठरवून चीनला एकटे पाडत आहेत, हे चीनी सरकारने मनावर घेतले आहे. याला चीनी भावविश्वात ऐतहासिक संदर्भ आहे आणि चीनच्या दृष्टीने तो अपमानास्पद व दुखराही आहे. चीनविरोधात उघडलेली ही आघाडी ही या नव्या महासत्तेला ’बॉक्सर बंडाची’ आठवण करून देणारी आहे आणि म्हणूनच अधिक डिवचणारी देखील.

शतकाची सुरुवात बॉक्सर बंडाळी

विसावे शतक हे चीनच्या इतिहासात ’बॉक्सर बंडाळी’ घेऊन आले. चीनच्या सगळ्या भागांमध्ये युरोपीय व्यापार्‍यांनी हातपाय पसरले होते आणि आपले वर्चस्वही निर्माण केले होते. युरोपियांनी अवघा चीन आपसातील सामंजस्याने आपल्या व्यापारासाठी वाटून घेतला असता. या राष्ट्रांनी ठरविले असते तर त्याचवेळी चीनचे तुकडे झाले असते. एकीकडे युरोपीय व्यापारी भरमसाठ नफा कमवीत असताना चीनच्या जनतेला याचा काहीही लाभ होत नव्हता. युरोपियनांच्या वर्चस्ववादाला स्थानिकांचा विरोध होता. आणि याच असंतोषाचा स्फोट झाला १९०० मध्ये, हेच ते चीनच्या आधुनिक इतिहासातील प्रसिद्ध असे बॉक्सरचे बंड.

बंडखोरांनी युरोपीय व्यापारी आणि मिशनर्‍यांवर हल्ले सुरू केले. त्याला तत्कालिन चीनी राजघराण्याची देखील साथ होती. सुरुवातीला बंडखोरांनी युरोपीयांना मोठा तडाखा दिला आणि अनेक चीनी ख्रिश्चन तसेच युरोपीय त्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्यानंतर, मात्र सर्व युरोपीय एकत्र आले, त्यांच्या राष्ट्रांच्या फौजानी त्यांना साथ दिली आणि जोरदार उत्तर दिले. इंग्रज, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, इटली आणि अमेरिका अशा पाश्चात्य जगातील सर्वांचाच यामध्ये समावेश होता. पाश्चात्य फौजांच्या ताकदीपुढे चीनी बंडखोर टिकाव धरू शकले नाहीत. दोन्ही बाजूंनी मोठा रक्तपात झाला आणि युरोपीयांचा विजय झाला. चीनवर अनेक अपमानास्पद अटी लादण्यात आल्या. युरोपियांनी स्वत:करिता आणखी सवलती पदरात पाडून घेतल्या. या युद्धातील चीनी लढवय्ये हे बहुतांश शेतकरी होती आणि मार्शल आर्ट्स किंवा चाइनिझ बॉक्सिंग जाणणारे होते. त्यामुळे या युद्धाला ’बॉक्सर’ चे बिरुद चिकटले आहे.

चीनचा असाच अपमानास्पद पराभव १८४० च्या सुमारास झालेल्या अफूच्या युद्धांमध्ये झाला होता. त्यानंतर ६० वर्षांनी झालेल्या बॉक्सर बंडाळीतही नामुष्की आली. या दोन्ही युद्धांना चीनच्या इतिहासात मोठे मह्त्व आहे आणि खरे तर त्या ठसठसणार्‍या जखमा पण आहेत. एकीकडे बॉक्सरच्या बंडाळीकडे आस्थेने बघणारा वर्ग आणि दुसरीकडे या बंडाला काही प्रमाणात कमी लेखणारा वर्ग आजही चीनमध्ये आहेच. थोडेफार आपल्याकडील १८५७ च्या उठावासारखेच. आज करोनाच्या काळात चीन विरुद्ध इतर पाश्चात्य राष्ट्रे असा उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षालाही ’बॉक्सर बंडाळी’ सारखा संदर्भ जोडण्यात येतॊ आहे. मात्र, गेल्या शतकाच्या सुरुवातीला झाला तसा अपमान यावेळी होऊ द्यायचा नाही ही खबरदारी चीनने घेणे सुरू केले आहे. आणि म्हणूनच त्याने पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीस तॊड प्रचार चालविला आहे. बॉक्सरचा हा संदर्भ देणारी अनेक विश्लेषणे सध्या जगातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत आणि त्यातून चीनच्या या पैलूकडे अभ्यासक अंगुलीनिर्देश करीत आहेत.

पण, या वेळी चीनची इतिहासात झाली तशी मानहानी होईल का, या बाबत सगळ्यांना शंका आहेत. करोनामुळे आजघडीला जरी चीनबाबत संपूर्ण जगभर नाराजीची भावना असली तरीही या नव्या संभाव्य महासत्तेला थेट आणि दीर्घकाल दुखावण्याची हिंमत फारशी राष्ट्रे करणार नाहीत. भारताने देखील चीनला धारेवर धरलेले नाही. कारण, सगळ्याचे मूळ हे चीनची आर्थिक आणि सामरिक सत्ता आहे. शिवाय, करोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय साहित्याची मदतही अनेक राष्ट्रांना चीनकडून मिळते आहे. एकोणविसाव्या किंवा विसाव्या शतकात होता तसा विखुरलेला, ढेपाळलेला चीन आता राहिलेला नाही. तेव्हा अपमान सहन करावा लागला, मात्र आता तॊ करणार नाही. आणि मनातील सल तर कधीही जाऊ देणार नाही. तॊ चीनी स्वभावच नाही. एकीकडे वैद्यकीय साहित्याची मदत आणि दुसर्‍या बाजूला आक्रमक प्रचार या आयुधांनी चीनने स्वत:चा ’नॅरेटिव्ह’ उभा करणे सुरू केले आहे. अमेरिका आणि युरोपची सध्याची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे भविष्यातील उगवता सूर्य पूर्वेकडेच आहे, हे ही सगळे जाणून आहेत. त्यामुळे, अगदीच दंडवत घातले नाहीत तरीही ’दुरून नमस्कार देवाला’ अशी सोयीस्कर भूमिका बहुतांश देश घेतील. चीनची बॉक्सिंग कितीही आवडत नसली तरीही!

........................................

Friday, 10 April 2020

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे



परवा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. इटलीमधील लेखिकेच्या पत्राच्या अनुवादाचे त्यांनी वाचन केले होते. पण, या सिद्धहस्त अभिनेत्रीचा हा व्हिडियो बघितल्यावर एक प्रचंड भीतीची, निराशेची भावना निर्माण होते. या उलट, अमिताभ बच्चन यांच्यासह देशभरातील इतर अनेक कलाकारांना घेऊन दुसरा एक व्हिडियो तयार करण्यात आला होता. तो मात्र अत्यंत सकारात्मक होता आणि धीर देणाराही. बर्वे यांनी काय सादर करावे ही निवड अर्थात त्यांची आहेच. पण मुद्दा येथे सकारात्मकतेचा आहे. सध्या संकटकाळात आपल्या विचारांमधून, कृतीतून काय पेरायचंय, हा या मागचा विचार आहे.

आणि येथेच सामान्य माणसाच्या मदतीला भारतीय विचार, पद्धती आणि अगदी कर्मकांडेही मदतीला धावून येतात. घरी बसून काही न करता करोनाच्या बातम्या वाचणे आणि त्या संबंधित आकडेवारीचा रोज मागोवा घेत राहणे काहींसाठी रंजक असेलही पण बहुतेकांसाठी नाही. आणि त्यातून भीती आणि नकारात्मकता रुजतच नाही असे कुणी छातीठॊकपणे सांगू शकणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ला व्यग्र ठेवणे, ते ही सकारात्मक गोष्टींमध्ये, हे अत्यंत आवश्यक आहे. या करिता भारतीय संस्कृतीने आपल्याला अनेक पर्याय सहज उपलब्ध करून दिले आहे. आपले धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक साहित्य अशी सकारात्मकता आपल्यात पेरत जाते. आता प्राचीन साहित्य म्हणजे चमत्कारांच्या कथा नव्हे. अर्थात त्यातूनही अनेकांना समाधान मिळते आणि ते मिळूही दिले पाहिजे. तॊ दैववाद आहे हे मान्य करुनही!

पण, भारतीय साहित्य या पलीकडे बरेच काही आहे. आधुनिकीकरणाकडे जाताना आपण जगभराचे साहित्य आत्मसात करत गेलॊ पण काहीसे आपल्याच आध्यात्मिक साहित्याकडे दुर्लक्ष झाले. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा या सर्वज्ञात साहित्यापासून इतर अक्षरश: हजारो गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे. आवड, पिंड, कल, पातळी या प्रत्येक गॊष्टीनिहाय हे साहित्य उपलब्ध आहे. आणि त्याच्या वाचनातून आपल्यात काय पेरले जाते तर ती सकारात्मता! संकटकाळातही निभावून जाईल हा विश्वास. नकारात्मकतेचा स्पर्शही आपल्याला हॊऊ शकत नाही इतकी शक्ती या प्राचीन भारतीय पारंपारिक साहित्यात आहे. आणि हे मी शुद्ध वैचारिक ठेव्याबद्दल बोलतॊ आहे. चमत्काराच्या कथांबद्दल नाही.

ही सकारात्मकता आपल्या जीवनशैलीने आणि या विचारांच्या नकळत आपल्यावर झालेल्या संस्कारांनीही भारतीयांच्या आयुष्यात पेरली आहे. माझा एक मित्र म्हणतॊ,’ आपण भारतीय फार चिवट आहोत’. हे जे चिवटपण आहे ते या पोषणातून आले असावे असे वाटत राहते. भारतीय परंपरांना दैववादी म्हणून नाकारता येऊ शकते. पण, त्यातून भारतीयांमध्ये दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी, संयम पेरला आहे हे ही नाकारता येत नाही. तो भक्तीमार्गातून, देवाच्या आराधनेतून रुजला असला तरी त्या मागचे तत्त्व हे शुद्ध आध्यात्मिक आहे. आणि कदाचित कुणाला पटणार नाही पण त्यातून सकारात्मकता आपोआप तुमच्यात रुजत जाते.

बुद्धीवादाचे समर्थक यास दैववादाचा अनाठायी अट्टाहास म्हणून नाकारू शकतात. पण खरे तर असे नाही. केवळ बुद्धीच प्रमाण मानली तर त्या निकषावरही भारतीय साहित्य तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करते.

'सदा सर्वदा देव सन्निध आहे

कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'

हे सांगणारा समर्थांचा श्लोक दैववाद सांगत नाही. तो  संकटकाळातही स्थिरबुद्धीने वाटचाल करीत राहण्याचे, संयमाचे आणि अर्थात सकारात्मकतेचे महत्व सांगत असतो. आपण, या विचारांकडे डोळसपणे बघत नाही हा आपला दोष, त्या साहित्याचा नव्हे. आणि हा तर केवळ एक श्लोक आहे. अशा अगणित गोष्टी सांगता येतील.

’बाहेर जाणे बंद असताना आत डोकावण्याची उत्तम संधी आहे’ या अर्थाचा एक मेसेज खूप प्रसृत झाला आहे. भारतीय आध्यात्मिक साहित्य हे अशा आत डोकावण्याचे साठीचे उत्तम साधन आहे.

........................................

Sunday, 5 April 2020

सिंफनी- ओळख पाश्चात्य संगीताची



भारतीय संगीत कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आपल्यापर्यंत स्वाभाविकपणे पोहोचत असते. कधी ते शास्त्रीय संगीत म्हणून तर कधी लोकगीत म्हणून. पाश्चात्य संगीताची मात्र आपली फारशी सलगी नसते, माझ्यासारख्या अनेकांची तर तोंडओळखही नसते. आपल्या भोवतालच्या वातावरणातून ते स्वाभाविकपणे आपल्यापर्यंत येत नाही. आपल्यातील बहुतांश लोक पाश्चात्य संगीताच्या त्या वैभवाला मुकले असतात. आरडाओरडा आणि ठणठणाट म्हणजे केवळ पाश्चात्य संगीत नव्हे हे आपल्यापर्यंत पोहोचलेच नसते. ते ऐकून त्यातील सौंदर्य कसे अनुभवावे ही जाण माझ्यासारख्या अनेकांची विकसित झालेली नसते. पण, पाश्चात्य संगीत समजून घेऊन त्यातला आनंद घेणारेही दर्दी असतात आणि त्यांना त्यातले चांगले-वाईटही कळत असते. जागतिकीकरण आणि त्यातही स्मार्ट्फोनच्या काळात जगभरातील संगीत प्रचंड गतीने आणि मोठ्या प्रमाणात पोहोचले. पण, हे सगळे नव्हते तेव्हाही आपल्याकडे पाश्चात्य संगीताचा कान विकसित झालेले लोक कमी संख्येने- मुख्यत्वे मोठ्या शहरांतील- का असेना पण होतेच. पण माझ्यासह अनेकांना पाश्चात्य संगीत हे काहीसे अगम्यच असते. अशांना पाश्च्यात्य संगीताची तोंडऒळख सोप्या शब्दांत करून देण्याचे काम अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित ’सिंफनी’ हे पुस्तक करून देते.

पाश्च्यात्य संगीताची सुरुवात आणि विकास चर्चच्या सानिध्यात झाला. युरोपात गाजलेले अनेक संगीतकार, वादक आणि गायक हे चर्चच्या छत्राखाली आणि सान्निध्यात आपल्या संगीताची आराधना आणि काम करीत होते. किंबहुना, पाश्चात्य संगीताचा सुरुवातीचा मोठा कालखंड हा चर्चच्या आधाराने विकसित झाला आहे. सिंफनी हे पुस्तक या संपूर्ण कालखंडाविषयी विस्ताराने माहिती देते. मध्ययुगापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत असा पाश्चात्य संगीताचा वेध हे पुस्तक घेते. बाख, बीथोवन, मोझार्ट यांच्यापासून ते एल्विस प्रिस्ले, बीटल्स आणि मायकेल जॅक्सनपर्यंत अनेक दिग्गजांची कारकीर्द, त्यांचे काम, आयुष्यातील चढ-उतार आणि यशापयश असा सगळा पट पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जातो. पाश्चात्य संगीतातील अनेकविध संज्ञाही पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात पाश्चात्य संगीताविषयी रस निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत भरगच्च माहिती असते, त्याचा  प्रत्यय येथे देखील येतो.

वर उल्लेख केलेल्या महान संगीतकारांची चरित्रेही विस्ताराने आणि चांगल्या पद्धतीने दिली आहेत. किंबहुना, तो या पुस्तकातील सर्वात रंजक भाग असावा. संगीतकारांची कारकीर्द आणि त्यांचे जीवन यांच्या वर्णनाच्या ओघात युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीचे ओझरते दर्शन आपल्याला घडत जाते.

विविध कालखंडात विभागणी करून पाश्चात्य संगीताची माहिती पुस्तकात देण्यात आलेली आहे. ती वाचताना आपण त्या जगाकडे निश्चितच खेचलॊ जातो. मात्र, सुरुवातीच्या काळातील संगीतावरील लेखन कदाचित पुरेशा ताकदीने संपादित झालेले नाही आणि काहीशा तुटकपणे मांडले गेले आहे असे वाटत राहते.

पाश्च्यात्य संगीताचा कालखंड हा मध्ययुगापासून या पुस्तकात गृहित धरण्यात आला आहे. इ.स. पूर्व ५०० च्या आधी ’ अंधार युग’ होते असेही मानले जाते. जवळजवळ नवव्या शतकापर्यंत युरोपियन चर्च संगीत आणि या वादन कला प्रकाराला ’सैतानाची कला’ म्हणून संबोधत होते. भारतीय़ संस्कृतीत संगीताचा माग काढला तर आपण अगदी वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. भारतीय संगीताला किमान चार हजार वर्षांचा इतिहास आहे यासारखे उल्लेखही सुखावणारे आहेत. राजे आणि श्रीमंताच्या आश्रयाने संगीताचा विकास झाल्याचे दाखले आपल्याकडे दिसतात. असाच प्रकार पाश्चात्य जगातही होता.

कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य बघावे की बघू नये हा नेहमीच वादाचा विषय असतो. गाजलेल्या पाश्चात्य संगीतकारांचे आयुष्य भारतीय मानकांनुसार कसे विस्कळित आणि अस्थिर होते हे ही पुस्तकातून जाणवत राहते. किंबहुना, ते वाचताना जागोजागी अलीकडेच येऊन गेलेल्या ’उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटाची आठवण येत राहते.

सिंफनी हे पुस्तक पाश्चात्य संगीताकडे आकर्षित करणारे निश्चितपणे आहे. ज्यांनी ते अद्याप ऐकले नाही त्यांनी तशी सुरुवात करण्याची मनोभूमिका हे पुस्तक तयार करून देते. याच पुस्तकातील काही वाक्ये उद्धृत करून शेवट करतो.

’संगीत आपले आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला मदत करते. संगीत आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मर्यादांच्या पलीकडे नेते. शरीर-मन-आत्मा यांना एकत्र आणते. आपल्या अंतर्मनाला बाह्य स्वरुपात व्यक्त होण्यास मदत करते. आनंद, राग आणि  दु:ख या तिन्हीमध्ये संगीत साथ देतं. आत्मिक समाधानाची अनुभूती म्हणजे संगीत!’

अशी अनुभूती ज्याला ज्या संगीतातून मिळेल त्याने ती तिथून घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते भारतीय असो, पाश्चात्य किंवा मग दोन्हीही!

Saturday, 13 July 2019

नमन नारायणा

दूरदर्शनच्या जमान्यातील काही मालिका आणि काही व्यक्तिरेखा आपल्या मनात कायमचे घर करून बसल्या आहेत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ मधील ‘माझ्या तुमच्या जुळता तारा’ सारख्या! नाही तर मग कार्यक्रम किंवा मॅच सुरू होण्यापूर्वी दिसणाऱ्या इस्टमनकलर आडव्या पट्ट्यांसारख्या. लहानपणीच्या आठवणींच्या कप्प्यात रुजलेली अशीच एक मालिका होती, मालगुडी डेज. त्यातही त्यातला तो ‘स्वामी’वाला मुलगा. त्याचा चेहरा, भाव, डोळे यांपासून ते त्या मालिकेतील दाक्षिणात्य वातावरणापर्यंत सगळं सगळं डोक्यात फिट्टं आहे. शिवाय मालगुडी डेजची शीर्षक सुरावटही. नंतरच्या की-पॅडवाल्या नोकिया मोबाइल्सच्या जमान्यात आपल्यापैकी कित्येकांनी ती रिंगटोन म्हणूनही मिरवली. आजही मध्येच कुठेतरी ‘तानाना तानानाना ना ’ ऐकू येतं आणि टाइममशीन आपल्याला मालगुडीच्या काळात घेऊन जातं.
नंतर... बरंच नंतर, कधी तरी कळले की मालगुडी डेज कुणीतरी आर.के.नारायण या माणसाने लिहिलंय अन् इंग्रजी साहित्यात ते मोठं वगैरे नाव आहे. तोपर्यंत इंग्रजी पुस्तके वाचण्याचा काही प्रश्नच उद्भवला नव्हता आणि स्वाभाविकपणे सगळे पोषण मराठीच्या जीवावर चालले होते. तर, असाच कधीतरी आर.के.नारायण नाव ऐकलं आणि हा माणूस मोठा आहे, असेही कळले. पण, मालगुडीच्या आधी त्यांचे नाव पोहोचले होते, ते गाइड चित्रपटामुळे. दूरदर्शनवरच पहिल्यांदा बघितलेला हा चित्रपट त्यांच्याच कादंबरीवर आधारित होता, हे कळले. त्यानंतर मालगुडीचा संदर्भ लागला.
तेव्हापासून आर.के.नारायण हे भारतीय साहित्यातील मोठे नाव वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांकडून कानावर पडायला लागले. चांगले आणि नियमित इंग्रजी वाचणारे किंवा शिकवणारे लोक ‘नारायण’ वाचायला सांगायचे. त्यामुळेही आकर्षण निर्माण झाले होते. पण, तेव्हापासून आजतागायत आर.के.नारायण यांचं साहित्य मुळातून वगैरे वाचणे जमलेच नाही. म्हणजे गाइड किंवा मालगुडीचा थोडा अपवाद, कुठे तरी आलेले अनुवाद, मध्येच एखाद्या दिवाळी अंकात वाचलेला एखादा लेख, इंटरनेटवर केलेलं वाचन असाच काय तो संबंध आला. जुन्या पुस्तकांबद्दल आणि साहित्यिकांबद्दल हे असंच होतं. गिरीश कार्नाड वारले की आता त्यांचे सगळे लिखाण वाचूनच काढू असा न पूर्ण होणारा निर्धार केला जातो. जे कर्नाडांचे तेच नारायण यांच्या बाबतीतही. नवं काही तरी पुढे येतं, ते ताज्या संदर्भांवर आधारलेलं असतं आणि मग आधी तेच वाचले जाते. जुन्या चांगल्या साहित्याबाबतचा संकल्प पुन्हा तसाच राहतो. पण, असं सगळं असूनही ही मोठी माणसं मनात वसलेली असतातच. आणि म्हणूनच म्हैसूरला जायचं ठरलं तेव्हा आर.के.नारायण यांचे तेथील निवासस्थान बघायचेच हे ठरवून टाकले होते.
म्हैसूरचा स्थळदर्शनाच्या यादीत ‘नारायण-निवास’ वगैरे नव्हतेच. सामान्यत: म्हैसूर फिरायला जाणारे फार कुणी या ठिकाणाचा आग्रह धरत नसावेत. हा ‘नारायण’ म्हैसूर मुक्कामी राहायचा हे कदाचित माहीत नसावे अथवा अप्रूप नसावे. असलेच पाहिजे असाही काही नियम नाही. पण, माझे पक्के होते, की हे ‘आर.के.’ निवास बघायचेच. म्हैसूरची इतर सगळी ठिकाणे बघितल्यावर तिसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सांगितले. आर.के.नारायण यांचे घर बघायचे आहे. ‘कोई म्युझियम है क्या?’ माझा कन्नड ड्रायव्हर नंदीश त्यांच्या कन्नड हिंदीत उद्गारला. ‘हाँ, म्युझियमच है’ मी माझ्या मराठी हिंदीत उत्तर दिले. मग, नंदीशने प्रयत्न सुरू केला ते घर कुठे आहे ते शोधण्याचा. पण, त्याच्या ओळखीच्या कुणालाच अशी काही ‘टूरिस्ट प्लेस’ आहे, याचा थांगपत्ता नव्हता. अखेर, गुगलबाबांच्या मदतीने माग काढत पोहोचलो आणि विवेकानंद रोडवरील त्या साहित्यमहर्षीच्या घरासमोर जाऊन उभे ठाकलो. दारावरच पाटी होती, ‘आर.के.नारायण हाऊस’. राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे नाव धारण करणाऱ्या सिद्धहस्त लेखकाचे घर.
भारतीय माणसाला गोष्टी आवडतात. आपलं जुनं सगळं साहित्य आपल्यापर्यंत गोष्टींच्याच तर रुपात पोहोचलेलं असतं. कशामुळे ठाऊक नाही, पण आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्टीवेल्हाळपणा ‘इन-बिल्ट’ आहे असं आपलं मला एक उगाच वाटत राहतं. ‘कसं आहे ना...’ ने सुरू करीत आपण हा गोष्टीवेल्हाळपणा रोजच खुलवीत असतो. आर.के. नारायण किंवा रस्किन बाँड यांचं साहित्य अशा ‘गोष्टी-स्वरुपा’मुळे आवडत असावं! अशाच आवडणाऱ्या, जगण्याच्या गोष्टी आयुष्यभर सांगत आलेला हा माणूस. पण, नारायण यांच्या घरात आपण प्रवेश करतो आणि त्यांची वेगवेगळी छायाचित्रे बघायला लागतो तेव्हा ही व्यक्ती बराचशी अबोल असावी, असं उगाचंच वाटत राहतं. एकदम गंभीर, दाक्षिणात्य विद्वतपुरुष वगैरे. काहीसा करारी. तरीही हजारो-लाखो वाचकांना भावेल अशी साहित्यनिर्मिती करणारा हा माणूस खुणावत राहतो.
म्हैसूरमधील जुन्या जमान्यातील भक्कम बांधकामाच्या दुमजली बंगल्याला उत्तम प्रकारे जपत त्याचे रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. सकाळी दहाच्या ठोक्याला उघडणाऱ्या या संग्रहालयात प्रवेश केला आणि भारतीय साहित्यात अजरामर ठरलेल्या या विद्वानाचे अनेक पैलू उलगडत गेले.
नारायण यांचा हा बंगला उत्तम प्रकारे जपला गेला आहे. मूळ घराचे स्वरुप तसेच राहील याची पुरेपूर काळजी घेत नवे काम करण्यात आले आहे. त्यांचे टेबल-खुर्ची, त्यांचे पोशाख, महत्वाच्या प्रसंगी, परिवाराबरोबर किंवा मोठ्या व्यक्तींबरेाबर काढलेली छायाचित्रे, भिंतीतील जुन्या पद्धतीच्या कपाटांमध्ये नीटसपणे रचून ठेवलेली ग्रंथसंपदा, त्यांच्या संग्रहातील इतर लेखकांची पुस्तके असा सगळा ऐवज आपल्याला त्यांच्या काळात घेऊन जातो. दुमजली बंगल्यात लहान-मोठ्या खोल्यांमधून नारायण यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल माहिती देणारे मोठाले फलक लावले आहेत. त्यांनी स्वत: केलेले लिखाण, त्यांच्याबद्दल इतरांनी लिहिलेले लेख, पद्मविभूषणपासून ते इतर पुरस्कार, पुस्तकांची भली मोठी यादी या फलकांमधून मांडण्यात आले आहे. या घराचे संग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा एक स्वतंत्र फलक लावला आहे.
आणि, या शिवाय लक्ष वेधून घेतात ती भिंतींवर रंगविलेली नारायण यांचीच स्वत:ची वाक्ये. एकाहून एक. 'Do You realize how few ever really understand how fortunate they are in their circumstances?' अशी वेगवेगळी वाक्ये वाचून आपण चमकतो आणि एक क्षण विचारातही पडतो. नारायणाची शब्दशक्ती, अजून काय? बंगल्याचा खालचा मजला आणि चॉकलेटी रंगात रंगविलेला वळणदार जिना चढून गेल्यावर दिसणारा वरचा मजला... नारायण सर्वत्र व्यापला आहे.
खुशवंत सिंह यांच्यासारख्या समकालीन लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेले लेखही येथे वाचायला मिळतात. या सगळ्यात संदर्भातून जुजबी का होईना, भारतीय इंग्रजी साहित्यातील हा माणूस आपल्याला माहिती होत जातो. संयुक्त राष्ट्र संघात काम केलेले माजी सनदी अधिकारी सी.व्ही.नरसिंहन यांनी नारायण यांचा एक किस्सा सांगितला आहे. २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नरसिंहन यांनी त्यांना अभिनंदनासाठी फोन केला तर त्यावर नारायण यांनी काय प्रतिक्रिया द्यावी, ‘आता मी पद्म विदूषक झालो’. दाक्षिणात्य नारळी तैलबुद्धी, आणखी काय? साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी देखील नारायणांचे नाव अनेकदा पुढे आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळू शकला नाही. असे एक ना अनेक पैलू या संग्रहालयाने कायमचे जतन करून ठेवले आहेत.
प्रचंड ग्रंथसंपदा असलेला हा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लिहिता होता. द हिंदूचे संपादक एन.राम त्यांना मृत्यूच्या काही तास अगोदर भेटले होते. व्हेंटिलेंटरवर असलेल्या नारायण यांनी त्यांना डायरी मागितली, कारण त्यांना आणखीही बरेच लिहायचे होते, सुचत होते. स्वत: राम यांनी लिहिलेला किस्साही येथे आपल्याला वाचायला मिळतो. शेवटपर्यंत सर्जकता टिकवून ठेवलेला तरीही ‘नव्वदीत गेल्यापासून मी लिहिण्याच्या बाबतीत अंमळ आळशीच झालो आहे’, असे मिश्किलपणे सांगणारा हा सिद्धहस्त लेखक आपल्याला त्या दुमजली घरात भेटत राहतो. आपल्याला दुरूनच माहिती असलेले आर.के.नारायण येथे किंचित जवळ येतात.
या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात म्हैसूर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नागपुरात ग्रेस, सुरेश भट यांच्यासारखी मोठी माणसे होऊन गेलीत. पण, नागपूर महापालिकेला त्यांचे स्मारक वगैरे उभे करावे, असे काही वाटले नाही, असा एक निरर्थक विचार माझ्यासारख्या नागपूरकराच्या मनात डोकावून गेला. पण, ते एक असो.
१९९० सुमारास नारायण यांनी हे घर सोडले आणि ते चेन्नईला राहायला गेले. १९४२ मध्ये लघुकथांचा संग्रह असलेले ‘मालगुडी डेज’ प्रसिद्ध झाले होते. जवळ जवळ सहा दशके हा माणूस लिहिता होता, हे लक्षात घेतले पाहिजे. अरे हो, या लिहित्या घराला अद्यापही दररोज शंभरच्या वर लोक भेटी देतात, हा एक सुखद धक्का तेथील ‘व्हिजिटर्स रजिस्टर’मुळे बसतो.
नशीब नावाची गोष्ट मोठी मजेदार असते. आर. के. नारायण नावाचा प्रचंड प्रतिभाशाली माणूस एका घरात जन्माला घातला. पण, त्या कुटुंबाचे सद्भाग्याचे पारडे बरेच मोठे असावे. त्याच घरात अजून एक प्रतिभावंत दिला पाठवून. नाव मिळाले, आर.के.लक्ष्मण! तेच, कॉमन मॅनवाले प्रसिद्ध व्यंगचित्रकार. नारायण यांच्या लेखनाला पूरक रेखाचित्रे लक्ष्मण यांनीच काढली होती. दोन भावंडांनी मिळून भारताला भरभरून आनंद दिला. दोन्ही भावांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. नारायण-लक्ष्मणाची जोडी रामायणानंतर भारतात पुन्हा अवतरली होती. आपल्यासारखे आपणच भाग्यवान.
‘मालगुडी डेज’ या मालिकेचे काही भाग कर्नाटकातील अगुंबे या गावात आणि तेथील एका वाड्यात चित्रित झाले होते. त्या आगुंबेला भेट देण्याची, अगदी त्याच वाड्यात राहण्याची संधी २०१३ मध्ये मिळाली होती. त्या ‘मालगुडी’च्या जनकाचे स्मरण जागविणारी वास्तू सहा वर्षांनी बघायला मिळायली. एक वर्तुळ पूर्ण झाले. आता, आर.के.नारायण वाचले पाहिजेत, मुळातून.....!

Wednesday, 5 June 2019

कुशीत कूर्गच्या आणि कावेरीच्या




अॅनाकोंडा, गॉडझिला किंवा त्या छापाचे चित्रपट आठवतात का? पडद्यावर काहीसा गूढ अंधार, अजगरासारखं शांत पडलेलं खोल पाणी, आजूबाजूला घनदाट झाडी अन् जंगल. घरात करमत नसल्यामुळे अॅडव्हेंचरला जाऊन फुकट जीवाला घोर लावून घेणारे गोरे आणि गोऱ्यांची पोरे. सगळं व्यवस्थित चाललं असताना मध्येच तो अॅनाकोंडा अवतरतो. पडद्यावर आणि थेटरात सगळ्यांचे जीव वर-खाली करायला सुरुवात करतो. नोटाबंदीनंतर आपले पंतप्रधान ज्या-ज्या वेळी टीव्हीवर येऊन ‘मित्रों’ म्हणाले तेव्हा अनेकांचा जीव असाच वर-खाली व्हायचा. ते एक असो. मुद्दा अॅनाकोंडाचा आहे. तर तो महाप्रचंड साप, त्याच्या अवतीभवतीचं गूढ वातावरण आणि टॉप शॉटसमधून दिसणारं, दूरवर पसरलेलं गर्द हिरवं जंगल. नव्वदीत आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला  डब केलेल्या फिरंगी चित्रपटांनी भारतात धुमाकूळ घातला होता. महाअजस्र प्राणी आणि ‘जॉन, वहाँ पर कुछ है’ असे डिस्कव्हरी छापाचे डबिंग असलेले हे पिक्चर फुल्ल माहोल पिटत होते. त्या चित्रपटांनी दाखविलेले जंगलांचं गूढ रूप तुम्हाला आठवत राहतं, ते गर्द काळपट हिरवेपण तुमच्या अवतीभवती पसरलेले असतं, तुम्ही कूर्गमध्ये असता! कर्नाटकातल्या कूर्गमध्ये.
उत्तर केरळला लागून असलेलं, कर्नाटकातील इतर शहरांपेक्षा पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेने जवळ असलेले कूर्ग.  राहुल गांधी यांनी अमेठीतून रणछोडदास होत जेथून लोकसभा निवडणूक लढवली, ते केरळातील वायनाड हे कूर्गपासून तीन तासांच्या अंतरावर. सरकारी जिल्हा कोडागू. उटी, म्हैसूर यांच्या तुलनेत कूर्ग तितकंसं पर्यटकांमध्ये अद्याप लोकप्रिय नाही. म्हणजे मागील दशकभराच्या कालावधीत कूर्गचं नाव लोकांपर्यंत पोहोचू लागलंय. आम्ही कूर्गला जाणार म्हटल्यावर नेमकं कुठाय ते, काय आहे तिथे बघण्यासारखं वगैरे प्रश्न आपसूकच येत होते.  मुळात कूर्ग नावाचं ठिकाण असं काही अस्तित्वात नाही. मडिकेरी हे या जिल्ह्यातलं मुख्य गाव. प्रशासकीयदृष्ट्या महत्वाचं. पण, लोकांचं कूर्गकडे लक्ष जाण्याचं कारण येथे जिकडेतिकडे पसरलेलं जंगल आणि आल्हाददायक वातावरण. कूर्गमध्ये जंगल आहे म्हणण्यापेक्षा हा अख्खा जिल्हाच जंगलात वसवला आहे, असे म्हटले तर तो ‘जुमला’ठरू नये. खरं तर मला अतिशयोक्ती शब्द वापरायचा होता, पण ते एक असो.
बंगलोरहून निघाल्यावर म्हैसूरला मागे टाकत आपण मडिकेरीला पोहोचू शकतो. मुळात म्हैसूर हेच एक सुंदर शहर आहे. पण, कूर्गची हवा वेगळी. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंचीवर रेनफॉरेस्टने व्यापलेलं हे ठिकाण. वळणदार रस्ते, ज्या रस्त्याने जाल तिकडे आजूबाजूला उंचच उंच वाढलेली झाडं, साथीला नारळ आणि कॉफी. ज्यांनी हिमालय बघितला आहे त्यांना येथील वळणदार रस्त्यांचे आणि थंडीचे फार काही वाटणार नाही. पण,  ही तुलना केली नाही तर आनंदात आणखी थोडी भर पडेल हे निश्चित.
सुरुवातीला उल्लेख केला तशी अॅनाकोंडाची आठवण करून देणारी ठिकाणी कितीतरी सापडतील. निसर्गधामसारखं वन विभागाने विकसित केलेलं ठिकाणं असो की हत्तींसाठी विशेषत: बनविलेला दुबारे एलिफंट कॅम्प! कूर्गला कावेरी नदीचं वरदान लाभलंय. मुळात कावेरी नदीचा उगमही याच जिल्ह्यातला. तालकावेरी येथील डोंगरातून ही नदी उगम पावते. तिथे आता मंदिर उभं राहिलंय आणि आजूबाजूला दूरवर पसरलेली घनदाट अभयारण्य हा प्रदेशच संरक्षित जंगल म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथून निघालेली कावेरी जिल्हाभर बागडत राहते. निसर्गधाम हे छोटंस बेट तिनंच निमाण केलेलं. अॅनाकोंडावालं फिलिंग देणारं. दुबारे एलिफंट कॅम्प म्हणजे लहान मुलांसाठी आणि लहानांसारखं मन असणाऱ्यांसाठी मज्जेचं ठिकाण. २०-२५ लहानमोठे हत्ती, कावेरी नदीत त्यांच डुंबणं, त्यांच्या सेवेत असलेले आणि या महाकाय प्राण्याला मुठीत ठेवू बघणारे माहूत यांचं हे विश्व. या कॅम्पवर जाण्यासाठी कावेरी नदी ओलांडून जावं लागतं.  नदी फुल फॉर्मात असते तेव्हा बोटींनी कॅम्पपर्यंत जावं लागतं. आम्ही गेलो तेव्हा पाणी बरेच कमी होते आणि नदीतील दगड वर आलेले. तरीही वेगवान, खळाळत्या कावेरीतून, पाण्यातून आणि दगडांवरून तोल सावरत जाणं म्हणजे सही मजा. काळपट, हिरव्या रंगाच्या कावेरीतून पावलं टाकत आपण हत्तींच्या राज्यात पोहोचतो. हत्तींना चारा खाऊ घालणं, त्यांच्या अंगावर पाणी घालणं, त्यांनी सोंडेतून उडविलेला फवारा आणि त्याचा आपल्या अंगावर होणारा अभिषेक! रोजच्या जगण्यात आपण लहान-सहान आनंदांना पारखे झालो असतो. काहीतरी वेगळं घडावं म्हणून आस धरून बसतो आणि डिजिटल थ्रिल किंवा आनंद शोधत बसतो. हत्तींच्या सान्निध्यात केलेली मस्ती तुमच्यातील लहानपणाला पुन्हा जागं करते. खळखळणारी कावेरी तुमच्यातील अवखळपण पुन्हा एकदा जागवते. कावेरीच्या काठाने पसरलेली मोठाली झाडं आणि वेली नदीच्या पाण्यावर सावली धरून उभी असतात.  त्या सावलीचा थंडगारपणा आपल्याही मनावर पडत जातो.  कावेरीच्या भवताल पसरलेला शांतपणा आपल्यात भिनत जातो. निसर्ग आपल्या जवळ येऊन उभा ठाकतो. कूर्गच आणि कूर्गच्या कावेरीचं दर्शन सार्थक होतं. समाधान आणि आनंद सोपा-सोपा होऊन मिळत राहतो. आपण थबकलो असतो, पण कावेरी नाही आणि तिचा प्रवासही नाही.
..........................

Monday, 4 March 2019

घरं बोलत राहतात...



ऐसपैस पसरलेला वातावरणातील निवांतपणा, काहीसा गूढ पण तरीही हवाहवासा वाटणारा सावली-प्रकाशाचा खेळ आणि जोडीला खिडक्या-छपरांवरून उतरू पाहणाऱ्या वेली! प्रकाशाचा एक तिरपा कटाक्ष झेपावतो आणि त्याच कौला-वेलींवरून ओघळत जातो शब्दांचा मेळ! प्रकाशाचा वाटेने शब्द उलगडत जातात. आपला भवताल गच्च धरून उभ्या असलेल्या घराचे अवकाश कवेत येत जातं. किमया घडत जाते अन् घरं उमगत जातं!
माधव आचवलांनी १९६१ मध्ये लिहिलेलं ‘किमया’ हे घरांबद्दल बोलणारं पुस्तक रंगकर्मी अतुल पेठे उलगडून दाखवत होते, तेव्हा आसपास असंच काहीसं होत होतं. घर नावाचं अफाट प्रकरण आपल्या आयुष्यात तळ ठोकून बसलं असतं. उसवलेल्या दिवसाला संध्याकाळचं अस्तर  लावण्याच्या धडपडीत या घराकडे बघणं राहूनच जातं. लाखा-लाखांची आपली घरं आपल्यासाठी ‘प्रवाशांसाठी निवारा’ झाल्यासारखी झाली आहे. बाहेरच्या जगाने घरातलं जगणं बॅकफूटवर ढकललंय. पाय पसरून, डोळे मिटून अन् श्वास भरून घर स्वत:त सामावून घेण्याचे क्षणही तर मोजकेच झालेय.

कुणा त्या भन्नाट माणसाच्या डोक्यात आले असेल ना, ‘चलो, अभी सेटल होना है’! आणि माणसाने भटकंती सोडून घरं बांधायला सुरूवात केली. घरं काय अन् वास्तू काय! रंग, गंध, स्पर्श, सूर, नाद, इतिहास, भाषा, कला असे जगण्याचे हजारो कंगोरे आपल्यात सामावून घेऊन उभ्या असतात. अन् एवढ्याने काय होतंय? माणसाच्या जाणतेपणाचे आणि मूढत्वाच्या  प्रवासाचे पुरावे घेऊन वास्तू उभ्या आहेत जागोजागी! आपण, त्यांच्या समोर जाऊन उभं राहावं तर बोलायला लागतात!

म्हणे, माणसांचा इतिहास हा स्थलांतरांचा इतिहास आहे. आणि असं असेल तर घर काय असतं, हे स्थलांतरितांइतकं चांगलं कोण सांगू शकेल! येथे पुन्हा आपण कधीही राहणार नाही, हे लक्षात आलं असतं. उंबरा ओलांडून आणि पाठ फिरवून जाण्याच्या अगोदर घराच्या भिंती-दारांवरून हात फिरवून बघतात. काय साठवून घ्यायचं असतं त्या स्पर्शात! जणू काही आयुष्यभर तो स्पर्श टिकणार आहे, अशा असोशीने चाललं असतं. पण, त्याचं महत्व स्थलांतरितांना ठाऊक असतं, नाही तर मग मायबापाचं घर सोडून सासरी जाणाऱ्या लेकीला!

घरं बोलत राहतात, वास्तू सांगत राहतात. चित्र बोलतात ना तसंच! आपल्या आपल्या मनस्थितीनुसार पट विणत राहतात. हो, मनस्थितीनुसार पालटतं ना घरांचं जाणवणं! म्हणजे जी.ए.कुलकर्णी वाचून बाहेर पडलं तर एखादं घर केशवपन केलेल्या लाल वस्त्रातल्या विधवेसारखं जाणवायला लागतं. पु,लं. वाचून फिरायला निघावं तर तेच घर सुस्नात होऊन कोवळ्या उन्हात केस वाळवत बसलं असतं, नवथर तरुणीसारखं! घरं जाणवतात, निश्चितच!

घराशी बांधून राहणं हे भौतिकतेत गुंतत राहणं की त्याच घरात देवासमोर बसून त्यांच्याशी खुल्ला संवाद साधणं हे मोह-मायेच्या पलीकडलं. पहिलं जमलं तर राजस भाव रुजतो, दुसरं साधलं तर सात्विकतेचा सुगंध पसरतो. घरं, सगळंच साधतात. घरं मंदिरं होऊन जातात. कोणार्क आणि खजुराहोसारखी. प्रतिकं होऊन जातात समृद्धी, तादात्म्य, सौंदर्य, ऋजुता आणि एकरूपतेची! अध्यात्म तरी काय वेगळं असतं ना!

मंदार मोरोणे, नागपूर





Saturday, 8 December 2018

पुलं.... असेच थांबून राहा!


पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाच्या गारुडाने घात करण्यास सुरुवात केली तेव्हा ‘टीनएजर’चा टॅग नुकताच लागला असावा. हे गारुड त्या नंतरच्या प्रत्येक पुस्तक, भाषण, ऑडियो आणि व्हिडियोगणिक वाढत गेले. त्यानंतरच्या किमान दहा वर्षात ‘देशपांडे’ नामक या व्यक्तीने आयुष्यात धूमाकूळ घातला होता. बाजीप्रभूंच्या स्मरणाने बाहू फुरफुरले असतील तर या देशपांड्यांच्या वाचनाने बुद्धीला आणि भाषेला तरतरी येत गेली. आयुष्य जसजसे पुढे जाते तसतसे मागे सुटलेल्या वाटांकडे असोशीने बघणे वाढत जाते. आपल्या गावातील घराकडे कसे आसुसून बघत असतो आपण! वय चाळिशीकडे झुकत असताना आणि डोक्यावरचे ‘सिल्वर लायनिंग’ वाढत असताना, ‘पुलं’ कडे वळून बघणे हे असेच असोशीचे आहे.

कामाच्या धबडग्यात कोपऱ्यात किंवा पलंगाखाली ठेवलेल्या बॅट-बॉलचे विस्मरण झाले असते. मग मध्येच कधीतरी आई किंवा बायको साफसफाईचे काम सांगते. वाढत चाललेले पोट आणि अकडलेली कंबर सावरत वाकल्यावर पलंगाखालची बॅट-बॉल नजरेस पडते. तो आनंद शब्दात सांगता येत नाही. किंवा ती रुखरुखही असते. आज, इंग्रजी-मराठी, रिअलिस्टिक, फिक्शन, पुरोगामी प्रचारकी किंवा जडजंबाळ काहीतरी वाचत असताना मध्येच टीनएजमध्ये गवसलेल्या ‘पुल’ नामक ठेव्याची आठवण येते. बॅट-बॉलवाले फिलिंग पुलंच्या आठवणीने जागे होते.

पुलंचे पहिले वाचलेले पुस्तक म्हणजे ‘असा मी असामी’.  माझ्या मामांकडे गेलो असताना त्यांच्या संग्रहात मिळालेले पुस्तक. एक किंवा दोन दिवसात ते वाचून काढले आणि त्या नंतर या देशपांडेशाहीचा अंमल सुरू झाला. पुस्तके विकत घेण्याचा आणि घेऊन देण्याचा शिरस्ता आमच्या घरी आता तिसऱ्या पिढीतही पाळला जातोय. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ‘जादूची चटई’, ‘महेश उडाला भुर्रर्र’ अशी खरेदी थांबली होती त्याच काळात घरात ‘फास्टर फेणे’च्या जोडीने ‘पुल’ येऊ लागले. त्यांच्या पुस्तकातील मध्यमवर्गीय माहोल डोळ्यासमोर चित्रे निर्माण करू लागला. वर्णन कसे करावे, शब्दांचा वापर कसा करावा, शब्दांच्या निरनिराळ्या अर्थांचा चमत्कृती, लेखनात त्यांचा कसा वापर करावा अशा अनेक गोष्टी रुजत गेल्या. तिरकस नजरेने एखाद्या गोष्टीकडे कसे बघावे, विरोधाभासातून होणारी गंमत कशी टिपावी, गंभीर बाबीमागे दडलेला विनोद कसा समजून घ्यावा हे कळू लागले ते याच पुलंच्या लेखनातून. हे सगळे करतानाही भाषा सहजसोपी कशी राखावी याचे सुरुवातीचे धडे कदाचित याच काळात बुद्धीच्या कोपऱ्यात रुजत गेले असावेत असे आता जाणवत राहते. विशेषत: पत्रकारिता करताना सोपे, सहज आणि लहान वाक्ये लिहिण्यावर सातत्याने भर दिला जातो. शेवटपर्यंत आपल्याला असं सोपं लिहिता येतंय की नाही याचा संभ्रम कायम असतो. या बाबत ज्या ज्या वेळी शंका निर्माण होते त्या त्या वेळी पु. ल. देशपांडे यांची आठवण् येते.  सोपे लिहीत असतानाही शब्दांचे खेळ, त्यांचे लालित्य, त्यांच्यातील अर्थवैविध्यता, त्यातून निर्माण होणारी गंमत हे ही जपता आले पाहिजे असे वाटत राहते. ते करायचे तर शब्दसाठा जितका समृद्ध हवा आणि तितकाच तो चपखलपणे लिखाणातून उतरायलाही हवा. हे असे वाटण्यामागील प्रेरणा नि:संशयपणे पुलंच आहेत. संशोधनाच्या पद्धतीने त्यांचे साहित्य कधीही न अभ्यासले नाही. मात्र या गोष्टी थोड्याफार जमू लागल्या हे त्यांच्या लिखाणाच्या वारंवारच्या वाचनातूनच आले आहे.

साधीसोपी वाक्यरचना करतानाही एखादे शब्दचित्र कसे उभे करावे याचा वस्तुपाठ त्यांच्या प्रत्येक लिखाणातून येत राहतो. पत्रकारितेच्या मागच्या १३-१४ वर्षांच्या काळात सातत्याने मुलाखती घेत आलो आहे.  या मुलाखती लिहिताना त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आपल्या लिखाणातून उभे राहावे याची काळजी वाटत राहते. आणि या काळजीतून ज्या वेळेस लिखाण सुरू होते त्या प्रत्येक वेळी अनाहूतपणे संदर्भ असतात ते पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीची! त्यातील एकेक व्यक्तिरेखा म्हणजे अभ्यासावी आणि वारंवार अभ्यासावी अशीच आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे आपल्याही लेखनावर होत राहतो. एखादी व्यक्ती बसते, उठते, चालते कशी, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, हालचाली, एखाद्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल हे सगळं टिपलं पाहिजे. टिपलेलं हे सगळं आपल्या लिखाणात आलं पाहिजे आणि आलंच तर ते कसे यावे तर मग ‘पुलं’ सारखे यावे, ही सगळी विचारप्रक्रिया मनात ठसली आहे. व्यक्तिआधारित लेखनाचा आदर्श किंवा वस्तुपाठ कोण असावा तर पु. ल.  देशपांडेच इतका त्यांचा प्रभाव जवळपास दोन दशकांनंतरही टिकून आहे.

पत्रकारांसाठी किंवा कोणत्याही लेखनासाठी निरीक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते जितकं चांगलं तितक्या अधिकाधिक गोष्टी तुम्हाला तुमच्या लेखनातून मांडता येतात. ‘पुलं’ या दृष्टीने अभ्यासणं हे देखील रंजक आहे. चितळे मास्तरांच्या कोट-टोपीपासून ते त्यांच्या फाटक्या चपलेपर्यंत, सखाराम गटणेच्या डोक्यावरून टोपीपासून ते पेस्तनकाकांपर्यंत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर खणखणीतपणे उभी राहते. त्यांच्या कोणत्या तरी लेखात त्यांनी ‘मठ्ठ गोदी’ असा शब्दप्रयोग केला होता. त्यातून जे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले, ते आजही त्या प्रकारची एखादी मुलगी समोर आली की आठवून जाते अन् नको त्या वेळी अकारणच ओठांवर हसू उमटते. ऑल क्रेडिट गोज टू मि. पीएल. ! निरीक्षणाच्या या त्यांच्या ताकदीचे आजतागायत अप्रूप वाटत आले आहे.

पण, या जरा तांत्रिक गोष्टी झाल्या. सर्वात महत्वाची गोष्ट पुलंनी काय दिली असेल तर ती म्हणजे विनोद कळण्याची समज! दुसरे एक ते तिरकसपण. आणि तिसरे शब्दांशी खेळत होणारी विनोदनिर्मिती. चौथे आयुष्यात अकारण उद्भवणारे गंभीरपण. काही काही लोकांच्या आयुष्यात हे गंभीरपण जरा जास्तच डोक्यावर येऊन बसले असते. म्हणजे अशा लोकांना गंभीर राहणे आणि गांभीर्य असणे, यात फरक असतो, हेच बहुतेक कळत नाही. थँक्स टू पुलं, माझ्या मानगुटीवर हे अवास्तव गांभीर्याचे भूत मानेवर बसले नाही. अनेक कठीण गोष्टी आणि घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. आजूबाजूची परिस्थिती गंभीर असतेही. क्वचित मनावर दडपणही असते. पण, अशाही परिस्थितीत त्या घटनेतील गंमत टिपण्याची क्षमता थोडीफार अंगी आली असेल तर ती पुलंच्या साहित्याच्या वाचनातून आली हे निश्चितच. पहिल्या संस्कारांचे श्रेय पुलंचेच! आपल्या अवतीभवती एखादा ध्येयवादी. टिपिकल माणूस दिसला की आपसूक ‘सखाराम गटणे’  आपल्याला आठवतो, घरोघरी खपणारे नारायण आपण टिपू लागतो, हे सगळे श्रेय कुणाचे., निर्विवाद पुलंचेच! दासबोध, तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी या नंतर मराठीत काही लिहिले नाही तरी चालेल, असे व.पु. काळे यांनी कुठेतरी लिहिल्याचे स्मरते. व्यक्तिरेखा मांडण्याच्या बाबतीत, व्यक्ती आणि घटनांमधील विसंगती टिपण्याच्या बाबतीत आणि त्या सगळ्यातून विनोद निर्मिती करण्याच्या बाबतीत पुलंनी केलेल्या कामानंतर पुढे काही लिहले नाही तरी चालेल.

 पुलंच्या सगळ्याच साहित्यात एक मध्यमवर्गीय वातावरण आणि जुन्या काळातील भारलेपण काठोकाठ भरले आहे. त्या काळातील मध्यमवर्गीय मूल्ये, ते संस्कार आधुनिक काळात धूसर होत चाललेले आहेत. मधल्या काही वर्षांमध्ये मध्यमवर्गीय आणि त्यातही ब्राह्मणी मूल्यांना नाकारत सुटण्याचा एक खेळ महाराष्ट्रात सुरू झाला जो आजतागायत कायम आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात जे लोकमान्य टिळकांचे झाले ते साहित्य आणि लेखनाच्या क्षेत्रात पु.ल. देशपांड्यांचे करण्याचाही खेळ काही जणांनी खेळून पाहिले. या तथाकथित पुरोगामीपणाचा पगडा मनावर बसलाही. पण, आता सर्वत्र आक्रस्ताळेपणाचा कळस झालेला दिसत असताना पुलंच्या साहित्याचे महत्व आणखीच अधोरेखित होते. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून वाचक-श्रोते आणि प्रेक्षकांना निखळ आनंद महाराष्ट्रात सर्वाधिक कुणी दिला असेल तर तो पु.ल. देशपांडे यांनीच दिला आहे हे नाकारता येत आहे. हे सगळे करीत असताना त्यांनी स्वीकारलेली ‘एक होता विदूषक’ प्रकारची भूमिकाही अनुकरणीय ठरते. तेच मध्यमवर्गीय वातावरण, लहानसहान गोष्टींमधून आनंद शोधण्याची वृत्ती आणि गतकाळातील चांगल्या गोष्टींना आस्थेने कवटाळणे याचे अप्रूप आहेच. किंबहुना, ते सगळे पुढील पिढीपर्यंत जावे असेही आवर्जून वाटते. या सगळ्यांसाठी आयुष्यात ‘पुलं’ नावाचं भारावलेपण कायम राहावे, ही अपेक्षा अवास्तव ठरणार नाही.

पुलंनी माझ्यासह असंख्य सामान्यांच्या आयुष्यात ज्या दोन गोष्टींची सहजपेरणी केले त्या म्हणजे संगीत आणि बंगाली भाषा! माझ्यासारख्या ज्यांना शास्त्रीय किंवा कोणत्याच संगीतातील काहीच कळत नाही अशांमध्ये ख्याल, ठुमरी, रागदारीपासून सुगम संगीतापर्यंत विविध गायनप्रकारांची गोडी निर्माण करण्याचे काम जितके पुलंनी केले ते इतर कोणत्याही संगीत क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केले नाही. हीच गोष्ट बंगाली भाषेची! म्हणजे  सशस्त्र क्रांतिकार्यामुळे महाराष्ट्राच्या मनात बंगाल वसला आहेच. त्यानंतरच्या काळात बंगाली भाषा, साहित्य, संगीत आणि अर्थात शांतीनिकेतन यांच्याबद्दलची ओढ पुलंमुळेच निर्माण झाली आहे. जग फिरून आल्यावरही अद्याप शांतीनिकेतन बघितले नाही अशी रुखरुख व्यक्त करणारेही लोक माझ्या ओळखीचे आहेत. या अवस्थेमागील कारण पुलंनी रवींद्रनाथ, त्यांच्या कलाकृती आणि शांतीनिकेतन यांच्याबद्दल मराठीतून केलेली वातावरण निर्मिती हेच आहे. हे आकर्षण इतके आहे की वेगळ्या भाषा शिकण्याच्या यादीत अद्यापही बंगालीच पहिल्या क्रमांकावर आहे.

सुरुवातीच्या काळात आपल्या रोल मॉडेल्समध्ये अनेक मान्यवरांच्या समावेश असतो. हळूहळू त्यातल्या अनेकांचे पाय मातीचेच होते हे कळल्यावर ते आकर्षण कमी होत जाते. सुदैवाने ‘पुलं’च्या बाबतीत असं काही घडलेले नाही. किंबहुना ते घडूच द्यायचे नाही. विशेषत: सध्याच्या टोकाच्या, आक्रस्ताळ्या, असंख्य विद्वेषांच्या काळात आणि मनामनात फूट पडलेल्या काळात पु.ल.देशपांडे हे मनाला आल्हाद देणारे ‘आनंदनिधान ठरतात’. मध्यमवर्गीय म्हणून हिणवा, अभिजात आहे की नाही यावर लाख चर्चा करा, आम्हाला ‘पुल’ हवे आहेतच. पुल, तुम्ही आयुष्यात असेच मस्तपैकी अस्ताव्यस्त पसरलेले राहा. माझ्याच नाही तर माझ्या पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीपर्यंत असेच कायम राहा! आम्हाला तुम्ही हवेच आहात!

Wednesday, 3 October 2018

मि. गांधी, इटस फॉर यू!



मि. गांधी, अभिनंदन. तुम्ही १५० वर्षांचे झालात. केक पाठवतोच तुम्हाला, पण म्हटलं चला जरा गप्पा पण मारून घेऊया. तसं तुमच्या बर्थडेलाच लिहिणार होतो . पण, तेव्हा भक्तीचा महापूर आला होता. सोचा, भक्तीरसाचे पाझरणे थोडे थांबू देऊया, मग तुम्हाला एक कॉल मारू! आता कसं आपल्याला दोघांनाही फुरसत आहे. ते काय आहे ना,  माझ्यातच थोडा प्रॉब्लेम आहे. असा एका कोणत्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राहून राहून गहिवर दाटून येत नाही. मग ते तुम्ही असा, सावरकर असा नाही तर हेडगेवार असा. राम-कृष्णाबद्दलच आपलं असं भक्तीचं नातं नाही, त्यामुळे तुम्हा कुणाबद्दल असण्याचा काही प्रश्नच नाही. आता, यात तुम्हा कुणाचा अनादर करण्याचा काही हेतू नाही हो बावा.! नाही तर घ्याल मनाला लावून. पण, त्याचं काय आहे ना, ‘अखिल भारतीय देव बनवा संघटने’चे आपण चार आण्यांचे सुद्धा सदस्य नाहीत. मग तो देव कोणताही असो. पण, म्हणून तुम्हा कुणाबद्दल राग नाही, हे नक्की! म्हणजे काय होतं ना, की कुणी असं ‘बापू’ वगैरे म्हटले, की कानावर हात ठेवून किंकाळणारी निरुपा रॉय नाही तर ए.के. हंगल आपल्याला आठवतात. सो ते राष्ट्रपिता, बापू वगैरे काही मला जमलं नाही. जसं मला देव नामक एन्टिटीपुढे कर्मकांड करणं जमत नाही, तसंच!
पण, तुम्ही मला राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक नेते म्हणून निश्चितच भावता. तुम्ही सगळेच. त्यातही मि. गांधी, तुम्ही तुमच्या समकालीनांपेक्षा सरसच होता. राजकारणी हा चतुर, धूर्त, लोकांची नस ओळखणारा, लाट तयार करणारा, लाटेवर स्वार होणारा, योग्य वेळी भूमिका नव्वद अंशाच्या कोनातही बदलण्याची तयारी असणारा असावा लागतो. तुम्ही असे होतात. समाजशास्त्रांचा, माध्यमशास्त्राचा आणि पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून तुमच्याकडे कितीतरी वेळा बघतो, विचार करतो. पॉलिटिकल कम्युनिकेशन नावाचा प्रकार तुम्ही काय प्रभावीपणे हाताळलात.! समाजातील बहुसंख्यांना काय अपिल होईल याचं तुमच्या इतकं अचूक ज्ञान तुमच्या समकालींनापैकी कुणालाच नव्हतं, असं आता वाटतं राहत. राजकारण करताना प्रतिके तयार करणं खूप महत्वाचं असतं. या प्रतिकांमधून सामान्यांपर्यंत संदेश पोहोचवायचा आणि त्यांना आपल्याशी जोडून घ्यायचं हे कसबी राजकारण्याचं कौशल्य असतं. मि. गांधी, तुम्ही यात खूपच वरचढ होतात. ते तुमचं पंचा नेसून असणं, आत्म्याचा आवाज, चरखा, मिठाचा सत्याग्रह, प्रभात फेरी, उपोषण आणि त्यागमूर्तीवाली प्रतिमा. सगळंच अप्रतिम!
भारतीय मनाला त्यागाचं, साधेपणांचं पूर्वापार अप्रूप आहे. तुमच्याही पूर्वीपासून. ऋषी, मुनी किंवा संतपरंपरेतून आलं असेल का ते. तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. तुम्ही ते अप्रूप बरोबर हेरलं. आयुष्यभर पंचा स्वीकारणे सोपे नाहीच पण ती झाली दिसणारी कृती. त्या कृतीतून तुम्ही राजकीय नेते म्हणून ज्या खुबीने लोकांशी स्वत:ला जोडून घेतलं, ते लाजवाब होतं. तीच बाब चरख्याची, खादीची, प्रभात फेरींची, उपोषणांची! चरखा चालवून आणि येथे खादी घालून काही मँचेस्टरच्या कापड गिरण्या बंद पडल्या नसत्या. इंग्रजांनी आणखी कोणत्या तरी देशात कापूस उगवून त्या चालविल्याच असत्या. म्हणजे भारतीय लोक त्यांचे कपडे घालीत नाही म्हणून काही इंग्रज उद्योगपती रस्त्यावर नसते आले. अशी आपली कितीशी पर्चेसिंग पॉवर असेल तेव्हा. आजच्या सारखी मार्केट म्हणून देखील आपली गणना नव्हती. म्हणजे मला माहिती नाही, पण असलं काही लॉजिकल आणि माहितीपूर्ण तुमची भक्तमंडळी आमच्यासमोर सहजपणे आणत नाही. येतात ते तुमचे संतत्वाचे आणि भक्तीचे उमाळे. त्यात काही आपल्याला इंटरेस्ट नाही.
हा तर मुद्दा चरख्याचा आहे आणि सगळ्या प्रतिकांमधून तुम्ही साधलेल्या राजकीय संप्रेषणाचा किंवा जनसंवादाचा आहे. लोकसंग्रह करावयाचा आणि त्याला क्रियाशील करायचे, त्यासाठी बहुसंख्य लोकांना सहजपणे करता येईल असा कार्यक्रम देणे आवश्यक असते. लोकसंग्रह आणि संघटनशास्त्रामधील अगदीच बेसिक नियम. चरखा कातण्यासारखं कुणालाही करता येणारं, खादीसारखं क्रांतिकारी फिलिंग देणारं सोप्पं काम तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडलं. भगतसिंह किंवा सावरकरांचा मार्ग चोखाळणं प्रत्येकाच्या आवाक्यातलं नव्हतं. इतक्या मोठ्या समर्पणाची तयारी सगळ्यांची नसते. पण, सोप्पं काम दिलं की लोकं आपल्याला जास्त प्रतिसाद देतात हे तुमच्यातील लोकनेत्याने अचूक ओळखलं होतं. प्रभावीपणेही राबविलंही. तुमचं यश सगळ्यांसमोर आहे.  बॉस, आपकी इस अदा पें हम फिदा है! याला जोड तुमच्यातील व्यवस्थापन कौशल्याचीही. माणसांपासून ते संसाधनांपर्यंत, आश्रमापासून ते काँग्रेसपर्यंत सगळ्यांचच व्यवस्थापनही अभ्यासण्यासारखं वाटत राहतं
इतका मोठा देश, कम्युनिकेशनची कोणतीही प्रभावी साधनं नसताना स्वत:शी जोडून घेणे, हा जोक नव्हता. यू डीड इट.! इतका जबरदस्त पॉलिटिकल कम्युनिकेटर आपल्या देशाने आजवर बघितलेला नाही. सो आपला सलाम, तुमच्यातील त्या चतुर राजकारण्याला, संवादशास्त्रावर अचूक पकड असलेल्या व्यक्तीला.
तर, मि.गांधी, भेटत राहूच. तुम्हीही भेटत राहा. भक्तांची रांग जेथे संपेल, तिथून थोड्या दूर अंतरावर  उभा आहेच मी. सवड मिळाली की मिस्ड कॉल द्या नाही तर हात दाखवा. बसू गप्पा मारत.! फॉर नाऊ, बाय बाय!
…………………………………

Sunday, 30 September 2018

मौनाची रुपं हजार…!



डिसेंबर महिन्याची संध्याकाळ… किंवा रात्र म्हणा.. मेळघाटातील गारेगार वातावरणात आम्ही तीन मित्र निघालोय गाडीतून. आजूबाजूच्या जंगलात मिट्ट् काळोख भरलेला आणि रस्ता सुनसान. सहज म्हणून एका ठिकाणी गाडी थांबविली आणि तिघेही बाहेर आलो. वर मोकळं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि वातावरणातला सॉलिड गारवा. अशा वेळी गझलगायक मित्र आल्हाद काशीकरच्या अंगात जगजित सिंगांचं वारं घुसलं नसतं तरच नवल. तो ‘जिंदगी धूप तुम घना साया’ गुणगुणू लागला आणि गंधर्वाच्या घरचं जेवण जेवलेल्या विकास केमदेवांनी सुमोच्या बॉनेटवर ताल धरला. पुढचा अर्धा तास जगजितसिंहांनी आम्हाला भारून टाकलं होतं. आल्हादचा सूर थांबला तसा केमदेवांच्या ठेक्याने विराम घेतला आणि  जाणवलं, आता अंतर्बाह्य व्यापून टाकण्याची जबाबदारी मेळघाटी शांततेने घेतली आहे.  पुढची काही मिनिटं ते मौन अंगात पाझरत होतं, अचानक आपलं सगळं अस्तित्व मौनात विरघळत चाललंय अशी जाणीव दाटून राहिली आणि अंधारभारलं मौन नखशिखांत व्यापून उरलं.
मौन कायमच भावत आलंय मला. पाऊस जसा प्यारा, तितकंच आकर्षण मौनाचंही.  आणि त्याच्या भिन्न भिन्न आविष्कारांचंही. अहिंसेच्या प्रॉडक्टला गांधीजींनी ब्रँड बनवला तसा मौनाला विनोबांनी ग्लॅमर मिळवून दिलं. पण, कुठलंच मूल्य एका व्यक्तीचा कॉपीराइट कसा असेल? मूल्य तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे अनुभवायचं असतं. मूल्याची अंतर्भूत ताकदच जगणं व्यापून टाकण्याची असते आणि मौनाची तर निश्चितच असते. मौनाची अशी कवेत घेणारी  रुपं आपल्यापैकी सगळ्यांनाच तर येऊन भिडत असतात जागोजागी, क्षणोक्षणी!
कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागात बसलो होतो. सोबतीला विज्ञान आणि पावसाचे कॉपीराइट ओनर मयुरेश प्रभुणे होतेच. विद्यापीठात शिरतानाच कमालीचा उकाडा जाणवत होता आणि अवघ्या अर्ध्या तासात काळोख दाटून आला. विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस काळोख दाटून आला. विद्यापीठाच्या लाल विटांच्या भिंतीच्या बॅकड्रॉपवर पाऊस सरसरा कोसळू लागला. तिथल्याच एका पॅसेजमध्ये उभा राहून पाऊस बघत होतो आणि समोरच्या बसक्या इमारतीवर मोर येऊन बसला. गपगुमान पिसारा गुंडाळून पाऊसधारांमध्ये भिजत उभा होता. पाच मिनिटे, दहा मिनिटे करीत तब्बल अर्धा तास पावसाचा नाद निनादत होता, तो मोर भिजत होता आणि मी अवाक्षरही न बोलता तो पूर्ण वेळ हा अनुपम सोहळा बघत शांत होत होतो.
कुरुक्षेत्रात असंख्य धार्मिक स्थळं आहेत. लोक दर्शनाला येत राहतात, आपण लोकांचं दर्शन घेत राहावं, असा काहीसा खेळ चालला होता. समोर काही अंतरावर उंचापुरा, एकच एक भगवी कफनी घातलेला माणूस उभा होता. का कुणास ठाऊक पण त्याच्यावर नजर खिळली होती. आणि एकाएकी त्या माणसाने उभ्या उभ्याच भर गर्दीत आपला शरीरधर्म पार पाडला. उगाच आडपडद्याने का बोला, त्याने तेथेच विष्ठा केली. अंगावर सरसरून काटा आला. जिताजागता माणूस समोर आहे, पण त्याचं अस्तित्व आहे काय अन् नाही काय? असून काही उपयोग नाही.. नसून कुणाला दु:ख नाही. जिताजागता माणूस. मानवी अस्तित्व अर्थहीन असल्याची भावना एकाएकी भीतीसारखी अंगभर पसरली. अर्थहीनतेचा हा अनुभव यायलाही महाभारताच्या कुरुक्षेत्रातच यावे लागले, हा योगायोगच समजावा का? त्या एका अनुभवाने सुन्नच झालो. सुन्नपणा हे ही मौनाचेच रुप म्हणावे का? की सुन्नपणाची परिणीती मौन?
जंगलातून जाताना, पर्वताच्या कड्यावरून दूरवर नजर फेकताना, कच्छच्या कच्छच्या लांबच लांब रस्त्यावर बसकण मारली असताना, मौन भेटत राहिलं, मौन व्यापत राहिलं. मौन भारत राहिलं. पानिपतापासून काही अंतरावर ‘काला आम’ नावाची जागा आहे. पानिपतच्या तीनही युद्धांची आठवण म्हणून तेथे स्मारक उभे राहिले आहे. स्थानिकांसाठी तो जॉगर्स पार्क आहे. आपल्या मराठी मनासाठी तो तसा कसा असू शकेल? मयुरेश आणि मी ते सगळं बघून झाल्यावर एकही अक्षर न बोलता केवळ मावळतीचा सूर्य अंगावर घेत बसून राहिलो. लाख मराठ्यांचा गहिवर आला होता का दाटून, माहीत नाही. कुरुक्षेत्र आणि पानिपत ही नरसंहाराची दोन प्रतिकं आजूबाजूला असणे हा योगायोग अंगावर येत होता का, माहीत नाही. आमच्या अवतीभवती कोण होतं, माहीत नाही. त्या सायंकाळी मौन तेवढा मनात रेंगाळत बसलं होत, इतकंच काय ते आठवतं.
इतक्या ठिकाणी, इतक्या जागी फिरलो. दर वेळेला या मौनाचं आकर्षण वाढत गेलंय. अनेकविध रुपात ते भेटत आलंय, मौनाचं गारुड कायम राहिलंय. मध्यंतरी काही ओळी वाचल्या होत्या....

क्षितिज उभे डोळ्यात सांजते,
चंद्र उन्हाची नसांत शिंपण
गोकुळात वाळूत चालते
रात्ररात्र शब्दांची गुंफण!

राधा-कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करणारे हे शब्द सुंदरच आहेत.  पण, मनात विचार आला. राधा-कृष्णाला शब्दांची गरजच भासली नसेल. एकरूप होते म्हणतात ना ते! रात्र रात्र भर, वाळून बसून, त्यांची शब्दांची नव्हे, तर मौनाचीच गुंफण चालत असावी. त्यांचे मौनच इतके बोलके असावे की शब्दांचा अनावश्यक भार नकोसाच वाटत असणार. कुणास ठाऊक? रेंगाळत असेल का तेथेही आजही असे मौन. जाऊन बघावे का एकदा कालिंदीच्या काठावर? मौनाचं ते दिव्य रूप बघायला…. आणि मग मौनात विरून जायला….!

Sunday, 22 July 2018

आगुंबे झिरपलंय तना-मनात!



‘स्वदेस’ बघितला असेल ना! शाहरुखवाला.. चेक्सचे मस्त शर्टस घातलेला मोहन.. आणि ती गायत्री जोशी. म्हणजे कांदे-पोहे वाला कार्यक्रम करायचाच असेल तर हिच्यासाठी करावा, अशी वाटणारी गायत्री! ते वाईचे काठ, नासा बॅकग्राऊंड, ‘यूँ ही चला चल’ म्हणणारा मकरंद देशपांडे… बहोत कुछ था! या सगळ्या गर्दीतली ती ‘कावेरी अम्मा’ आठवते का? शाहरुखला सांभाळणारी… दाक्षिणात्य टोन घेऊन बोलणारी. तर सांगायचंय हे की माझ्यापुरती ही कावेरी अम्मा फक्त  पडद्यावर मर्यादित राहिली नाही. अशीच एका कावेरी अम्मा मला प्रत्यक्षातही सापडली होती. तशीच क्रीम किंवा कुठल्या तरी हलक्या रंगाची दाक्षिणात्य साडी नेसणारी. तशीच मार्दवाने बोलणारी पण कर्तेपणाचा अलंकार ल्यालेली. ती ही पार पश्चिम घाटात, कर्नाटकात. आपण विदर्भात म्हणतो ना तसल्या छटाकभराच्या गावात.. अगुंबे नावाच्या!
भारतातील सर्वात जास्त पाऊस ज्या काही ठिकाणांवर पडतो त्यातले एक अगुंबे! पाऊस धो..धो पडतो म्हणजे काय होतं ते अगुंबेत अनुभवावं.. पाच वर्षे झाली जाऊन तिथे… चित्र धूसर झालंय..पण ते पावसाचं पाणी पापण्यांवर पडल्यानंतर होत तसं… डोळे मिटून घ्यावे आणि तो पापण्यांवरचा थेंब अनुभवावा तसं अगुंबे आठवतंय. घाटातील वळणदार रस्ते चढून या डोंगराळ गावात पोहोचलो तो जुलै महिना होता. म्हणजे तिथला सर्वाधिक पावसाचा महिना.. सरासरी २५०० मिमी पेक्षा जास्त पावसाचा.  गावाला मध्यभागी छेदणारा पायवाटेपेक्षा जरासा मोठा रस्ता. आणि दोन्ही बाजूला कौलारू घरे… याच रस्त्याच्या सुरुवातीला अगुंबेच्या कावेरी अम्माचे घर होते. लाकडी जुने बांधकाम, पुरुषभर उंचीची भलीमोठी दगडी ओसरी. बसायला लाकडी बाके अन् खुर्च्या.. जाड महाग लाकडाचे नक्षीदार दार आणि वाकून आत प्रवेश केला की भला मोठा चौक.. वर छप्पर नसलेला आणि उघडं आकाश किंवा चांदणं थेट अंगावर घेणारा. आम्ही होतो तेव्हा या चौकात पाऊस धाडधाड कोसळायचा आणि उतरत्या छपरांवरून धारा ताल धरत नाचायच्या. उतारावरून कोसळणारा थेंब फुटण्याचा खेळ निवांत बघत राहावं, अशी जागा. चौकाच्या मध्यभागी आपल्या सर्वांच्या कल्पनेत रुतलेलं हुबेहूब तुळशी वृंदावन आणि चौकाच्या सभोवताल सगळ्यांच्या राहण्याच्या खोल्या.
घरच्या मुख्त्यार असलेल्या,  सावकाश पावले टाकीत, आपला भारदस्त देह सांभाळीत घरभर फिरणाऱ्या कावेरी अम्मांचा दरारा त्या वाड्यात सर्वत्र जाणवायचा. गावची पाटलीण असते, तशा त्या गावातील प्रमुख होत्या. भरल्या घराचा अनुभव देणारा तो वाडा. ओसरीवर बैठे खेळ खेळणाऱ्या परकर-पोलक्यातील मुली, आरामखुर्चीवर पेपर वाचत बसलेले काका, अखंड जपमाळ खेळविणारी वयस्क आजी आणि काम करणाऱ्या बायका. या सगळ्यांवर कावेरी अम्मांचा धाक, वरदहस्त आणि वरचष्माही होता.  पहाटे पाच वाजता उठून ही बाई त्या वाड्याचा कारभार हाती घ्यायची तो रात्र ओसंडून निजेपर्यंत. अख्ख्या घरावर जुन्या घरंदाजपणाची आणि हातून निसटून चाललेल्या लोभस गतकालाची छाप होती. वापरण्याच्या भांड्यांपासून ते पाणी तापवण्याचा भल्या थोरल्या बंबापर्यंत अनेक गोष्टी तांब्याच्या. न्हाणीघर इतकं मोठं की पाय पसरून झोपावं. वाड्याचे रुपांतर होम स्टे मध्ये झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी काही कायमच्या सोयी. वरच्या मजल्यावर बाहेरच्यांची राहण्याची सोय. गज असलेल्या जुन्या खिडक्या. कमीतकमी प्रकाश आणि सकाळच्या वेळी खिडकीतून येणारी सूर्यकिरणांची तिरिप. सबंध वातावरणातील भिजलेपण वाड्याच्या रंध्रारंध्रात भिनलंय असं सारखं वाटत राहायचं.
या वाड्यात दोन की तीन दिवस राहिलो. केळीच्या पानांवर वाढला जाणारा गरमागरम भात, त्याचे वेगवेगळे प्रकार, नेहमीच्याच पण दाक्षिणात्य पद्धतीने केलेल्या भाज्या, लोणची आणि पापड. या सगळ्यांच्या जोडीला कावेरी अम्मा आणि तिच्या धाकाने इतर महिलांनी आस्थेने केलेली वास्तपुस्त. आगुंबे अनेक अंगांनी आणि रंगांनी आत उतरलंय.
आगुंबेतील घरही मोठी वैशिष्ट्यपूर्ण, छोटेखानी, उतरत्या छपरांची आणि अफलातून रंगांची! त्या संबंध पश्चिम किनारपट्टीवरील घरांच्या रंगांचं मला मोठं अप्रूप आहे. कोकणापासून केरळापर्यंत फिरताना घरांची विशेष रंगसंगती माझे लक्ष वेधून घेते. म्हणजे आपल्याकडे रंग लावताना जरा हलका, क्रीम कलर हमखास मिसळलेला अशी घरं दिसतील. तिथे म्हणजे फिक्का रंग वगैरे प्रकारच जगात अस्तित्वात नसावे असं वाटत राहात. भडक लाल, पिवळा, जांभळा वगैरे एकदम डेंजर लाईक कलर्स. अनिल शर्माच्या एकाच पिच्चरमध्ये नाही का अमरिश पुरी, डॅनी, प्रेम चोप्रा असे डेंजर डेंजर लोक राहायचे. तसे एकाच रंगात सगळे हे भडकभुडक कलर्स.. पण मला मजा येते ही घरं बघताना. आगुंबेतही तसलंच काहीसं चित्र होतं. आम्ही गेलो तेव्हा लोक शाकारणी करीत होते. गावाच्या मध्यभागी पडकी दगडी शाळा आणि त्याला वळसा घालून गेलं की एक मोठा रस्ता आणि काही लहान गल्ल्या. गावं संपल्यात जमा. कुठेही उभे राहा, असंख्य पक्ष्यांचे असंख्य अनोळखी आवाज.
मालगुडी डेज आठवते का? त्यातील काही एपिसोडसचं शुटिंग या गावात झालं होतं. आणि घरातलं शूटिंग थेट कावेरी अम्माच्या वाड्यातच. म्हणजे आम्ही तीन दिवस जेथे राहिलो त्याच वाड्यात. मालगुडी डेज आणि आर. के. नारायण यांचं आपल्याला आकर्षण असतं. विशेषत: दूरदर्शनवर पालनपोषण झालेल्यांना तर नक्कीच! त्याच वाड्यात आपण राहतोय म्हटल्यावर का कुणास ठाऊक पण लय भारी वाटत होतं.
निघण्याच्या काही तास अगोदर कावेरी अम्मांना म्हटलं, तुमच्यावर लिहिणार आहे मी, बोलायचंय. ‘माझ्यावर काय बोलायचं अन‌् काय लिहायचं’. पण, तरी त्या बोलल्या. सकाळची सगळी कामे बाजूला ठेवून. तिखटा-मिठाच्या आणि मसाल्यांच्या भल्या-थोरल्या डब्याशी खेळत. घड्याळात सकाळचे सहा वाजले होते तेव्हा बोलणे सुरू केले. थांबलो तेव्हा तास उलटून गेला होता.
आगुंबे गावाचा परिसर ‘रेड कॉरिडॉर’ च्या पट्ट्यातील. माओवादाने प्रभावित. सुरक्षा दलाचं लक्ष कावेरी अम्माच्याही वाड्याकडे असतं. ‘ते लोक येतात का?’. बाई बोलेनात. ३-४ वेळा विचारल्यावर म्हणाली,‘ तू आलास-जेवलास ना. तसं आणखी कोण कोण येत राहातं. प्रत्येकाला कसं  विचारणार’. मी मग पुढे काही रेटलं नाही.
कर्नाटकात आयुष्य गेलेली ही बाई, अस्खलित मराठीत बोलायचं. कानडी हेल काढत. सानुनासिक. कारण, तिचं मूळ मराठी होती. कारण ती कावेरी अम्मा नव्हती. तिचं खरं नाव होतं. कस्तुरी अक्का शेणॉय!
२०१३ मध्ये गेलो होतो. आता बरोबर पाच वर्ष उलटली. धो-धो पडणारा पाऊस, रस्त्यांवरून वाहणारे पाट, चिंब भिजलेली घरे आणि ओसऱ्या. आगुंबेला पुन्हा जाणं होणारही नाही आयुष्यात कधी, पण किंचित कुरळ्या केसांची  सत्तरीची कावेरी अम्मा ऊर्फ कस्तुरी अक्का, तिचा १२० वर्षे जुना वाडा आणि ते अख्खं जग… स्टिल कॅमेऱ्यानं टिपलंय मनाच्या. वारंवार हा अल्बम उघडून बघण्यासाठी!
…………………………….



Sunday, 10 June 2018

हिमाचल के प्यार मे सब जायज है!



पठाणकोट सोडलं आणि काही अंतर जात नाही तोच बनवारीने, गाडीच्या ड्रायव्हरने, एसी बंद केला. तो बंद करायचा अवकाश अन् दिल्ली, हरयाणा आणि पंजाबच्या उन्हाने होरपळलेल्या आणि कॉम्प्लेक्शन गमावू बघत असलेल्या  आमच्या गाडीतील यच्चयावत जीवांनी एकच गलका केला. एसीविना आता आपले कसे होणार ही मर्त्य जीवांना पडणारी काळजीही स्वाभाविकच. ‘पहाडी शुरू हो रही है’, बनवारीने जाहीर केले आणि आपण  हिमाचलच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत याची जाणीव झाली. पहाडी शुरू होण्याचे आणि एसी बंद करण्याचे प्रकरण चार वर्षापूर्वीही अनुभवले होतेच. तर, पठाणकोट सोडले आणि उण्यापुऱ्या दोन तासात ‘हवा बदल रही है’ चा अनुभव येऊ लागला. स्वत:च्या मनाला सांगितले, वेलकम टू हिमाचल प्रदेश!

चार वर्षांपूर्वी शिमला,मनालीला गेलो होतो तेव्हा हिमाचलची पहिली नजरानजर झाली होती. त्या नेत्रपल्लवीने डोक्यात टिकटिक वाजवले और प्यार हो गया. तसा मी बऱ्यापैकी भटक्या जमातीचा माणूस आणि भारताच्या १०-१५ राज्यांमधून प्रवासही करून झालाय. पण, हिमाचलच्या प्रेमाची मी लाल किल्ल्यावरून कबुली द्यायला तयार आहे. तसा तर शेरशहा सुरी वाला ग्रँड ट्रंक रोडही मनात ठसलाय, पण त्या फ्लर्टिंगची गोष्ट पुन्हा केव्हा तरी.! गुलमर्गच्या बर्फापासून ते अलेप्पीच्या बॅकवॉटरपर्यंत अनेक गोष्टी सॉलिडच होत्या. पण, शाहरुखला हात फैलावून साद घालायची असेल तर त्याने ती फक्त हिमाचलातच घालावी, असे कायमच वाटत आले आहे. कारण काय तर काही नाही,  हिमाचल के प्यार मे सब जायज है!

प्रवासाबद्दलचे आपले फेव्हरेट वाक्य म्हणजे ‘जर्नी इज ऑलवेज ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन’ आणि हिमाचलात तर त्याची जागोजागी प्रचिती येत राहते. माझ्यासारख्या फोटोग्राफी न येणाऱ्या माणसाला हिमाचल नाराज करीत नाही. मोबाइल कॅमेरा काढावा आणि डोंगराच्या कुठल्याही वळणावरून दिसणाऱ्या दृश्यावर तो धरावा, फोटो ओकेच येणार. हिमाचलचे सौंदर्य आहेच तसे! तसेही ज्याने एकदा हिमालय आणि माधुरीचे स्माइल अनुभवले तो यापैकी कोणतीच गोष्ट विसरू शकत नाही. माझ्यासाठी हिमाचलही तसाच आहे. प्रिन्सेस डायना आणि माधुरीच्या कॉम्बिनेशनवाला.

पाइन्स आणि इतर असंख्य वनस्पतींनी हिमाचलचे डोंगर समृद्ध आहेत. या झाडांच्या गळून पडलेल्या पानांचा झाडोरा वाळल्यावर एकदमच आकर्षक दिसतो. काळ्या- चॉकलेटी खोडांची झाडे आणि पिवळे गवत नजरेला अशी काही भुरळ घालते, की आपला एकदम फुल स्वेटरवाला ऋषी कपूर होऊन जावा. मनालीचे हिडिंबा मंदिरही असेच, मनात भरलेले आणि कॅनव्हासभर पसरलेले.

यावेळचा डलहौसीचा टूर म्हणजे तर ऋषिकेश मुखर्जी आणि यश चोपडांचे कॉम्बिनेशन होता. सगळ्या जाणिवा जागृत ठेवून अनुभवले तर डलहौसी मजाच आणते. आम्ही पोहोचलो त्या रात्री सोसाट्याचा वारा आणि अशी काही थंडी होती की बॅगेतले फुल स्वेटर्स काढावेच लागले. आणि दुसऱ्या दिवशीचा भल्या सकाळचा मॉर्निंग वॉकही अप्रतिम.

डलहौसीचा गांधी चौक म्हणजे त्या गावचा मुख्य चौक. हे हिल स्टेशन अद्यापही अंगाखांद्यावर ब्रिटिश खाणाखुणा मिरवतंय. रस्किन बाँडची पहाडी वर्णन वाचून जावीत आणि डलहौसीत ती जोखून बघावी. साधर्म्य हमखास आढळणार. त्या चौकातून एक लहानसे उजवे वळण घेऊन दरीच्या कडेकडेने एक रस्ता पकडला आणि चालू लागलो की वाट हळुवार निमर्नुष्य होत जाते. ज्या कुठल्या कोलाहलातून आपण आलो असेल तो फिका होत जातो आणि अवतीभवतीची शांतता तुमच्या भोवती गुरफटत जाते. मोबाइल आत टाकावा, मोदी-राहुलची आणि आपल्याशिवाय ऑफिसचे काय होणार ही चिंता दूर फेकावी आणि गप तोंड बंद ठेवून चालत राहावे. पहाडी पक्ष्यांचे आवाज, झाडांमधून वाहणारा वारा, दूरवर दिसणाऱ्या टेकड्यांवर उतरलेले धुके आणि आरामात पहुडलेली शांतता हा पुस्तकातील वर्णनांचा भाग उरत नाही. चित्तवृत्ती शांत करणे हे जर अध्यात्म असेल तर हिमाचलची डलहौसी तुम्हाला त्याची जाणीव करून देते. कपडे खराब होण्याची चिंता न करता डोंगर उतारावरील गवतावर बसून जावे, गुमान डोळे मिटून भवताल अनुभवत राहावा. कुणास ठाऊक, कदाचित याच वळणावर स्पर्शून जाईल त्या घनसावळ्याची सावली! हिमाचलमे सब जायज है….

मंदार मोरोणे, नागपूर
७७७५०९५९८६

Monday, 30 April 2018

शेजारच्या छत्तीसगडात!!!


‘‘दादू... झाडू लगा लो... दादू कुलर मे पानी भर दो... दादू कुर्सिया नही लगायी अभी तक.. अरे, दादू कहा हों... मेहमान आ गये.. सामान तो लो’’’... घरात मंगलकार्याची लगबग सुरू आहे. प्रत्येक जण ‘काम मे हाथ बँटा रहा है’ आणि तरीही घराच्या कानाकोपऱ्यातून ‘दादू...दादू’.. आवाज येतो आहे. आणि टी-शर्ट पँटमधला दादू इकडून-तिकडे धावतोय.. अर्धवट टक्कल, बारीक मिशी, कंबरेला पांढरे उपरणे गुंडाळलेला दादू प्रत्येक ऑर्डर झेलण्यासाठी लगबग करतोय आहे. कामे करायला घरात अनेक तरुण आहेत. पण, तरीही सर्वाधिक आवाज दिला जातोय साठीला पोहोचलेल्या किंवा कदाचित ओलांडलेल्या दादूला! आणि तोही कोणतीच हाक व्यर्थ जाऊ देत नाही.. सकाळी  सहाला सुरू झालेली त्याची धावपळ रात्रीच्या जेवणापर्यंत सुरूच राहते. मग तो अंतर्धान पावतो आणि थेट दुसऱ्या दिवशीच दिसतो. आपण उठायच्या आधीच त्याच्या हाती झाडू किंवा टोपले आले असते... टी-शर्टची जागा शर्टने घेतली असते.. बाकी सगळं कालसारखंच असतं दादूचं... दादू बोलणारा रोबोट तर नाही.?.. पण तो फारसा बोलतंही नाही.. एखादा शब्द, फारतर दोन सलग वाक्य. उर्वरित वेळेत फक्त काम.

 मध्येच कुणीतरी अकाली मोठेपण भिनलेलं दादूवर डाफरतं.. सांगितलेलं काम केलं नाही म्हणून... उर्मट शब्दात पाणउतारा करतं.. आणि क्षणार्धात घरच्या सगळ्यात थोरल्या बाईचा चढा स्वर त्या उर्मट स्वराला झापतो.. दादूसाठी. कारण, दादू केवळ ठेवलेला नोकर नसतो, वेठबिगार गुलाम नसतो. दादू, वर्षानुवर्षे घरचाच होऊन गेलेला, नात्यागोत्यात, जातीत नसलेला आप्त असतो. आणि तो त्या एका घराचा नसतो तर अख्ख्या वस्तीचा असतो.   

हा प्रसंग अगदी खराखुरा, डोळ्यादेखत घडलेला! आणि अगदीच परवा-परवा. छत्तीसगडमध्ये दुर्गला भाच्याच्या मुंजीला गेलो होता, तिथला. घरभर राबणारा दादू तीन दिवस सतत डोळ्यापुढे होता. आपल्याही घरी अशी घरचीच होऊन गेलेली गडी-माणसे होती. आता-आता काही वर्षांपूर्वीपर्यंत. कुठे-कुठे ती अजूनही आहेत. शहरात फारच कमी. पण, छत्तीसगडमध्ये ती आहेत.  खूप पूर्वीही होती.

माझ्या आत्याच्या लग्नातला एक फोटो अजून आहे आमच्याकडे.. तीन छत्तीसगडी माणसे क्रॉस मांडी घालून पाय पोटाशी धरून बसलेली फोटोत.  आमची आजी छत्तीसगडची. लेकीच्या लेकीचे लग्न म्हणून खास तिच्या माहेरच्यांनी मदतीला तीन गडी पाठविले होते, अमरावतीला. छत्तीसगडी! फोटोतील ती तीन माणसे माझ्यासाठी एक गूढच होते. ही माणसे नोकर होती शेतावरली. वाट्टेल ते काम करावयाची. फारच अप्रूप होते मला.. का कुणास ठाऊक.. तेव्हापासून छत्तीसगडबद्दल जे काही आकर्षण माझ्या मनात निर्माण झालेय, ते आजतागायत कायम आहे.

आणि मग पाच वर्षांपूर्वी आजीच्या माहेरी गेलो. त्यांची भली विस्तीर्ण शेती आहे. त्या शेतावर गेलो तर शेत राखायला ठेवलेल्या कुटुंबातील बाया-माणसं पुढं आली. अगदी वृद्धत्वाकडे झुकलेली माणसंही आमच्या काकांच्या पाया पडली. मी नको...नको म्हणत असताना माझ्या आणि बायको-बहिणीच्या पाया पडली. आम्ही पाय मागे घेतले. काका म्हणाले,‘ करू दे नमस्कार. तू म्हणशील तर तुझ्या दीड वर्षांच्या मुलीच्याही पाया पडेल’.  क्षणभर स्वत:ची लाज वाटली.  आपल्यावर संस्कार महाराष्ट्रातील सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या वातावरणाचे. वर्ग-वर्ण आधारित ही वागणूक आपल्या ओळखीची नसलेली. किंबहुना, संकोचलेपण आणणारी.. पण, छत्तीसगड असाच आहे..पण मग, मी बघितलेला हरयाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानही तसाच आहे. कशाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही अद्याप असे प्रकार आहेत.
पण, छत्तीसगड बदलला आहे. रायपूरचे रस्ते, नागपूरने मिशीवर ताव सोडा, मिशी ठेवूच नये, इतपत सुधारलेत. छत्तीसगडच्या नव्या-जुन्या समृद्धीचे आणि विकास नामक अप्पलपोटेपणाचेही अनेक किस्से आहेत. म्हणजे, बस्तरमध्ये भांडी विसळायला गेलेला माणूस दारू व्यावसायिक कसा झाला आणि नोटबंदीच्या दिवशीच रायपूरमध्ये किती हजार किलो सोने खरेदी झाली, रायपूरमध्ये जमिनीचा भाव किती चौरस फूट आहे, वगैरे वगैरे. त्यात आत्ताच खोलवर नको जायला. सध्याचे निमित्त फक्त डोळ्यांनी अनुभवलेल्या आपल्या शेजारी राज्याचे.. लहानपणापासून कुतूहल असलेल्या छत्तीसगडच्या दर्शनाचे!
...............................................................................................

Saturday, 31 March 2018

‘स्वच्छ’ हवा शैक्षणिक भारत!


फार दिवस नाही झालेत जागतिक महिला दिन पार पडून! अवघ्या वीस दिवसांपूर्वी झालेल्या या जागतिक उत्सवानिमित्त युनेस्कोने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. मुला-मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणाचा आढावा या अहवालातून घेण्यात आला होता. या अहवालानुसार वर्षागणिक मुलींचे शाळांमध्ये जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरी जगभरात अद्यापही ते मुलांच्या बरोबरीत आलेले नाही. मुलींच्या शाळेत न जाण्याची विविध कारणे आहेत आणि त्यांचा ठिकठिकाणी उहापोहही झाला आहे. मात्र, या अहवालानुसार इतर कारणांप्रमाणेच शाळा- कॉलजेस मध्ये स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने अनेक मुली शाळेत नियमित जात नसल्याचे दिसून आले आहे. विशेषत: मुलींच्या पाळीच्या दिवसात स्वच्छतागृहात व्यवस्था नसल्याने महिन्यातून किमान तीन दिवस मुली शाळांमध्ये हजेरीच लावत नाही, अशी माहिती या अहवालातून मांडली गेली आहे. जगातील दर दहापैकी एक विद्यार्थिनी तिच्या पाळीच्या दिवसांमध्ये शाळेत जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जगभरातील विविध देशांचे सर्वेक्षण करून हा अहवाल महिला दिनाला जाहीर करण्यात आला होता.
भारतातही शालेय संस्थांमध्ये मुलींसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे, तेथील सुविधा आणि त्यांची स्थिती हा चिंतेचाच विषय आहे. विशेषत: ग्रामीण भागात तर त्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे युनेस्कोने जगभरातील सरकारकडे मुलींच्या स्वच्छतागृहांच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. शाळांमध्ये फक्त मुलींसाठीची स्वच्छतागृहे पुरविण्यात यावी असे आवाहनही याच अहवालाद्वारे करण्यात आले आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसलेले सर्वाधिक लोक भारतात राहत असल्याचे सांगितले जाते. वॉटरएड या जागतिक स्तरावर स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने जगातील स्वच्छतागृहांची अवस्था मांडणारा अहवाल २०१७ मध्ये मांडला. त्या अहवालातूनही भारतातील आणि जगातील स्वच्छतागृहांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
विविध अभ्यासातून आणि अहवालातून मांडली जाणारी परिस्थिती आपल्या आजूबाजूलाही असल्याचे जरा डोळसपणे बघितल्यास लक्षात येते. अर्थात, शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती नि:संशयपणे वेगळी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी अद्यापही सुधारणांना वाव आहेच. शहरातील शाळा आणि कॉलेजेसनी मात्र स्वच्छतागृहांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला आहे हे निश्चित. एके काळी शाळेमधील सर्वाधिक दुर्लक्षित करण्याजोगी व्यवस्था ही स्वच्छतागृहांची राहत असे. त्यांचे बांधकाम आणि स्वच्छता हा कसा तरी पार पाडण्याचा विषय होता. मात्र, शहरी भागातील चांगल्या शाळांमध्ये आता स्वच्छतागृहांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. शाळांची आणि पालकांची जागरूकता या विषयात सुधारणा घडवून आणण्यास कारणीभूत ठरली आहे. 
मुलींच्या स्वच्छतागृहांच्या संदर्भात सर्वाधिक कळीचा मुद्दा येतो तो पाळीच्या दिवसांमधील व्यवस्थेचा. पाळीच्या काळात मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध असावेत यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे. कॉलेजेसमध्ये व्हेडिंग मशिन्स बसविल्या गेल्या असून नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जात आहेत. केमिस्टच्या दुकानातून वर्तमानपत्रात गुंडाळून लपत छपत नेण्याचा हा विषय आता उघडपणे बोलला जाऊ लागला आहे. ‘पॅडमॅन’ सारखा चित्रपट तयार होतो हे समाज बदलत असल्याचे निदर्शक आहे. किंबहुना, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून देखील आता वरच्या वर्गातील विद्यार्थिनींना ‘पॅडमॅन’ दाखविला जाऊ लागला आहे, हे समाजात येत चाललेल्या मोकळेपणाचेच द्योतक आहेत. 

नॅपकिन्सच्या निचऱ्याची हवी व्यवस्था 

शहरी भागातील स्वच्छतेच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मिळायला लागले आहेत. थोडक्यात सांगायचे तर  माहोल बदल रहा है. पण, सगळेच काही चांगले होतेय असे समजण्याचे कारण नाही. अनेकदा हे नॅपकिन्स स्वच्छतागृहांमध्येच टाकून दिलेले असतात. ते नष्ट करण्याची व्यवस्था पुरविण्यात आली नसते. पॅडसचा निचरा करणारी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे स्वच्छतागृहांमधून उपलब्ध करून दिली जाणे आवश्यक आहेत. सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा आणि निचर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले जावे. स्वच्छतागृहे स्वच्छ असली पाहिजे याची संबंधित शैक्षणिक संस्थेने काळजी घेतली पाहिजे अशा अपेक्षा पालक आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे कॉलेजेसमधील स्वचछतागृहे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे हे मुलींनाही समजणे आवश्यक असल्याचे मत कॉलेज विद्यार्थिनी व्यक्त करताना दिसतात.
विविध संस्थांच्या तसेच भारत सरकारच्या आकडेवारीनुसार स्वच्छता या विषयात भारताने बरीच प्रगती केली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीतूनही स्वच्छतागृहांची देशातील संख्या वाढली आहे. मात्र, निर्माण होत असलेली ही व्यवस्था कायम टिकून राहणे गरजेचे आहे. शालेय वयातील मुलींच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट संबंध हा विषय अधिक गांभीर्याने घेणे आणि आपल्या उमलत्या कळ्यांसाठी चांगली व्यवस्था निर्माण करून देणे ही समाज आणि शासन म्हणून आपली जबाबदारी आहे.
........................................................

*ताटात ’चायनीज’ टाकू नये...!*

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे. ऐकून गंमत वाटेल पण आहे ते असेच आहे. चीनी अध्यक्षांनी ’आपली ताटे रिकामी करा’...